प्रभू श्रीरामचंद्र आणि गोवा-कोंकण या प्रदेशाचे एक वेगळेच नाते आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, सप्त कोकणाची निर्मिती करणाऱ्या परशुरामाने प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाची परीक्षा घेऊन त्यांना आपले धनुष्य दान केले होते. त्याचप्रमाणे या धनुर्दानाच्या वेळी परशुरामाने आपले तेज रामाच्या ठिकाणी संक्रात केले होते. याच परशुरामाच्या भूमीमध्ये श्रीरामाची अनेक मंदिरे पाहावयास मिळतात. त्यातीलच एक सुंदर मंदिर गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लांब समुद्र किनारा लाभलेल्या कोलवाळ नगरीत स्थित आहे. श्रीराम पंचायतनाचे हे मंदिर गोव्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
प्रभू श्रीराम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. गोव्यामध्ये विष्णूची उपासना करणाऱ्या वैष्णव संप्रदायाचा प्रसार इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाल्याच्या नोंदी आहेत. या मुळे गोव्यामध्ये नारायणाची उपासना व्यापक प्रमाणात होताना दिसते. उत्तर गोव्यामध्ये नारायणाची अनेक मंदिरे आहेत. केशव, माधव, वामन, दामोदर, नरसिंह अशा स्वरूपातील विष्णूची मंदिरेही गोव्यामध्ये आहेत.
भारतीय संस्कृती कोशानुसार, गुप्तकाळात म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकात वैष्णव संप्रदायास खूप बळ मिळाले व याच काळात वैष्णव संप्रदायाची रामभक्तिशाखाही वाढीला लागली. रामाच्या सांप्रदायिक रुपांचा विकास गुप्तकाळातच झाला. अकराव्या शतकात सर्वत्र रामोपासना लोकप्रिय झाल्यानंतर गोव्यामध्ये श्रीरामाचीही मंदिरे उभारण्यात आली. त्यातील कोलवाळ येथील श्रीराम पंचायतनाचे मंदिर हे अलीकडचे म्हणजे ८५ वर्षांपूर्वी उभारलेले आहे.
कोलवाळ या गावाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाशीही संबंध आहे. इ.स. १६३५मध्ये पोर्तुगीजांच्या तत्कालिन व्हाइसरॉयच्या आदेशावरून डी-मिगेल डी-नोरोन्हा व कंडे-डी-लिन्हारेस यांनी कोलवाळ येथे किल्ला बांधला. बार्देश परिसरातील बंडखोर देसायांना वठणीवर आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी या भागावर इ.स. १६६७मध्ये स्वारी केली. देसायांनी पोर्तुगीजांचा आश्रय घेतला. तेव्हा महाराजांनी पोर्तुगीजांवरही स्वारी केली व अनेकांना कंठस्नान घातले. कोलवाळ किल्ल्याच्या आडोशाने लढणाऱ्या पोर्तुगीजांना धूळ चारण्यासाठी महाराजांनी या किल्ल्यास वेढा घातला. २० नोव्हेंबर १६६७मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. या काळात सलग तीन दिवस महाराजांनी या गावात वास्तव्य केले होते.
यानंतर काही काळाने हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. पुढे १६८३ मध्ये छत्रपती संभाजी राजांनीही हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला. मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या या गावामध्ये १५ मार्च १९४० रोजी, फाल्गुन शुक्ल षष्ठीच्या मुहूर्तावर वीरत्वाचा आदर्श असलेल्या श्रीरामाच्या मंदिराची स्थापना करण्यात आली.
नारळी-पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेल्या हिरव्यागार परिसरात प्रशस्त प्रांगणात हे मंदिर उभे आहे. मंदिर प्रांगणात ग्रामस्थांनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बांधलेले मोठे सभागृह आहे. त्या पुढे एका चौथऱ्यावर तुळशीवृंदावन आहे. त्या समोर काही अंतरावर श्रीरामाचे उंच व भव्य मंदिर स्थित आहे. गोमंतकीय वास्तुशैलीत उभारलेल्या या मंदिरास महिरपी कमान असलेले उंच प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या दर्शनी भिंतीच्या दोन्ही कोपऱ्यांवर, तसेच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मिळून चार उंच मनोऱ्यासारखे कलशधारी स्तंभ आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस छतावर मोठे घुमटाकार शिखर व त्यावर उंच कलश आहे. गोव्यातील अन्य देवालयांप्रमाणेच या मंदिरास आयताकृती प्रशस्त सभामंडप आहे.
अर्धखुल्या प्रकारच्या या सभामंडपास दोन्ही बाजूंनी कक्षासने आहेत व त्याच्या वरच्या भागात खिडक्या आहेत. येथून आत दोन्ही बाजूंस काही अंतर सोडून स्तंभरांगा आहेत. सभामंडपाच्या छतावर आतील बाजूंनी कागदी झिरमिळ्यांनी केलेली प्रेक्षणीय रांगोळी आहे. येथेच मध्यभागी एक मोठे लाल रंगातील छत्र टांगलेले आहे.
समोरच मंदिराचा अर्धमंडप आहे. त्याच्या दर्शनी भिंतीतील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन मोठ्या महिरपी कमानदार खिडक्या आहेत. त्यांच्या खालच्या बाजूस रामायणातील काही प्रसंग चितारलेले आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस कीर्तिमुख आहे. अर्धमंडपात बाजूने प्रदक्षिणा मार्ग सोडून मध्यभागी मंदिराचे गर्भगृह आहे. संगमरवरी फरशांनी सुशोभित केलेल्या या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास कोरीव नक्षीकाम केलेला चंदेरी पत्रा मढवलेला आहे. त्याच्या द्वारस्तंभांवर मध्यभागी सुंदर मयुराकृती कोरलेल्या आहेत, तर ललाटबिंबस्थानी गणेशाची कोरीव मूर्ती विराजमान आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन देवळ्या आहेत. त्यातील उजवीकडील देवळीत हनुमानाची पाषाणमूर्ती आहे. या मूर्तीस भाविक तेल वाहतात. आत संगमरवरी चौथऱ्यावर चांदीच्या मखरांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. संगमरवरी पाषाणात घडवलेल्या या मूर्तींना वस्त्रे-प्रावरणे आहेत. येथील सीतामातेच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिने आधुनिक पद्धतीची साडी परिधान केलेली आहे. या मूर्तींच्या डावीकडील मखरात गणेशाची, तर उजवीकडील मखरामध्ये हनुमानाची नमस्कार मुद्रेतील मूर्ती विराजमान आहे.
श्रीरामांच्या या मंदिरामध्ये रामनवमी हा सर्वांत मोठा उत्सव दरवर्षी अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात येतो. या उत्सवाच्या वेळी येथे भाविकांची अलोट गर्दी लोटते. या शिवाय येथे महाशिवरात्र व हनुमान जन्मोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. फाल्गुन शुक्ल षष्ठी हा श्रीराम मंदिराचा स्थापना दिन. या शुभदिवशीही येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.