मुंबईच्या मध्य रेल्वेवरील घाटकोपर या उपनगरातील असल्फा या दाट लोकवस्तीच्या भागात जंगलेश्वर महादेवाचे मंदिर वसले आहे. सभोवताली असलेल्या दाट वृक्षराजीमुळे येथील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते. घाटकोपरमधील डोंगरउतारावर वसलेल्या असल्फा भागात पूर्वी घनदाट जंगल होते. त्या जंगलात स्थित असलेला महादेव म्हणून येथील महादेवास जंगलेश्वर असे नाव पडले. येथील शिवपिंड अतिशय प्राचीन काळापासूनची असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी येथील मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आणि त्याला सुंदर स्वरूप देण्यात आले. हे मंदिर परिसरातील हजारो शिवभक्तांच्या श्रद्धेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी घाटकोपरमध्ये अनेक गुजराती, पारशी, भाटिया आणि मारवाडी धनिकांनी आपली निवासस्थाने बांधली. मुंबईतील कापड गिरण्या आणि कुर्ला परिसरात उभे राहिलेले कारखाने यामुळे या भागात अनेक कामगारांनी आणि मध्यमवर्गीयांनीही वस्ती केली. असल्फा हा भागसुद्धा त्यातलाच एक आहे. असल्फा आणि घाटकोपर या नावांविषयी अनेक कथा सांगण्यात येतात. घाटकोपर परिसरामध्ये पूर्वी घाटे आणि कोपर ही दोन स्वतंत्र गावे होती. त्या गावांच्या नावांवरून त्यास घाटकोपर हे नाव पडले. घाटकोपरची घाटे आणि कोपर ही गावे येथे किमान बाराव्या शतकापासून आहेत. इ.स. ११४२ मध्ये मुंबईतील माहिम येथे आपली राजधानी स्थापन करणारा मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब तसेच त्यानंतर इ.स. १२९५ मध्ये सत्तेवर आलेला यादव राजा रामदेवराय यांचा पुत्र बिंबदेव यादव यांचा इतिहास सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात घाटे आणि कोपर या दोन्ही गावांचा स्पष्ट नामोल्लेख आहे. याचप्रमाणे महिकावतीच्या बखरीमध्ये आसनपे आणि बिंबाख्यानात आसनप या गावाचा उल्लेख आहे.
अभ्यासकांच्या मते आसनपे या नावाचा अपभ्रंश पुढे होत जाऊन आसलपे, त्यावरून आसलफे आणि शेवटी आसल्फा असा झाला.
येथील जंगलेश्वर महादेवाच्या मंदिराबद्दल आख्यायिका अशी की पूर्वी हा डोंगराळ आणि दाट जंगलाचा भाग होता. सुमारे ३०० वर्षांपूर्वी येथून काही साधू जात होते. त्यावेळी त्यांना एका स्वयंभू पाषाणलिंगास नागराजांनी वेटोळे घातल्याचे दिसले. हा चमत्कार पाहून त्यांनी येथे त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. ही घटना घडल्याचे सांगण्यात येते त्या काळात येथे ब्रिटिशांची राजवट होती. चार्ल्स बून हे मुंबईचे गव्हर्नर होते आणि १७२० मध्ये वरळीची मोठी खिंड म्हणजेच ‘द ग्रेट ब्रीच’ येथे बांध घालून ती बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मुंबईच्या दलदलीच्या भागात भराव टाकून हे शहर राहण्यायोग्य आणि शेतीयोग्य करण्याचे काम सुरू असतानाच पोर्तुगीजांनी लादलेले कट्टर धार्मिक निर्बंध पूर्णपणे सैल करण्यात आले होते. परिणामी या काळात येथील हिंदू समाज निर्भयपणे पुन्हा आपल्या देवतांची प्रतिष्ठापना करू लागला होता. याच सुमारास येथे या मंदिराचा शिलान्यास झाला, असे या आख्यायिकेतून स्पष्ट होते.
