सिद्धनाथभैरव व केदारनाथ भैरव मंदिर

दिवेआगर, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये मंदिरांचे स्थान महत्त्वाचे आहे. मंदिरे केवळ उपासनेची ठिकाणे नसून ती गावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा मुख्य आधार असतात. विशेषतः कोकणातील गावांमधील मंदिरांची रचना आणि तेथील प्रथा-परंपरा त्या प्रदेशाचे ऐतिहासिक वैभव स्पष्ट करतात. मंदिरांच्या वास्तुकलेतून तत्कालीन कारागिरी आणि दगडांच्या वापरातील कौशल्य दिसून येते. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे गाव अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथील सिद्धनाथभैरव व केदारनाथ भैरव ही मंदिरे आणि त्यांच्याशी जोडलेल्या श्रद्धा या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या ग्रामदैवतांमुळे दिवेआगरला एक विशेष ओळख प्राप्त झाली आहे.

स्कंद पुराणातील ‘काशी खंड’ या ग्रंथातील माहितीनुसार, भगवान शंकराची राजधानी असलेल्या काशी नगरीच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी आपल्या विविध अंशांवर म्हणजेच भैरवांवर सोपवलेली आहे. काशी नगरी ही प्रामुख्याने विश्वेश्वर, ओमकार आणि केदार या तीन खंडांमध्ये विभागलेली आहे. केदार खंड हा दक्षिण काशीचा भाग मानला जातो आणि या क्षेत्राचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी केदारनाथ भैरव यांच्याकडे असते. जेव्हा एखादा भक्त केदारेश्वराचे दर्शन घेतो, तेव्हा त्याचे दर्शन पूर्ण होण्यासाठी त्या क्षेत्राच्या भैरवाचे पूजन करणे आवश्यक असते. केदारनाथ भैरव हे या क्षेत्राचे कोतवाल म्हणून ओळखले जातात व त्यांच्याच सान्निध्यात सिद्धनाथ भैरव यांचे स्थान असते. याबाबत असे सांगितले जाते की सिद्धनाथ भैरव हे साधकांना सिद्धी प्रदान करणारे आणि मार्गातील अडथळे दूर करणारे मानले जातात.

पौराणिक ग्रंथांनुसार, केदार क्षेत्र हे अत्यंत पवित्र असून तेथे केलेली साधना लवकर फलद्रूप होते. या साधनेला पूर्णत्व मिळवून देण्यासाठी आणि साधकाला आध्यात्मिक अधिकार प्राप्त करून देण्यासाठी सिद्धनाथ भैरव तेथे उपस्थित असतात. केदारनाथ भैरव हे संरक्षणाचे प्रतीक आहेत, तर सिद्धनाथ भैरव हे त्या संरक्षणाखाली मिळणाऱ्या आध्यात्मिक यशाचे म्हणजेच ‘सिद्धी’चे प्रतीक आहेत. या दोन्ही भैरवांचे स्थान जवळ असणे हे भक्त आणि साधक यांच्या सोयीसाठी तसेच त्या क्षेत्राच्या शक्तीचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. काशी खंडाव्यतिरिक्त ‘भैरव तंत्र’ आणि ‘शिव पुराण’ यांमध्येही काशीतील भैरवांच्या स्थानांचे महत्त्व सांगितले आहे. पुराणातील याच संदर्भांप्रमाणे दिवेआगर येथे या दोन भैरवांचे स्थान एकमेकांच्या जवळ आहे.

सुवर्ण गणेशाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवेआगरमध्ये प्रवेश करताच सुवर्णगणेश मंदिराच्या समोर काही अंतरावर पुरातन केदारनाथ भैरव मंदिर दिसते. हे मंदिर पूर्वी ‘भानुकादेवी’ या नावाने ओळखले जात असे. या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर सिद्धनाथ भैरवाचे मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे नाथ संप्रदायाच्या काळातील असावीत, असे मानले जाते. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण अशा जांभ्या दगडाचा वापर करून बांधलेली ही मंदिरे स्थानिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहेत. दोन्ही मंदिरांची रचना जवळपास सारखीच असून त्यांना कौलारू छप्पर आहे. या लहान मंदिरांमध्ये काळ्या दगडाच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारासमोर मोकळे प्रांगण आणि दगडी दीपमाळा आहेत. दोन्ही मंदिरांसमोर गळी फिरवण्यासाठी उंच लाकडी खांब उभारलेले आहेत.

