श्री क्षेत्र महाबळेश्वर / पंचगंगा मंदिर,

महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असले तरी या शहराला ऐतिहासिक धार्मिक महत्त्व आहे. महाबळेश्वरमध्ये महादेवाला समर्पित असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर १२१५ साली बांधले गेले होते. मंदिराचे वैशिष्ट्य असे की जानेवारी १६६५ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाहेब जिजाबाई यांची या मंदिरात सुवर्णतुला करून ते सोने गरिबांना दान दिले होते. याच वेळी वयोवृद्ध असलेले महाराजांचे राजनैतिक सल्लागार सोनोपंत डबीर यांचीही येथे सुवर्णतुला करण्यात आली होती.

महाबळेश्वर मंदिराला लागून पंचगंगा मंदिर आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांचा येथे उगम होतो. यासंदर्भात आख्यायिका अशी की आज जेथे महाबळेश्वराचे मंदिर आहे त्या परिसरात ब्रह्मदेवाने एक यज्ञ केला होता. साजशृंगारासाठी वेळ लागल्याने या यज्ञाच्या समारोपासाठी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री वेळेवर येऊ शकली नाही. मुहूर्त टळून जाऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने दुसरी पत्नी गायत्रीला घेऊन समारोपाचा विधी पार पाडला. तेवढ्यात सावित्री तिथे आली आणि आपल्याशिवाय सुरू असलेले यज्ञकर्म पाहून ती संतप्त झाली. त्याच क्षणी तिने ब्रह्मा, विष्णू महेश या तिघांना तुम्ही नदी व्हाल, असा शाप दिला. त्यानंतर तसाच शाप विष्णूने सावित्रीला दिला तू अधोगतीकडे जाशील, असे सांगितले. ब्रह्मदेवाने कोयना, विष्णूने कृष्णा, महादेवाने वेण्णा आणि गायत्रीने सरस्वती अशी नदी रूपे घेतली. या सर्व नद्या पूर्ववाहिनी बनल्या; परंतु सावित्री मात्र विष्णूच्या शापामुळे कड्यावरून उडी टाकून (अधोगती) पश्चिमेकडे कोकणातून वाहू लागली. या सर्व नद्यांचा उगम महाबळेश्वर येथून झाल्यामुळे हे स्थान पंचगंगा मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

स्कंद पुराणामधील सह्याद्री खंडातील उल्लेखानुसार, या परिसरात देवांनी यज्ञ सुरू केला; परंतु महाबळ अतिबळ या राक्षसांनी त्यात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. सर्व देवांच्या विनंतीवरून विष्णूने अतिबळ राक्षसाचा वध केला; परंतु इच्छामरण असलेल्या महाबळाचा वध करणे विष्णूला शक्य झाले नाही. त्यावेळी देवांनी आदिशक्ती महामायेचे स्तवन करून तिची मदत मागितली. आदिशक्तीने महाबळावर आपली मोहिनी टाकली त्याला देवांकडे आणले. या मोहिनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे महाबळाने देवांनाच वर मागण्यास सांगितले. त्यावेळी देवांनी त्याचा मृत्यू होईल, असा वर मागितला. महाबळाने नाईलाजाने देवांना तो वर दिला; परंतु मी येथे पर्वतरूपाने वास्तव्य करेन, त्यावर ब्रह्माविष्णूमहेश यांनीही वास्तव्य करावे, असा त्याने देवांकडे वर मागितला. देवांनी त्याची इच्छा मान्य करून विष्णूने अतिबळेश्वर, ब्रह्माने कोटेश्वर आणि महादेवांनी महाबळेश्वर नावाने येथे वास्तव्य केले.

ऐतिहासिक नोंदींनुसार, श्रीक्षेत्र महाबळेश्वराचे मंदिर हे देवगिरीच्या सिंघणराजाने बांधलेले आहे, तर येथील पंचगंगा मंदिर हे चंद्रराव मोरे यांच्या घराण्याने बांधले आहे. असे सांगितले जाते की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर त्यांच्या तंबूचे कळस कापून आणून या मंदिरांना अर्पण केले होते. या मंदिराजवळ १६४४ साली समर्थ रामदासांनी हनुमान मंदिराची स्थापना केली मठ बांधला. या मठामध्ये रामदास स्वामींचे दुर्मिळ असे धोतर नेसलेले चित्र आहे.

श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर हे आताच्या जुन्हा महाबळेश्वरमध्ये आहे. संपूर्ण दगडी बांधणीतील हे मंदिर पिरॅमिडप्रमाणे भासते. दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे असणारी ही मंदिर शैली महाराष्ट्रात क्वचितच दिसते. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराला पश्चिम, उत्तर दक्षिण या दिशांना तीन प्रवेशद्वारे आहेत. पश्चिमेकडे असलेल्या प्रवेशद्वारावर या मंदिराचा जीर्णोद्धार १९५१ साली केल्याची नोंद आहे. प्रशस्त सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगडामध्ये केलेले असून भाविकांना दर्शन घेणे सोयीचे जावे यासाठी सभामंडपात स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहे. सभामंडपात श्री कालभैरवाची मूर्ती गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अंतराळात भलामोठा प्राचीन अखंड दगडात कोरलेला नंदी आहे. गर्भगृहात सुमारे सहा फूट लांबीचे रुद्राक्षाच्या आकाराचे खडबडीत असे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामुळे या शिवपिंडीला महालिंग असेही म्हटले जाते.

महाबळेश्वर मंदिरापासून पूर्वेकडे खालच्या बाजूला कृष्णामाई मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला दोन्ही बाजूने प्रत्येकी चार समोरील बाजूस तीन ओवऱ्या आहेत. या मंदिरातील सर्व खांबांवर सारखेच नक्षीकाम आहे. मंदिरासमोर पायऱ्या असलेले चौकोनी कुंड आहे. त्यामध्ये मंदिराकडील गोमुखातून कायम पाणी पडत असते. असे सांगितले जाते की पंचगंगा मंदिरातील कृष्णा नदीचे पाणी या गोमुखातून येथील कुंडात पडते. या मंदिराच्या आतील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. त्यामध्ये कालियामर्दन, बाळकृष्ण त्याच्या सवंगड्यांसोबत खेळतानाची शिल्पे पाहायला मिळतात. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी असलेल्या खोलगट भागात आयताकृती शाळुंका असलेले शिवलिंग आहे. त्याच्या लिंगाचा भाग हा डमरूच्या आकाराचा आहे. त्यावर खालच्या बाजूला फणा काढलेले ५२ नाग आहेत, तर मध्यभागी ४८ मण्यांच्या तीन रुद्राक्ष माळा आहेत.

महाबळेश्वर मंदिरात महाशिवरात्र नवरात्रोत्सव असे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. सकाळी ते रात्री पर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. दररोज सकाळी वाजता आणि सायंकाळी .३० वाजता महाबळेश्वराची आरती होते. महाबळेश्वरासोबतच येथील अतिबळेश्वराचे मंदिरही ८०० वर्षे प्राचीन असून यामध्ये विष्णूस्वरूप लिंग आहे. याच परिसरात असलेल्या काडसिद्धेश्वर आश्रमात दुपारी १२ ते या वेळेत येथे आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • पाचगणीपासून १७ किमी, तर साताऱ्यापासून ६१ किमी अंतरावर
  • महाराष्ट्रातील अनेक भागांतून महाबळेश्वरसाठी एसटी खासगी वाहतूक 
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home