सिद्धेश्वर महादेव मंदिर

पिशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर

सिद्धेश्वर याचा अर्थ सिद्धींचा ईश्वर असा होतो. शंकर हा सिद्धेश्वर मानला गेलेला आहे. देशातील सिद्धेश्वर मंदिरांपैकी एक मंदिर पिशोरमध्ये आहे. या मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली हे अज्ञात आहे. मात्र मंदिराची स्थापत्यशैली पाहता असा कयास केला जातो की हे मंदिर अकराव्या ते तेराव्या शतकातील असावे. या काळात महाराष्ट्रात भूमीज शैलीतील मंदिरे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली. नागर आणि द्राविड शैलींची वैशिष्ट्ये एकत्रित आढळणारी ही शैली असून सिद्धेश्वर मंदिरही त्याच शैलीतील आहे.

सिद्धेश्वर या शंकराच्या रुपाबद्दल पुराणांमध्ये अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील एका कथेनुसार, प्राचीन काळी आर्यावर्तात अश्वशिरा नामक राजा राज्य करीत होता. त्याने राजयज्ञ अनुष्ठान करून सिद्धी प्राप्त केली होती. एकदा त्याच्या राज्यात कपिलमुनी आणि जैगीशव्य ऋषींचे आगमन झाले. त्यावेळी राजा त्यांना म्हणाला की विश्वात भगवान विष्णू हे सर्वश्रेष्ठ आहेत, असे म्हटले जाते. मग त्यांना कोणी प्रणाम का करीत नाही? त्यावर दोन्ही ऋषींनी, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? असे म्हणून राजाला राजसभेतच भगवान विष्णूसह संपूर्ण विश्वाचे दर्शन घडविले. त्यांची ती सिद्धी पाहून राजा चकित झाला त्याने विचारले की तुम्हाला ही सिद्धी कोठून प्राप्त झाली. त्यावर ऋषींनी त्याला सिद्धेश्वर महादेवाची कथा सांगितली त्याची पूजा केल्यास अलौकिक सिद्धी प्राप्त होतील, असे सांगितले.

पुराणांनुसार सिद्धेश्वर हा संस्कृत शब्द अशा ६८ स्थानांच्या संदर्भात आहे की जेथे स्वयंभुवलिंग म्हणजेच स्वयंभू शिवलिंग स्थापित आहे. हे शिवलिंग सर्वांत पवित्र मानले जाते. कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते अनादी काळापासून अस्तित्वात असते. त्यामुळेच ते क्षतीग्रस्त झाले तरी त्याच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता नसते. देशभरात अनेक ठिकाणी सिद्धेश्वर रुपातील शंकराची मंदिरे आहेत. अरुणाचल प्रदेशातील हापोली शहरात सर्वांत उंच असे शिवलिंग असून ते सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मराठवाड्यातील टोका कायगाव येथेही सिद्धेश्वराचे एक प्राचीन मंदिर आहे. पिशोर येथील महादेव मंदिरही सिद्धेश्वराचे असून उत्कृष्ट स्थापत्यशैलीचे उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. रत्नेश्वर मंदिर असेही त्यास म्हणतात.

पिशोर गावाच्या मध्यवर्ती भागात एका उंच सपाट टेकडीवरदगडाचे महादेव मंदिरम्हणून ओळखले जाणारे हे मंदिर उभे आहे. महादेव मंदिरांच्या प्रवेशद्वाजवळ नंदीमंडप आहे. त्यामध्ये अखंड दगडातील नंदीमूर्ती आहे. एक पायरी चढल्यावर मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. या मंडपात चार कोरीव स्तंभ दोन्ही बाजूस कक्षासने म्हणजे भाविकांना बसण्यासाठीचे दगडी बाके आहेत. या उंच कक्षासनांच्या मागील पाठ टेकण्याच्या भागांमुळे त्याचा अर्धा भाग झाकला गेलेला आहे वरचा भाग खुला आहे. या रचनेला अर्धखुला मंडप असे म्हटले जाते. या पुढे मंदिराचा बंदिस्त सभामंडप आहे. बाजूला भिंत आणि त्या पुढे काही अंतर सोडून दोन्ही बाजूंनी दगडी स्तंभ असा हा मंडप आहे. हे स्तंभ कोरीव नक्षाकामाने सजलेले आहेत. खाली चौरस, मध्ये कोरीव काम आणि वरच्या बाजूला गोलाकार असा त्यांचा आकार आहे. त्यातील एका स्तंभावर गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणारा कृष्ण हा प्रसंग कोरलेला दिसतो.