सिद्धनाथ भैरव मंदिरात सिद्धनाथ, भवानी, मुळ सिद्धनाथ आणि द्वारपाल यांच्या मूर्ती आहेत, तर केदारनाथ भैरव मंदिरात श्री केदार लिंग, श्री काळेश्री आणि श्री भवानी यांच्या मूर्तींची स्थापना केलेली आहे. या मंदिरांच्या भिंती अत्यंत साध्या स्वरूपाच्या असून येथे शेंदूर आणि तूप लावून देवाची पूजा करण्याची प्राचीन पद्धत आहे. मंदिरात तेलाचा दिवा सतत पेटता ठेवला जातो. चैत्र शुद्ध चतुर्दशीला श्री सिद्धनाथ भैरवाची आणि पौर्णिमेला श्री केदारनाथ भैरवाची यात्रा भरते. या यात्रेदरम्यान ‘गळी टोचणे’, ‘हातखोडा’ आणि ‘बगाड फिरविणे’ हे परंपरागत प्रकार पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. ढोल आणि झांजांच्या गजरात देवाची परडी आणि मिरवणूक निघते. यामध्ये गावातील मानकऱ्यांचा मोठा सहभाग असतो.

बगाड आणि गळी टोचण्याच्या येथील परंपरेबाबत असे सांगितले जाते की पूर्वी गावात आलेल्या रोगराईपासून सुटका व्हावी म्हणून पांडवांनी ग्रामदैवत सिद्धनाथ भैरवाला चैत्र शुद्ध चतुर्दशीला पाच फेऱ्या गळीवर फिरण्याचा नवस केला होता. त्यानंतर रोगराई संपुष्टात आली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. बगाड प्रक्रियेत भक्ताच्या पाठीच्या त्वचेत लोखंडी गळ अडकवून त्याला पाच ते सहा मीटर उंचीवर फिरवले जाते. हा मान परंपरागत काही विशिष्ट घराण्यांकडेच आहे. हे करत असताना रक्त येत नाही आणि वेदनाही होत नाहीत, असा भाविकांचा अनुभव आहे. तसेच हातखोडा विधीमध्ये इंग्रजी आठच्या आकाराच्या लाकडी खोड्यात दोन हात घालून देवाला प्रदक्षिणा घातली जाते. नवस पूर्ण झाल्यास किंवा भाविक खरे बोलत असल्यास त्या खोड्यामधील खुंटी आपोआप गळून पडते, अशी येथे समजूत आहे.

इ.स. १९२० पूर्वी येथील जत्रांमध्ये रेड्याचा बळी देण्याची प्रथा होती, परंतु ती आता पूर्णपणे बंद झाली आहे. जत्रेच्या दिवशी संपूर्ण गावात मांसाहार वर्ज्य असतो आणि रात्रीच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्तिक वद्य अष्टमीला भैरव जयंतीनिमित्त अभिषेक केला जातो, तर मार्गशीर्ष वद्य अष्टमीला कालभैरवाष्टमी साजरी होते. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि दिवाळी या काळातही मंदिरात विशेष धार्मिक विधी आणि रोषणाई केली जाते.

उपयुक्त माहिती

  • पुण्यापासून १६० किमी अंतरावर
  • श्रीवर्धन येथून १८ किमी अंतरावर
  • पुणे, मुंबई व श्रीवर्धन येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरांपर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : संजय दिवेकर, ट्रस्टी, मो. ८८०५३८८७५६

सिद्धनाथ भैरव और केदारनाथ भैरव मंदिर

दिवेआगर, ताल. श्रीवर्धन, जिला. रायगढ़

Back To Home