पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे गाव म्हणून समुद्र किनाऱ्यालगतचे सातपाटी हे निसर्गसमृद्ध गाव प्रसिद्ध आहे. सुमारे २८००० लोकवस्तीच्या या गावातील १४० वर्षांहून अधिक प्राचीन श्रीराम मंदिर हे जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शक्तिपीठ अशी ओळख असलेल्या या मंदिरात दरवर्षी राम नवमीनिमित्ताने तीन दिवसांची मोठी यात्रा असते. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याचीही विशेष पार्श्वभूमी या मंदिराला आहे. साने गुरुजी व संत गाडगेबाबा यांनीही या मंदिराला भेट दिली होती, अशा नोंदी आहेत.
सातपाटी गावातील श्रीराम मंदिर हे पूर्वीपासून सामाजिक चळवळीचे केंद्र होते. १९३० मध्ये देशात मिठाचा सत्याग्रह सुरू झाला, तेव्हा वडराईपासून सातपाटीपर्यंतचे अनेक कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले होते. असे सांगितले जाते की याच कालावधीत संत आणि समाजसुधारक गाडगे महाराज यांचे या श्रीराम मंदिरात अनेक दिवस वास्तव्य होते. हरिकीर्तनासोबत देशाची सेवाही करा, असे आवाहन महाराज त्यावेळी करत. त्याला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी इंग्रज सरकार विरोधातील आंदोलनांत सहभाग घेतला होता. ‘चले जाव’ चळवळीला पाठिंबा देण्यासाठी १४ ऑगस्ट १९४२ रोजी याच राम मंदिरापासून ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चावर इंग्रज सैन्याने बेछूट गोळीबार केला
व त्यात पालघरमधील गोविंद गणेश ठाकूर, काशिनाथ हरी पागधरे, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र माधव चुरी आणि सुकूर गोविंद मोरे या १७ ते २७ वयोगटातील पाच तरुणांनी बलिदान दिले. त्यातील काशिनाथ पागधरे हा २६ वर्षांचा तरुण सातपाटीतील होता. त्यांनी अगदी समोरून ब्रिटिश पोलिसांच्या गोळ्या झेलल्या होत्या. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हुतात्मा स्मारक गावाच्या समुद्र किनाऱ्यावर सुरूच्या बनात आहे. या हुतात्म्यांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी २६ ऑक्टोबर १९४२ रोजी ब्रिटिश लष्कराची गाडी उडवून देण्याचा धाडसी कट या गावातील क्रांतिकारकांनी रचला होता. त्या वेळी पालघर ते बोईसर दरम्यानचा रेल्वेमार्गाचा मोठा तुकडा त्यांनी काढून टाकला होता. त्यामुळे रेल्वेचे २५ ते ३० डबे खाली कोसळले. सातपाटी येथे सर्व विदेशी वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालून त्या नष्ट करण्यात आल्या होत्या.
पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिरासह राज्यातील सर्व मंदिरांची दारे दलितांसाठी खुली व्हावीत यासाठी ख्यातनाम साहित्यिक व समाजवादी नेते साने गुरुजी यांनी १९४६ पासून आंदोलन छेडले होते. समाजातील जातिभेद व अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींचा विरोध होता. मंदिरांमध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर जनजागृती केली. या काळात त्यांनी सातपाटी व पालघरला भेट दिली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी येथील राम मंदिर दलितांसाठी खुले केले होते.
सातपाटी गावातील बस स्थानकाला लागूनच श्रीराम मंदिर आहे. वैशाख शुद्ध पंचमी शके १८०३ म्हणजेच इ.स. १८८१ मध्ये ग्रामस्थांनी या मंदिराची स्थापना केली होती. मंदिरासमोरच वड व पिंपळाचे दोन प्राचीन वृक्ष आहेत. दुमजली असलेल्या या मंदिराचे स्वरूप अर्धखुला सभामंडप, मुख्य सभामंडप व तीन गर्भगृहे असे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन स्तंभांपैकी डावीकडील स्तंभाच्या वरील बाजूस वशिष्ठ ऋषी व उजवीकडे विश्वामित्र ऋषी यांच्या प्रतिमा आहेत. येथून मंदिराच्या पहिल्या सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा असून त्याच्या बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. मुख्य व दुमजली सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर ‘श्री राम’ अशी मोठी अक्षरे आहेत. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. दुसऱ्या मजल्यावरील सज्जाच्या दर्शनी भिंतीवर नक्षीदार कलाकुसर असलेल्या चौकटी आहेत. त्यात मुख्य गर्भगृहाच्या वरील भागात अर्जुनाचा रथ हाकणाऱ्या श्रीकृष्णाचे भलेमोठे उठावचित्र आहे.
या मंदिराच्या मुख्य व मध्यभागी असलेल्या गर्भगृहातील वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. श्रीराम व लक्ष्मण यांच्या पायाजवळ हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. याशिवाय या तिन्ही मूर्तींच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. या गर्भगृहाबाहेर असणाऱ्या देवकोष्टकांत श्रीराम, लक्ष्मण, सीता, गणेश व हनुमान यांच्या पितळी मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहाच्या डावीकडील गर्भगृहात हनुमानाची मूर्ती आहे तर उजवीकडे गणेशाची मूर्ती आहे. या तिन्ही गर्भगृहांवर शिखरे आहेत.
गुढी पाडव्यापासून तीन दिवस येथे अखंड रामनामाचे आयोजन केले जाते. रामनवमीला तीन दिवसांची मोठी यात्रा भरते. या काळात संपूर्ण गावातच उत्सवी वातावरण असते. यावेळी मंदिराला व मंदिर परिसरात विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. सातपाटीची ओळख मासेमारी करणाऱ्या लोकांचे गाव अशी जरी असली तरी या यात्रोत्सवाच्या काळात येथील समुद्रात तीन दिवस मासेमारी केली जात नाही. नोकरी व व्यवसायानिमित्त परगावी गेलेले येथील ग्रामस्थ तसेच माहेरवाशिणी या जत्रेच्या निमित्ताने आवर्जून येथे येतात. याशिवाय मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांतून हजारो भाविक श्रीराम नामाचा जयघोष करीत या उत्सवासाठी उपस्थित असतात.
श्रीराम मंदिराशिवाय या गावाची जगभरात ओळख आहे ते येथील समुद्रात मिळणारे ‘सरंगा’ (काळा पापलेट) या माशांच्या मच्छीमारीसाठी. रुपेरी रंगाच्या पापलेटशी या माशांचे साम्य आहे; परंतु याचा रंग गडद करडा असतो. पालघरमधून या माशांची जगभरात निर्यात होते. याशिवाय सातपाटी हे ‘इतनी शक्ती हमें देना दाता…’ या प्रसिद्ध हिंदी गीताच्या गायिका पुष्पा पागधरे यांचेही मूळ गाव आहे.