स्वातंत्र्यपूर्व काळात हैद्राबाद संस्थानचा भाग असलेला राजुरा तालुका १९५९ मध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचा भाग बनला. ऐतिहासिक नोंदींनुसार प्राचीन काळापासून राजुरा हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. त्यामुळे येथे अनेक प्राचीन वास्तू आहेत. राजुरा शहरात १२व्या शतकातील भव्य सोमेश्वर मंदिर आहे. साधारणतः त्याच कालावधीतील देवाडा येथील सिद्धेश्वर मंदिर व येथील १२ हेमाडपंती मंदिरांचा समूह प्रसिद्ध आहे. सिद्धेश्वर मंदिर हे विदर्भासह तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथील मंदिर समूहाच्या जीर्णोद्धारासाठी व नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे २०२३ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या तालुक्याचे शेवटचे गाव असलेल्या देवाडा परिसरात सिद्धेश्वर मंदिर आहे. असे सांगितले जाते की येथे पूर्वी १२ मंदिरांचा समूह होता; परंतु कालौघात त्यातील अनेक मंदिरे भग्न झाली असून केवळ एकच सिद्धेश्वर मंदिर शाबूत आहे. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंदिरांचे भग्न अवशेष आहेत. या अवशेषांवरून ही मंदिरे १२व्या किंवा १३व्या शतकातील असावीत, असा अभ्यासकांचा दावा आहे. निसर्गसमृद्ध वातावरणात व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या ठिकाणी शिवरात्री व श्रावणात मोठे उत्सव होतात. त्यावेळी मराठवाडा व विदर्भासह तेलंगणातूनही लाखो भाविक उपस्थित असतात.
राजुरा–आसिफाबाद मार्गावर देवाडा गाव असून तेथून २ किमी अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे. हा मंदिर समूह बाळाघाटाच्या उतरणीवर आहे. येथील सर्व मंदिरे हेमाडपंती रचनेची असली तरी त्यांच्या स्तंभांवर व भिंतींवर फारसे कोरीवकाम आढळत नाही. या परिसरात अनेक विरगळी व हात जोडलेल्या अवस्थेतील दगडी मूर्ती पाहायला मिळतात. पश्चिमाभिमुख असलेल्या सिद्धेश्वर मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. या मूळ मंदिरासमोर आणखी एक सभामंडप नंतर बांधलेला असून त्यावर पत्र्याची शेड आहे. त्यात एक प्राचीन शेंदूरचर्चित गणेशमूर्ती असून या मूर्तीच्या रचनेवरून ती वाकाटककालीन असावी, असे सांगितले जाते. गणेश मूर्तीच्या बाजूला १२ शिवपिंडी आहेत. या प्रत्येक शिवपिंडींच्या वर अभिषेक पात्र असून त्यांतून सतत या पिंडींवर जलाभिषेक होत असतो. कदाचित येथील भग्न झालेल्या देवालयातील या शिवपिंडी येथे एकत्र ठेवण्यात आल्या असाव्यात.
या सभामंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अनेक प्राचीन मूर्ती ठेवलेल्या दिसतात. त्याही मूर्ती इतर मंदिरांमधील आहेत, असे सांगितले जाते. सभामंडपाच्या मध्यभागी नंदी असून अंतराळात गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर काही शिल्पांचे अंकन आहे. त्यामध्ये एक पद्मासनात बसलेला पुरुष व दुसरे स्त्रीशिल्प आहे. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहातील शिवपिंडी पूर्व व दक्षिण यांच्यामध्ये ईशान्य दिशेला आहे. या प्राचीन शिवपिंडीवर पितळी पत्र्याचे आवरण आहे. मंदिराच्या शेजारी व समोरच्या बाजूला ४ मंदिरे भग्नावस्थेत असून ७ मंदिरे पूर्णतः जमीनदोस्त झालेली आहेत. त्यामुळे या सर्व परिसरात मंदिरांचे मोठेमोठे पाषाण, विरगळी सर्वत्र विखुरलेले दिसतात.
येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अगदी ५० ते ६० वर्षांपूर्वी येथील सर्वच्या सर्व म्हणजे १२ मंदिरे अगदी सुस्थितीत होती. १९६० च्या सुमारास राजुरा–बल्लारपूर मार्गासाठी वर्धा नदीवर पूल बांधण्यात आला. त्यावेळी ठेकेदाराकडून या मंदिर परिसरातील दगडांचा वापर करण्यात आला. त्यामुळे येथील काही मंदिरे पडली व काही भग्न झाली. तेव्हापासून या परिसराचे वैभव संपुष्टात आले असले तरी भाविकांची श्रद्धा मात्र कणभरही कमी झालेली नाही, हे येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येवरून जाणवते.
सिद्धेश्वर मंदिराच्या मागे कुंड असून त्यात बाराही महिने पाणी असते. मार्गशीर्ष महिन्यातील दर शनिवारी व सोमवारी हजारो भाविक या परिसरात जेवण करून त्याचा नैवेद्य सिद्धेश्वराला दाखवितात. पूर्वीपासून ही प्रथा येथे असून आताही ती पाळली जाते. या भागात राहणारी व तेलंगणातील तेलगू मंडळी येथे रविवारी जास्त संख्येने येतात. श्रावणात व शिवरात्रीला हा परिसर भाविकांनी गजबजून जातो.
२०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडून सिद्धेश्वर मंदिर परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले व त्यासंबंधीचा आराखडा व प्रस्ताव २०२३ मध्ये सरकारकडे सादर करण्यात आला. त्यानुसार येथे येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिर समूहाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे निधी देण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून भूमिपूजन करून येथील कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जात समावेश होणार आहे. त्यामुळे पुढील काळात हे स्थान तीर्थक्षेत्रासोबतच महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित होऊ शकेल.
या मंदिरापासून साधारणतः १ किमी अंतरावर येथील डोंगरावर भीवसेन देवस्थान आहे. गोंड समाजाचे ते श्रद्धास्थान आहे. येथे नवसपूर्तीनंतर मातीचे घोडे देवाला वाहण्याची प्रथा आहे. वेळेवर पाऊस पडला नाही वा इतर काही अडचणी असल्यास गोंड भाविकांकडून या देवाला बळी दिले जातात.