सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कुरोली सिद्धेश्वर या गावात असलेले सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा एक महिन्याचा यात्रोत्सव असतो. सातारा जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी ही एक यात्रा समजली जाते. या यात्रोत्सवातील वैशिष्ट्य असे की सिद्धेश्वर महादेवाला बोललेला नवस पूर्ण झाला की भाविकांकडून नवसपूर्तीसाठी या यात्रेत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नवसपूर्तीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्याची ही आगळीवेगळी प्रथा खूपच कमी ठिकाणी पाहावयास मिळते.
मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे ४०० वर्षांपूर्वी कुरोली या गावी राम स्वामी नावाचे एक सत्पुरुष राहत होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर गोसावी. या गंगाधर पंतांचे राम हे ज्येष्ठ सुपुत्र. त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून वडिलांनी त्यांना उच्च विद्याविभूषित केले. त्यामुळे विजापुरी आदिलशहाच्या दरबारात त्यांना मानाची नोकरीही मिळाली. परंतु राम स्वामी यांचा मूळचा पिंड अध्यात्माचा असल्याने त्यांना यवनांची चाकरी करणे पटले नाही म्हणून नोकरी सोडून ते कुरोली येथे येऊन शेती करू लागले. एके दिवशी शेत नांगरताना त्यांचा फाळ मातीत अडकला. कसाबसा तो फाळ काढून स्वामी घरी गेले. त्याच रात्री प्रत्यक्षात महादेवाने स्वप्नदृष्टांत देऊन तुझ्या शेतात माझे स्थान आहे, तेथे मंदिर बांध, अशी आज्ञा केली. स्वप्नदृष्टांताप्रमाणे शोध घेतला असता त्यांना जमिनीत शिवपिंडी आढळली. त्यानंतर येथे स्वामींनी मंदिर बांधले. तेच हे आजचे सिद्धेश्वर महादेव मंदिर होय.
सातारा रहमतपूर रस्त्याने वडूजमार्गे कुरोली या गावात पोहोचता येते. गावाच्या वेशीवर असलेले सिद्धेश्वर मंदिर हे चालुक्य शैलीचे असून नंदीमंडप, गर्भगृह, अंतराळ व सभागृह अशी त्याची रचना आहे. सभागृहाचे प्रवेशद्वार लाकडी आहे. मुख्य मंदिरासमोर नंदीमंडप असून त्यात मध्यभागी असलेल्या दगडी नंदीवर पितळी पत्र्याचे आवरण आहे. प्रांगणात एक दीपमाळ असून हा सर्व परिसर फरसबंदीयुक्त आहे. सभामंडप आयताकृती असून त्याची लांबी सुमारे नऊ मीटर इतकी आहे. या सभामंडपात १४ दगडी चौकोनी स्तंभ आहेत. रंगरंगोटी केल्यामुळे व ठिकठिकाणी लावलेल्या झुंबरांमुळे हा सभामंडप वैशिष्ट्यपूर्ण भासतो.
अंतराळाच्या प्रवेशद्वारावर पितळी पत्र्याचे आवरण आहे. उत्तरेकडील देवळीत श्री राम स्वामी यांच्या पादुका आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवरही पितळी पत्र्याचे आवरण असून ललाटबिंबावर गणेशमूर्ती व खालच्या बाजूला कीर्तिमुख आहेत. प्रवेशद्वाराच्या दक्षिणेकडील देवळीत अंबाबाईची व उत्तरेकडील देवळीत गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात अखंड पाषाणातील स्वयंभू शिवपिंडी आहे. नांगराचा फाळ लागल्याची खूण या पिंडीवर दाखविली जाते. या शिवपिंडीभोवती चांदीच्या पत्र्यापासून बनवलेली नक्षीदार कलाकृती आहे. येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य सांगितले जाते की यावर कमंडलूच्या धारेचा अभिषेक सुरू असताना शिळ वाजल्यासारखा आवाज येतो. त्याला शिवनाद असे म्हटले जाते. शिवपिंडीच्या मागे भिंतीत असलेल्या देवळीत गणेशाची मूर्ती आहे.
गर्भगृहाला लागून असलेल्या एका दगडी खोलीत सिद्धेश्वर महाराजांच्या विश्रांतीसाठी एक लाकडी पलंग व अंथरूण–पांघरूण ठेवण्यात आले आहे. तेथेच महाराजांना पाणी पिण्यासाठी तांब्याफुलपात्र ठेवले जाते. त्या खोलीसमोरील दुसऱ्या खोलीत महाराजांचा मुकुट व उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यात येतात. या मंदिराभोवती लक्ष्मीनारायण, ज्योतिर्लिंग, कालभैरव, विठ्ठल, सूर्यनारायण, खंडोबा इत्यादी देवतांची लहान लहान मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला एक चौकोनी बारव आहे. त्यामध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
ऐतिहासिक नोंदींनुसार, छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तसेच औंधच्या पंतप्रतिनिधींनी या मंदिरात दिवाबत्तीसाठी वर्षासन सुरू केले होते. या मंदिर परिसरात सिद्धेश्वराचा भक्त परशुराम पंत ऐरवाडकर यांचीही समाधी आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
येथील मुख्य उत्सव म्हणजे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा एक महिना चालणारा जत्रोत्सव. या कालावधीत लाखो भाविक सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येतात. यात्रा कालावधीत भाविक एक महिन्याचा उपवास करतात. कार्तिक पौर्णिमेला (त्रिपुरारी) येथे दहीहंडीचा कार्य़क्रम असतो. यावेळी सिद्धेश्वर महाराजांची पालखी निघते. यामध्ये विविध अलंकारांनी सजविलेला सिद्धेश्वर महाराजांचा मुखवटा असतो. पालखीचे वेगळेपण म्हणजे ती धावत म्हणजे खूप वेगाने फिरविली जाते. त्या पालखीसोबत अनेक भाविक धावतात. यावेळी नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून फटाक्यांची मोठी आतषबाजी सुरू होते. ही आतषबाजी दोन ते तीन तास चालते.