श्रीराम मंदिर / हनुमान मंदिर

दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारे दापोली हे पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. ‘बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठया देशातील सर्वात मोठ्या कृषी विद्यापीठामुळे दापोली सर्वत्र प्रसिद्ध आहे. याच शहरात धार्मिकतेची कास धरत, पारंपरिकतेचा वारसा जपत अनेक उत्सव पार पडतात. त्यामध्ये प्रभू आळीतील श्रीराम मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव बाजारपेठेतील पंचमुखी हनुमान मंदिरातील हनुमान जयंती हे मोठे उत्सव मानले जातात.

प्रभू आळीतील श्रीराम मंदिर हे दापोली बस स्थानकापासून पायी दहा मिनिटांवर आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर दापोली शहरवासीयांसह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्रभू आळीत गेल्यावर रस्त्यापासून काहीसे खालच्या बाजूला हे मंदिर आहे. रस्त्यावरील कमानीपासून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या संपूर्ण प्रांगणात भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आलेली आहे. दर्शनमंडप, सभामंडप प्रवेशद्वार अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराशिवाय दक्षिण उत्तरेकडेही प्रवेशद्वारे आहेत. दर्शनमंडपाच्या डावीकडे सोंड उंचावून स्वागत करणाऱ्या एका गजराजाचे मोठे शिल्प आहे.

दर्शनमंडपातून सभामंडपात गेल्यावर तेथील भिंतींवर रामायणातील अनेक प्रसंग चित्रित केलेले दिसतात. त्यामध्ये दशरथ राजा श्रावणबाळ संवाद, पुत्र कामेष्ठी यज्ञ, श्रीराम जन्म, गुरुकुलातील शिक्षण, सीता स्वयंवर, श्रीरामसीता विवाह आदींचा समावेश आहे. या सभामंडपातच प्रदक्षिणेसाठी मार्ग ठेऊन गर्भगृहाची रचना करण्यात आलेली आहे. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस गणपती हनुमान यांच्या पाषाणातील मूर्ती आहेत. गर्भगृहातील एका चौथऱ्यावर श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. लक्ष्मणाच्या शेजारी हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या गळ्यात जानवे कोरलेले आहे. असे सांगितले जाते की पूर्वी येथील मूर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या. त्या जीर्ण झाल्यामुळे नव्याने संगमरवरी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सभामंडपाच्या बाहेर, मंदिराच्या प्रांगणात, एका चौथऱ्यावर शिवपिंडी नंदी आहेत. १९९८ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे.

येथील रामनवमीचा उत्सव हा दापोली शहरात होणाऱ्या उत्सवांमध्ये मानाचा मोठा उत्सव समजला जातो. या उत्सवाची जबाबदारी प्रभू आळीतील रहिवाशांकडेच असते. साधारणतः दोन महिने आधीपासून या उत्सवाची तयारी सुरू होते. गुढीपाडव्यापासूनच कीर्तन, भजन, प्रवचन, हरिपाठ, भक्तिगीते असे कार्यक्रम सुरू असतात. गुढीपाडव्याला मंदिरासमोर मोठी गुढी उभारण्याची प्रथा आहे. रामनवमीच्या दिवशी या मंदिरात देवाचा पाळणा लावला जातो. या पाळण्याच्या दर्शनासाठी दापोलीतील हजारो भाविक मंदिरात येतात. येथून दुपारी दोन वाजता श्रीरामांची भव्य मिरवणूक निघते.

१९६६ साली मुंबई येथील श्रीराम मित्र मंडळातर्फे श्रीराम जन्मोत्सवासाठी श्रीरामांची चांदीची मूर्ती देण्यात आली होती. आजही तीच मूर्ती मिरवणुकीच्या पालखीत विराजमान असते. ढोलताशांच्या गजरात, अखंड रामनामाचा जयघोष करत ही मिरवणूक निघते. ठिकठिकाणी भाविकांकडून या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येतेमिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना ठिकठिकाणी पाणी फराळाचे वाटप केले जाते. दापोली शहरातील मानाची ठरलेली ठिकाणे करून ही मिरवणूक रात्री एक ते दोन वाजता पुन्हा मंदिरामध्ये येते. दुसऱ्या दिवशी लळिताचे कीर्तन आणि भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. याशिवाय वर्षभर मंदिरात विविध कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

