पनवेल शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले श्री विरुपाक्ष महादेव मंदिर हे शहराच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. भगवान शंकराची ‘विरुपाक्ष’ या नावाने ओळखली जाणारी मंदिरे संपूर्ण देशात मोजकीच असून कर्नाटकातील हंपीनंतर पनवेलमधील या मंदिराला विशेष महत्त्व आहे. १८व्या आणि १९व्या शतकातील ऐतिहासिक स्थित्यंतरांचे साक्षी असलेल्या या मंदिराने पनवेलच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. शिवाजी रोडवरील गजबजलेल्या भागात असलेले हे देवस्थान आजही भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल हे शहर अत्यंत प्राचीन असून भौगोलिकदृष्ट्या त्याचे स्थान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे.
मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या दरम्यान वसलेले हे शहर ऐतिहासिक काळापासून व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. मुंबईकडून दख्खनच्या पठाराकडे जाण्याचा थेट मार्ग याच शहरातून जात असे. १८०४ मध्ये लॉर्ड व्हॅलेंटिया यांनी पनवेलचे वर्णन डोंगरांनी वेढलेल्या एका सखल प्रदेशात नदीकाठी वसलेले दाट लोकवस्तीचे गाव, असे केले होते. त्यानंतर १८२५ मध्ये बिशप हेबर यांनी या शहराचा उल्लेख एका मंदिरासह असलेले छोटे शहर, असा केला होता.
पनवेल येथील विरूपाक्ष मंदिराचा इतिहास श्रीमंत बापट घराण्याशी प्रामुख्याने जोडलेला आहे. पेशवाईच्या उत्तर काळात पनवेल येथे स्थायिक झालेल्या या घराण्यातील गोविंदराव बापट यांच्या वडिलांनी विरूपाक्ष मंदिर बांधले होते. हे मंदिर साधारण १८७५ सालाच्या सुमारास बांधले असावे, असे मानले जाते. सुरुवातीला हे मंदिर विटामातीचे आणि साध्या स्वरूपाचे होते, परंतु त्याचे जोते मात्र चिरेबंदी होते. या मंदिराला लागूनच समोर एक विशाल पिंपळाचा वृक्ष होता आणि त्याभोवती दगडी चौथऱ्याचा पार बांधलेला होता. या वृक्षाच्या विस्तारामुळे मंदिरात येण्याजाण्यासाठी अडचण होत असे आणि दहा-पंधरा माणसे जरी जमली तरी येथे मोठी गर्दी व्हायची.
या मंदिराची झाडलोट आणि दिवाबत्ती करण्यासाठी नागू भोपी नावाचा सेवक नेमलेला होता आणि त्यांचे वंशज आजही विरूपाक्षाची सेवा करत आहेत. मंदिराच्या खर्चाची आणि महाशिवरात्री व त्रिपुरी पौर्णिमेच्या दीपोत्सवाची जबाबदारी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आईचे वडील म्हणजेच प्रबोधनकारांचे सख्खे आजोबा बाबा पतकी यांच्यापासून पतकी घराण्याकडे आली होती.
मंदिराची व्याप्ती वाढवण्यासाठी व कथा-कीर्तनासाठी सभामंडपाची अत्यंत आवश्यकता होती. परंतु मंदिरासमोर असलेला विशाल पिंपळ वृक्ष त्यात मोठा अडथळा होता. त्या पिंपळावर जागृत मुंजोबा असल्याचे मानले जाई, त्यामुळे तो वृक्ष तोडण्यास कोणीही मजूर तयार होत नसत. पिंपळ तोडणारा निर्वंश होतो, असा तेव्हा समज होता. विरूपाक्षाला सभामंडप असावा, असा बाबा पतकी यांचा ठाम निर्धार होता आणि त्यासाठी लागणारा खर्च करण्याचे वचन श्रीमंत विठोबा अण्णा गुळवे यांनी दिले होते. हा पेचप्रसंग अखेर पनवेलच्या जोशी आळीतील भाऊभट जोशी यांनी सोडवला. भाऊभट आणि त्यांचे वडील आबा जोशी हे दोघेही उत्कट शिवभक्त होते. भाऊभटांनी पिंपळावर पहिला घाव घालण्याची सिद्धता दर्शवल्यामुळे या कार्याला गती मिळाली.