येथे पूर्वी दाट झाडीमध्ये एक छोटेसे मंदिर वसलेले होते. परिसरातील नागरिक तेथे नित्यनेमाने पूजेस येत असत. काही शैवसाधूही येथे वास्तव्यास असत. कालांतराने सन १९९४ च्या सुमारास येथील मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आणि त्यातून मंदिरास आजचे स्वरूप प्राप्त झाले. या मंदिराभोवती मोठी मोकळी जागा आहे. मंदिरास एक सुरक्षित आवारभिंत आहे. या आवारभिंतीमध्ये मोठी द्वारकमान बांधलेली असून या कमानीवर मोठा कलश आहे. प्रांगणातील वृक्षांना मोठे पार बांधण्यात आले आहेत. प्रांगणात उत्तम फरसबंदी केलेली आहे. मंदिराच्या समोरच्या भागात मोठे होमकुंड आहे. येथेच एका लोखंडी चौकटीला मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत.
असल्फा – साकीनाका जवळ खैरानी मार्गावर स्थित असलेल्या या मंदिराची वास्तुरचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्या या मंदिराच्या अगदी जवळून मुंबई मेट्रो मार्गिका एक धावते आणि ‘असल्फा मेट्रो स्थानक’ येथून हाकेच्या अंतरावर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या देवालयाची संरचना आहे. सभामंडप उंच जगतीवर म्हणजेच चौथऱ्यावर बांधलेला आहे आणि तो खुल्या प्रकारचा आहे.
त्यावर एक सुंदर गजपृष्ठाकार छप्पर आहे. त्यामुळे त्याचा आकार काहीसा शिवपिंडीच्या ‘प्रणाल’ म्हणजेच पाणी वाहून जाणाऱ्या भागासारखा दिसतो. मंदिराच्या गर्भगृहावर मोठे घुमटाकार शिखर आहे आणि त्याचा आकार शिवलिंगासारखा आहे. त्यामुळे या मंदिराची वास्तू दुरून पाहिल्यास शिवपिंडीसारखी दिसते. येथील गोलाकार स्तंभ आणि संगमरवरी फरसबंदी असलेल्या सभामंडपात मध्यभागी नंदीची पाषाणाची मूर्ती विराजमान आहे. त्यापुढे दीपदान आणि संगमरवरी कूर्ममूर्ती आहे. मंदिराचे गर्भगृह गोलाकार आहे आणि ते संगमरवरी लाद्यांनी सुशोभित केलेले आहे. त्यात भूतलावर जंगलेश्वर महादेवाचे पाषाणलिंग प्रतिष्ठापित आहे. पिंडीवर चांदीच्या नागमूर्तीने छत्र धरलेले आहे. गर्भगृहातील देवकोष्ठकात गणेशाची तसेच पार्वती मातेची मूर्ती विराजमान आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या उजवीकडे एक छोटे देवालय आहे. त्यात सिंहावर आरूढ असलेल्या दुर्गामातेची पितळी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या छोट्या देवालयाजवळच तुळशीवृंदावन आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा कबुतरखाना आहे. परिसरातील जैन बांधव कबुतरांना दाणे टाकत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर कबुतरे आहेत. मंदिर परिसरात एक मोठे सभागृहही आहे. या ठिकाणी मंगलकार्ये तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
या मंदिरात दररोज सकाळी ६:३० पासून दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरू होते. येथे भाविकांना सकाळी ७ ते दुपारी १ या काळात जलाभिषेक करता येतो. महाशिवरात्री हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव होय. या दिवशी मंदिराच्या संपूर्ण परिसरात जत्रेचे वातावरण असते. मंदिरास विद्युत दीपमालांनी सजवले जाते. जंगलेश्वर महादेवाची खास पूजा आयोजित केली जाते. या दिवशी पहाटेपासून रात्रीपर्यंत येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर समितीतर्फे येथे भंडाऱ्याचेही आयोजन केले जाते. श्रावण महिन्यातील दर सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. याचबरोबर येथे अन्य सण-उत्सवही विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात.
हे मंदिर सर्वसामान्य दिवसांत दररोज सकाळी ६ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत भाविकांसाठी खुले असते. महाशिवरात्री उत्सव आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी हे मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले ठेवले जाते.