श्रीराम मंदिरापासून पायी पाच मिनिटांच्या अंतरावर, जोग नदीच्या काठावर, २५० वर्षांपूर्वीचे स्वयंभू पंचमुखी मारुतीचे मंदिर आहे. मुख्य बाजारपेठेत असलेले हे मंदिर दुमजली, कौलारू जुन्या धाटणीचे आहे. हे मंदिरही रस्त्यापासून काहीसे खाली असून मंदिरासमोर आटोपशीर प्रांगण भोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या गर्भगृहात असलेली हनुमानाची मूर्ती कै. अभय पुरी यांना १५० वर्षांपूर्वी स्वतःच्या जागेत खोदकाम करताना सापडली होती. त्यांनी त्यांच्या घराशेजारीच झोपडीवजा मंदिर बांधून त्यात या मूर्तीची तेव्हा प्रतिष्ठापना केली होती. या हनुमानाचा महिमा दापोली परिसरात वाढू लागला, तशी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये वाढ होत गेली. कालांतराने त्या लहानशा मंदिराचे रूपांतर सध्या असलेल्या मोठ्या मंदिरात झाले. हे मंदिर दापोली शहरातील सर्व मंदिरांमध्ये अत्यंत मानाचे समजले जाते. दररोज शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. शनिवारी वा सुटीच्या दिवशी हीच संख्या हजारांमध्ये असते.

मंदिराच्या गर्भगृहात असलेली स्वयंभू पंचमुखी हनुमानाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीचे पाय दिसत नाहीत, केवळ मानेचा वरचा भाग दिसतो. समोरच्या बाजूला दीड फूट उंचीचे मुख, बाजूने दोन, मागील बाजूस एक शिंगासारखा भाग दिसतो. त्यात एक चांदीच्या मुकुटाखाली एक, अशी पाच मुखे या मूर्तीला आहेत. दापोलीतील हजारो नागरिकांची या मारुतीवर श्रद्धा असल्याने येथील हनुमान जयंतीचा उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

रामनवमीपूर्वीच मंदिराची सजावट केली जाते. छताकडील भागाला पताकांची सुंदर आरास करण्यात येते, गर्भगृहातील हनुमानाची मूर्ती विविध अलंकार पुष्पांनी सजविली जाते संपूर्ण मंदिरावर रोषणाई केली जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे हनुमानाची आरती होतेपूर्वापार प्रथेप्रमाणे सकाळी वाजता येथील कीर्तन सुरू होते. पहाटेच्या या कीर्तनालाही शेकडो दापोलीकर उपस्थित असतात. सूर्योदयाच्या वेळी जन्मकाळ साजरा होताना हनुमंताची न्हाणी पाळणा पार पडतो. विधी पार पडल्यावर हनुमानाची मूर्ती असलेल्या रथाची मंदिराला प्रदक्षिणा होते भव्य मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीत खालुबाजा, धावजीचा बाजा, ढोलताशे यांचा गजर सुरू असतो. पंचमुखी हनुमानाचा हा रथ प्रथम प्रभू आळीतील श्रीराम मंदिरात जातो. तेथे पूजा आरती झाल्यानंतर मिरवणुकीसोबत आलेल्या भाविकांना चहा फराळाची व्यवस्था केली जाते. श्रीराम मंदिरातून रथ बाहेर पडल्यानंतर मध्यरात्री ही मिरवणूक मंदिरात परत येते. दुसऱ्या दिवशी सकाळी लळित कीर्तन पार पडल्यावर या उत्सवाची समाप्ती होते.

या मोठ्या उत्सवाव्यतिरिक्त हनुमान मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा, चैत्र शुद्ध द्वादशीला महारुद्र, श्रावण कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव गोपाळकाला, अश्विन शुद्ध दशमीला दसरा, कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा, माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्र इत्यादी उत्सव साजरे होतात.

उपयुक्त माहिती:

  • दापोली बस स्थानकापासून ७०० मीटर अंतरावर
  • मुंबई, ठाणे, पुणे येथून दापोलीसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने दोन्ही मंदिरांपर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • राम मंदिर, संपर्क : श्रीराम वर्तक, गुरव, मो. ९४२२५४७५९२
Back To Home