एका शैक्षणिक संस्थेच्या नावाने ओळखले जाणारे मुंबईतील एकमेव उपनगर म्हणजे विद्याविहार होय. या विद्यानगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांना समर्पित असलेले मंदिर आहे. हे मंदिर विद्याविहार आणि घाटकोपर पूर्व परिसरातील विख्यात मंदिरांपैकी एक मानले जाते. रामायणाधारित कार्यक्रम, धार्मिक व्याख्याने आणि मंदिरात साजऱ्या होणाऱ्या विविध सण-उत्सवांमुळे या मंदिराने परिसरातील धार्मिक जीवनात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य असे सांगण्यात येते की येथे गुढीपाडवा या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने विशेष दीपोत्सव आणि अन्नकूट सोहळा आयोजित केला जातो.
विद्याविहार हा परिसर कुर्ला आणि घाटकोपर या दोन उपनगरांमध्ये वसलेला आहे. येथील रेल्वे स्थानकाच्या नावावरून या परिसरास विद्याविहार हे नाव प्राप्त झाले. या स्थानकाच्या नावाचा इतिहास हा येथील करमसीभाई जेठाभाई (के. जे.) सोमय्या शैक्षणिक संकुलाशी निगडित आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगात आपली नाममुद्रा उमटवणारे करमसीभाई हे विख्यात गांधीवादी उद्योगपती होते. ख्यातनाम साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रग्रंथानुसार,
शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेले करमसीभाई हे घरगुती अडचणींमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकले नव्हते. पुढे आपल्या स्वकर्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात साखर उद्योग उभा केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींचा मोठा प्रभाव होता.
आपल्या गरजा भागवून उरलेल्या संपत्तीचा विनियोग विश्वस्त या भावनेने समाजासाठी करावा, ही गांधीजींची शिकवण लक्षात घेऊन त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात ‘सोमय्या ट्रस्ट’च्या माध्यमातून माध्यमिक विद्यालये उभारली होती. यानंतर १९५८ साली एका प्रसंगाने, मुंबईत कला आणि विज्ञान या दोन शाखांचे महाविद्यालय उभारण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी घाटकोपर आणि कुर्ला दरम्यानची जागा त्यांनी निश्चित केली. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईतील ‘व्हिक्टोरिया डॉक’मध्ये ‘एस. एस. फोर्ट स्टिकिन’ या जहाजाचा स्फोट झाला. सुमारे १,४०० टन दारूगोळा आणि ३८२ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा घेऊन आलेल्या या जहाजात सायंकाळी ४ ते ४.२० च्या दरम्यान दोन महास्फोट झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. गोदीच्या परिसरातील असंख्य इमारतींची पडझड झाली. त्यात कच्छी लोहाणा समाजातील अनेकांच्या घरांचा समावेश होता.
अशा बेघर झालेल्या निर्वासितांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्यावेळी करमसीभाई यांनी घाटकोपर व कुर्ला दरम्यानची मोठी जागा खरेदी करून ठेवली होती. तेथील एका भूखंडावर हे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच सुमारास ७ सप्टेंबर १९५९ रोजी सोमय्या विद्याविहार या संस्थेची रीतसर स्थापना करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एन. एच. भगवती हे या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष होते. १८ मार्च १९६० रोजी या नियोजित महाविद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ महाराष्ट्राचे नेते व तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. जून १९६० मध्ये येथे तीन मजली टोलेजंग इमारत उभी राहिली. दुसऱ्याच वर्षी या महाविद्यालयाची विद्यार्थीसंख्या एक हजाराच्या वर पोहोचली. त्या काळात या परिसरातील किरोळ गावातील आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांकडून येथे रेल्वे स्थानक उभारावे, अशी मागणी करण्यात येत होती. करमसीभाई सोमय्या यांनी यामुळे विद्यार्थ्यांचीही सोय होईल या हेतूने या मागणीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या प्रयत्नाने तीन महिन्यांच्या कालावधीत येथे रेल्वे स्थानक बांधण्यात आले. विद्येचे महत्त्व लक्षात घेऊन या स्थानकाला विद्याविहार हे नाव देण्यात आले. सप्टेंबर १९६१ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. मेनन यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले.