विविध वाद्ये वाजविणाऱ्या सूरसुंदरी, यक्ष, उपदेवता यांच्या कोरीव उठावदार मूर्तींनी हे स्तंभ सजवण्यात आले आहेत.

या सर्व स्तंभांवर गोलाकार असा सपाट, कमी उंचीचा भाग म्हणजे पलगई आणि त्यावरतरंगहस्तअसा या स्तंभांचा आकार आहे. स्तंभ जेथे तुळयांच्या खांबांना जोडला जोतो तेथे एकाच बिंदूवर भार केंद्रीत व्हायला नको म्हणून खांबाच्या वर अधिकच्या खुणेसारखे दिसणारे छोटे खांब लावले जातात. त्यांना तरंगहस्त असे म्हणतात. त्यावर कीचक मूर्ती कोरलेल्या आहेत. कीचक हे बुटके, ढेरपोटे, मोठ्या डोळ्यांचे कुरळ्या केसांचे यक्ष असतात. त्यांनी दोन्ही हातांनी वरची तुळई पेलली आहे, असे या शिल्पात दाखवण्यात आले आहे. या कीचकांमुळेच हे मंदिर चालुक्य कालानंतरचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सभामंडपाच्या दगडी तुळयांवरही कोरीव काम केलेले आहे. त्याचे छत आतून नारळाच्या करवंटीसारखे गोलाकार म्हणजेच करोटक वितान पद्धतीचे आहे.

मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार पंचद्वारशाखीय म्हणजे पाच चौकटींचे आहे. या सर्व द्वारशाखांवर अत्यंत बारीक कलाकुसर, तसेच शिल्पमूर्ती कोरलेल्या आहेत. एका शाखेवर विविध वाद्ये वाजविणाऱ्या सूरसुंदरींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या सर्व शाखांच्या खालच्या भागात विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. चौकटीच्या वर द्वारशाखांच्या मधोमध ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. चौकटीच्या वरच्या बाजूच्या तुळईवर समईदीपांच्या आकाराने तयार केलेलेकपोतआहे. घरांच्या छतावरून पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या पन्हाळींना मंदिरस्थापत्य परिभाषेत कपोत असे म्हणतात. चौकटीच्या वरच्या भिंतीवरील भागास उत्तररांग असे म्हणतात. त्यावर विविध देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारास उंच उंबरठा म्हणजेच मंडारक असून त्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे. मंडारकासमोर अर्धचंद्रशिला म्हणजे अर्धचंद्राकारातील पायरी आहे. तेथून आत खाली उतरून गाभाऱ्यात प्रवेश होतो. चौकोनी गर्भगृहात शिवपिंडी आहे. या शिवपिंडीस लिंगभाग सोडून धातूच्या नक्षीदार पत्र्याने मढवलेले आहे.

बाहेरच्या बाजूने हे मंदिर पाहिले असता ते विविध दालने एकत्र करून बांधण्यात आल्यासारखे दिसते. त्यास उंच अधिष्ठान म्हणजे चौथऱ्याचा भाग आहे. त्यावर विविध मोठमोठे स्तंभ एकत्र करून बांधल्यासारखी भिंत आहे. या भिंतीवरही कोरीव काम करण्यात आलेले आहे. मंदिराच्या परिसरातच विठ्ठलरुक्मिणीचे प्राचीन मंदिर आहे. स्थापत्यकलेचा उत्तम आविष्कार असलेल्या या मंदिरात भाविकांसह अनेक अभ्यासकही अनेकदा भेटी देतात.

उपयुक्त माहिती:

  • कन्नडपासून २७ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ६० किमी अंतरावर
  • चाळीसगाव, कन्नड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : पुजारी, मो. ९१७५९१२६७३
Back To Home