ठरल्यानुसार एका पहाटे विठोबाशेट गुळवे, गोविंदराव बापट आणि गावातील इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भाऊभटांनी विरूपाक्षाची महापूजा केली आणि कुऱ्हाडीचीही पूजा करून पिंपळावर पहिला घाव घातला. भाऊभटांच्या या धैर्यामुळे इतर मजुरांनीही कामाला सुरुवात केली आणि काही दिवसातच सभामंडपासाठी जागा मोकळी झाली. श्रीमंत विठोबा अण्णा गुळवे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून तिथे उत्तम सभामंडप बांधला.
याच काळात बाबा पतकी यांनी आपल्या मातोश्री आणि मावशीच्या स्मरणार्थ मंदिराच्या शेजारी दीपमाळ उभारली. हे सर्व नूतनीकरणाचे काम १८ सप्टेंबर १८८४ (शके १८०६, अश्विन शुद्ध दशमी) रोजी पूर्ण झाले. हा उल्लेख असलेली संगमरवरी शिला आजही मंदिराच्या दरवाजावर पाहायला मिळते.
शिवाजी रोडमार्गे जुन्या तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भर लोकवस्तीत असणाऱ्या या मंदिरासमोर एक विहीर व डाव्या बाजूला पाणपोई आहे. शेजारी दीपमाळ आहे. साधारणतः पाच पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपाच्या पुढे काहीसे उंचावर अंतराळ आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर द्वारपालांच्या प्रतीकात्मक रूपातील पाषाणी नागमूर्ती आहेत. अंतराळात उजवीकडे गणपतीची व डावीकडे हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व त्यापुढे कासवशिल्प आहे. अंतराळाच्या मध्यभागी प्रदक्षिणा मार्ग सोडून एक चौकोनी खोलगट भाग आहे.
येथेच मध्यभागी विरूपाक्ष महादेवाची पिंड आहे. या पिंडीला पितळी नक्षीदार पत्र्याने मढविलेले आहे. पिंडीच्या मागील भिंतीत असलेल्या देवकोष्टकात पार्वती मातेची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्गावर श्रीरामाची मूर्ती, महादेवाची पितळी पिंड व स्वामी समर्थांची प्रतिमा आहे. येथील गर्भगृहात महिलांना प्रवेश नसल्यामुळे त्यांना पूजेसाठी सभामंडपात दुसऱ्या पिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
श्री विरुपाक्ष मंदिरात वर्षभरात अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यात श्रावण महिन्यातील कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होते आणि भगवान शिवाला विशेष अभिषेक केले जातात. या काळात मंदिर परिसरात भजनांचे आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन केले जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला येथे देवाची भव्य पालखी मिरवणूक निघते. १८व्या शतकापासून ही परंपरा चालत आलेली आहे. या दिवशी श्री विरुपाक्ष देवाची मूर्ती पालखीत बसवून शिवाजी रोडवरून संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली जाते. या मार्गावर स्थानिक व्यापारी आणि रहिवासी देवाचे दर्शन घेऊन ठिकठिकाणी आरती करतात. पारंपरिक वाद्ये, लेझीम पथके आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून जाते व ही पालखी शहरातील पुरातन श्री बल्लाळेश्वर मंदिरात नेली जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात पहाटेपासूनच विधींना सुरुवात होते. या दिवशी रात्रभर जागर आणि लघुरुद्र अभिषेक केला जातो. विरुपाक्षाचे दर्शन घेतल्याने सर्व संकटांचे निवारण होते, या श्रद्धेमुळे महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. धार्मिक कार्यक्रमांसोबतच येथे आरोग्य शिबिरे, विविध सामाजिक उपक्रम आणि गरजू भाविकांसाठी अन्नदान केले जाते. त्रिपुरी पौर्णिमेला मंदिरात दीपोत्सव आणि विशेष रोषणाई केली जाते. या व्यतिरिक्त वर्षभरात इतरही लहान-मोठे उत्सव साजरे होतात. दररोज पहाटे साडेपाच ते दुपारी दीड व सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.