येथील श्रीरामाचे मंदिर हे राजावाडी वसाहतीमध्ये वसलेले आहे. ही जागा पूर्वी बडोद्याच्या गायकवाड महाराजांच्या मालकीची असल्याने ती राजावाडी नावाने ओळखली जात असे. १९५० मध्ये ही जागा मुंबई महापालिकेने ताब्यात घेऊन तेथे १९५६ मध्ये परिसरातील नागरिकांसाठी रुग्णालय उभारले. या वसाहतीचा विकास विसाव्या शतकाच्या मध्यापासून होत गेला. या परिसरात प्रामुख्याने मध्यमवर्गीय मराठी, गुजराती आणि दक्षिण भारतीय कुटुंबे स्थायिक झाली. या लोकांनी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी येथे आपले आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाच्या मंदिराची स्थापना केली. या मंदिराचा नेमका इतिहास अनुपलब्ध आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, त्याला किमान सहा ते सात दशकांची परंपरा लाभलेली आहे. अलीकडच्या काळात झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
येथील महात्मा गांधी मार्गालगत स्थित असलेल्या या मंदिराची संरचना दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या सभामंडपाचे छत समतल असून गर्भगृहावर उंच शिखर आहे.
त्यावर सुवर्णरंगी चक्राकार आमलक आणि कलश आहे. दर्शनमंडपात हनुमानाची संगमरवरी पाषाणात बांधलेली देवळी आहे. येथे हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या मागे असलेल्या प्रभावळीच्या स्तंभांवर काही वानरशिल्पे कोरलेली आहेत. या मूर्तीच्या बाजूलाच शनीची मूर्ती आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. त्याच्या प्रवेशद्वारानजीक बाह्यभिंतीवर उजवीकडे शनिश्लोक कोरलेली शिला बसवलेली आहे. त्याच्या भिंतीवरील देवळ्यांत विविध संतांच्या तसेच देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अंतराळाच्या स्तंभांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे.
त्यांत कोरीव मकरतोरणे आहेत. अंतराळातील देवळ्यांमध्ये हनुमान, गणेश आणि कमलादेवीची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारालगत गणेशाची दाक्षिणात्य शैलीतील काळ्या पाषाणातील उभी मूर्तीही विराजमान आहे. गर्भगृहाच्या द्वारचौकटीवर कोरीव नक्षीकाम केलेले असून त्यावर द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत. द्वारचौकटीच्या मंडारकावर अर्धचंद्रशीला आणि कीर्तिमुखे आहेत, तर ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती विराजमान आहे. त्याच्या वरच्या भागात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी यांचे शिल्प आहे. गर्भगृहात उंच अधिष्ठानावरील चांदीच्या मखरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. संगमरवरी पाषाणातील या मूर्तींना वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेले आहे. गर्भगृहातील अधिष्ठानाच्या समोर पंचमुखी हनुमानाची मोठी प्रतिमा आहे.
या मंदिरात सकाळी ६.३० ते दुपारी १ आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ९ या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. शनिवारी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. त्यामुळे या दिवशी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंदिरात देवदर्शन करता येऊ शकते. या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे रामनवमी होय. या दिवशी विशेष अभिषेक, रामजन्म सोहळा, भजन, सुंदरकांड पठण, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या काळात संपूर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट केली जाते. याचप्रमाणे येथे हनुमान जयंतीचा सोहळाही अत्यंत जल्लोषात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. कृष्णजन्माष्टमी, नवरात्र, विजयादशमी या सणांबरोबरच येथे भाविकांची गर्दी होत असलेला सण म्हणजे दीपावलीतील दीपोत्सव. या काळात येथे श्रीरामाच्या अयोध्यागमनाची स्मृती म्हणून विशेष आरती केली जाते. या मंदिरात दर शनिवारी आणि मंगळवारी भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.