गजानन महाराज मंदिर

गारखेडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर


आधुनिक काळात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या थोर संतांच्या नामावलीत शेगावचे गजानन महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचेच एक सुंदर मंदिर ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांची नगरी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरात आहे. भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचण्याचा संदेश देणाऱ्या गजानन महाराजांच्या सेवेशी समर्पित असलेले हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आकर्षक बांधणी, स्वच्छता, भक्तिरसपूर्ण वातावरण ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत. गजानन महाराज प्रगट तसेच निर्वाण दिनीगण गण गणात बोतेया मंत्रांचा येथे अखंड जप करण्यात येतो

गारखेडा येथील हेडगेवार रुग्णालयाजवळ हे आकर्षक मंदिर आहे. लांबूनच मंदिराची भव्य वास्तू आणि त्यावर असलेली अनेक पांढऱ्या रंगाची शिखरे लक्ष वेधून घेतात. पूर्वी श्री क्षेत्र शेगाव ते पंढरपूर अशी दिंडी निघत असे. १९७६ पासून ही दिंडी दरवर्षी छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेच्या इमारतीमागील मैदानावर मुक्कामी येत असे. त्या वेळी तेथे गजानन महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दाखवला जात असे. शेगावप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्येही गजाजन महाराजांचे भव्य मंदिर असावे, असे परिसरातील भाविकांना वाटत होते. या कल्पनेतूनच प्रा. श्रीधर वक्ते (स्वामी दिव्यानंद सरस्वती) यांच्या पुढाकारातून १९८१ मध्ये मंदिराच्या विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. प्रा. वक्ते हे या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर लोकसहभागातून वर्गणी जमवून मंदिरासाठी जमीन विकत घेण्यात आली. १९८४ पासून मंदिराच्या उभारणीस सुरुवात झाली. शेगाव संस्थानाचे तत्कालीन विश्वस्त, व्यवस्थापक शिवशंकर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.

मंदिर उभारण्यासाठी निधी कमी पडत असल्याने १९८७ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आर. डी. बर्मन, किशोरकुमार आणि आशा भोसले यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला. मंदिराचे काम सुरू असतानाच १९८९ मध्ये गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती महाराजांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. सोहळ्यास गजानन महाराजांचे हजारो भक्तभाविक उपस्थित होते. त्यावेळी येथे . .. वासुदेव महाराजांचे प्रवचनही झाले. १९९४ मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, तर २०१८ मध्ये मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.

गजानन महाराजांचे हे मंदिर उंच जोत्यावर बांधण्यात आले आहे. १० पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. उजव्या डाव्या बाजूला सभामंडपात येण्यासाठी जाण्यासाठी पायऱ्यांची रचना आहे, तर मध्यभागी दर्शनमंडप आहे. त्यापुढे खुला सभामंडप, गर्भगृह, गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग गर्भगृहाखाली तळघरात असलेले गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप आयताकृती असून त्यात अनेक गोलाकार स्तंभ आहेत. दोन स्तंभांमधील कमानीवरील चारी बाजूंनी एक रुंद सफेद पट्टी आहे त्यावर पिरॅमिडच्या आकाराचे छत आहे. कमानीवरील पट्टीवर गजानन महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग उठावशिल्पांच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस उजवीकडे गजानन महाराजांची मोठी प्रतिमा आहे. गर्भगृहाच्या चौकोनी लाकडी प्रवेशद्वाराच्या वरील भागात ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. स्टीलच्या सळ्या लावलेल्या या दारास मध्येच एक गोल महिरपी आकाराचे मोठे नक्षीदार गवाक्ष आहे. त्यातून दुरूनच विठ्ठलरुक्मिणीचे मुखदर्शन होते. कर कटावर ठेऊन उभ्या असलेल्या विठ्ठलरुक्मिणीच्या प्रसन्न मुद्रेतील या मूर्ती गर्भगृहात संगमरवरी वज्रपीठावर प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. या मूर्तींसमोर मध्यभागी एका चौरंगावर गजानन महाराजांचा चांदीचा मुखवटा ठेवलेला आहे.

येथील गर्भगृहाच्या मागच्या बाजूने खाली तळघरात असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या गर्भगृहातील मोठ्या संगमरवरी ओट्यावर वज्रपीठ आहे. त्यावर तीन फूट उंचीची गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. ही मूर्ती खास राजस्थानमधून बनवून आणण्यात आलेली आहे. मस्तकी मंदिल परिधान केलेल्या या मूर्तीच्या मागे आकर्षक नक्षीकाम असलेला मखर आहे. मूर्तीसमोर महाराजांच्या पादुका आहेत. उत्सवांच्या वेळी येथे आकर्षक आरास करण्यात येते. जवळच एका खोलीत गजानन महाराजांच्या लाकडी खडावा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामागे मध्यभागी महाराजांची प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या डावीकडे गणेश, तर उजवीकडे तुळजाभवानी यांच्या प्रतिमा आहेत. गजानन महाराज मंदिराच्या मागील बाजूस पुरातन अश्वत्थ (पिंपळ) वृक्ष आहे. हा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील एका श्लोकातअश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षिणां नारदः गंधर्वानां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः।।असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेले आहे. त्यात सर्व झाडांमध्ये मी पिंपळाचे झाड आहे, असे ते सांगतात. गजानन महाराजांनाही अश्वत्थ वृक्ष अत्यंत प्रिय होता. १९०८ मध्ये नागपूर येथील गोपाळराव बुटी यांच्या वाड्यात वास्तव्यास गेले असताना महाराज त्या परिसरातील एका पिंपळाच्या झाडाखाली नेहमी जाऊन बसत असत.

या मंदिराची स्थापत्य शैली ही द्राविड पद्धतीची आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या सुरुवातीच्या भागावर दोन लहान शिखरे दर्शनमंडपावर एक मोठे अशी तीन शिखरे आहेत. दर्शनमंडपावरील शिखर रुंदाकार आहे. एकावर एक लहान होत जाणारे चौरस मांडून हे पिरॅमिडच्या आकाराचे शिखर तयार करण्यात आले आहे. त्यावर द्विस्तरीय आमलक आणि वर कळस आहे. त्यामागे सभामंडपावर एक कमी उंचीचे चौकोनी शिखर आहे. येथील गर्भगृहाच्या वर असलेले शिखर हे मंदिराचे मुख्य शिखर आहे. ते द्राविडी शैलीचे असून त्यावर मोठा आमलक आणि कळस आहे. या मुख्य शिखराच्या दोन्ही बाजूला आणखी दोन लहान शिखरे आहेत. अशी एकूण सात शिखरे या मंदिरावर आहेत

मंदिरात माघ वद्य सप्तमीला गजानन महाराजांचा प्रगट दिन तसेच ऋषिपंचमीला निर्वाण दिन सोहळा साजरा होतो. या दोन्ही दिवशी मंदिरात साधक भाविकांची गर्दी असते. प्रकट दिन सोहळ्याच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अमृताभिषेक झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते. या दिवशी याग तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. प्रगट दिन सोहळ्यानिमित्त येथे हरिकीर्तन, भागवत कथा पठण, ज्ञानेश्वरी पारायण गजानन विजयग्रंथ पारायण होते. या सोहळ्याप्रसंगी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. दिवाळीदरम्यान येथे भव्य दीपोत्सव होतो. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात येते. रांगोळीसमोर दिवे उजळवले जातात. मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे येथे वेळोवेळी आरोग्य व्याख्यानमाला शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती

  • मध्यवर्ती बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • छत्रपती संभाजीनगर शहर परिवहन सेवेच्या 
  • बस उपलब्ध व खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दू. ०२४० २३४३४००
  • ईमेल : shrigajananmandir@gmail.com
Back To Home