शिवस्वरूप नारायणदेव बाबा संस्थान

वाकी देवाची, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर

वाकी देवाची गावाच्या उंच रंगीत वेशीतून प्रवेश करून काही अंतर पुढे आल्यावर शिवस्वरूप नारायणदेव बाबा संस्थानचे प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात बसवलेली तीन छोटी मंदिरे आणि त्यामागे दूरवरून दिसणारी मंदिराची उंचच उंच शिखरे त्यावर असणारी गरुडविमानाची प्रतिकृती दिसते. नारायणदेव बाबा यांनी स्थापन केलेल्या मंदिर समूहांनी सजलेला हा सर्व परिसर आहे. नारळाची उंच झाडे, केळीच्या बागा यामुळे निसर्गरम्य झालेल्या या परिसरातील विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे यास देवभूमी या नावानेही संबोधण्यात येते.

नारायणदेव बाबा बल्लाळ हे आधुनिक काळातील साधुपुरुष होते. खुलताबाद तालुक्यातील पानडी हे त्यांचे मूळ गाव. तेथे .. १९३२ च्या मार्गशीर्ष महिन्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भगवान नरसिंहाचे भक्त होते. त्यामुळे त्यावरूनच बाबांचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. लहानपणापासून धार्मिक प्रवृत्तीचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. अध्यात्माकडे त्यांचा ओढा होता. असे सांगितले जाते की त्यातूनच त्यांनी वाकी देवाचीनजीक असलेल्या धारेश्वर येथील एका गुहेत जाऊन तब्बल एक तप तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे भगवान शिवेश्वरांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. यानंतर बाबांनी वाकी देवाची येथे येऊन यज्ञ केला. स्थानिक भाविकांकडून असे सांगितले जाते की या यज्ञाच्या वेळी साक्षात् शिवेश्वर येथे उपस्थित राहिले होते. त्यावेळी ते पोपटाच्या अवतारात आले होते आणि बाबांच्या हातावर येऊन बसले होते. बाबांना धारेश्वराने साधूच्या रूपात दर्शन दिले होते. त्या दिवसापासून त्यांना सिद्धी प्राप्त झाली. तसेच त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचाही साक्षात्कार झाला होता.

बाबांबद्दल अशीही एक कथा सांगण्यात येते की ते येथे आले तेव्हा त्यांच्यावर देव प्रसन्न आहे, या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसेना. तेव्हा त्यांनी एक चमत्कार दाखवला. या ठिकाणी त्यांनी एक होम केला आणि त्या होमाच्या अग्नीत उडी मारली; परंतु तरीही त्यांच्या देहाला काहीही इजा झाली नाही. या चमत्कारानंतर लोकांची त्यांच्यावर श्रद्धा जडली. यानंतरही बाबांच्या दैवी चमत्कारांची अनुभूती भाविकभक्तांना होत गेली आणि त्यांच्याकडे परिसरातील असंख्य लोक आकर्षित झाले. वाकी देवाची येथे भजन, कीर्तन, प्रवचन, यज्ञयाग आदी धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येऊ लागले. या क्षेत्री भाविकांना एकाच वेळी विविध देवदेवतांचे दर्शन व्हावे, या हेतूने बाबांच्या नेतृत्वाखाली येथे विविध मंदिरांची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये अमरनाथ, लक्ष्मीनारायण, अग्निनारायण, शेषनारायण, बालाजी सूर्यनारायण या मंदिरांचा समावेश आहे. या ठिकाणी पूर्वी शिवेश्वराचे साधे मंदिर होते. नारायणदेव बाबा येथे येऊन पूजाअर्चा, तपश्चर्या करीत असत. नंतर त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून मोठे मंदिर बांधले. २९ मार्च १९७९ हा या मंदिराचा स्थापनादिन आहे.

गावातीलशिवस्वरूप नारायणदेव बाबा प्रवेशद्वारातून आत येताच सर्वप्रथम दिसते ते हेच शिवेश्वर महादेव मंदिर. सभामंडप, गर्भगृह, त्यावर तीन मजली शिखर आणि त्यावर गरुडविमानाची भव्य मूर्ती अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर दगडी नंदी असून त्यापुढे असलेल्या पाच पायऱ्या चढल्यावर सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस भिंतीवर जयविजय या द्वारपालांच्या प्रतिमा चितारण्यात आल्या आहेत. सभामंडप समतल छत असलेला त्यातील स्तंभ महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपातही नंदीची मूर्ती आहे. ती आकाराने मोठी संगमरवरी पाषाणात कोरलेली आहे. त्यापुढे लोखंडी जाळीदार कठडा उभारण्यात आला आहे. त्यापुढे मंदिराचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वरच्या बाजूने अर्धगोलाकारात सात नागांच्या उभारलेल्या फण्यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. आत एका चौथऱ्यावर पाषाणातील शिवपिंडी आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस खेटून शंकराचा पितळी मुखवटा आहे. भिंतीवर नारायणदेव बाबा यांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील काचांची सजावट. वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या काचांनी तयार केलेल्या सुंदर नक्षींनी मंदिराच्या आतील भिंती आणि छताची सजावट केलेली आहे.

शिवेश्वर मंदिराच्या समोर असलेले मंदिर म्हणजे अनेक देवदेवतांच्या मंदिरांचा समूह आहे. उंच चौथऱ्यावर बांधलेल्या या मंदिरास महिरपी कमान असलेले प्रवेशद्वार आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी हत्तीच्या उंच मूर्ती बसवलेल्या आहेत. मंडपाच्या भिंतीलगत एका शेजारी एक असे चौकोनी खोल्यांसारखे गाभारे आहेत. त्यात लक्ष्मीनारायण, श्रीदत्त, श्रीरामलक्ष्मणसीता, राधाकृष्ण, भगवान शंकरास अन्न देत असलेली अन्नपूर्णादेवी, संत ज्ञानेश्वर, केदारनाथ, विठ्ठलरुक्मिणी या देवतांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

शिवेश्वर मंदिराच्या बाजूला अमरनाथ मंदिर आहे. हे मंदिरही उंच अधिष्ठानावर म्हणजेच जोत्यावर बांधलेले आहे. मंदिरास आठ पायऱ्या आहेत. लाकडी कोरीवकाम केलेल्या प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन दगडी सिंहमूर्ती आहेत. एखाद्या मोठ्या सभागृहासारखा मंदिराचा मंडप असून आत नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात संगमरवरी शिवपिंडी आहे. असे सांगितले जाते की या पिंडीवरील लिंगप्रतिमा ही हिमालयातील बाबा अमरनाथ गुहेत बर्फापासून तयार होत असलेल्या शिवलिंगाची प्रतिकृती आहे.

महाराष्ट्रात मोजकीच सूर्यनारायण मंदिरे आहेत. मुंबईतील भुलेश्वर, पंढरपूर येथील नारायण चिंचोली, रत्नागिरीतील कशेळी, सिंधुदुर्गमधील परुळे ही त्याची काही उदाहरणे आहेत. सूर्यनारायणाचे असेच एक भव्य मंदिर येथेही उभारण्यात आले आहे. मंदिरास काचेरी सजावट केलेल्या दोन गोलाकार स्तंभांवर उभा असलेला अर्धमंडप (पोर्च) आहे. प्रवेशद्वार उंच रुंद असून त्यावर गोलाकार कमान केलेली आहे. मंदिराचा सभामंडप आणि गाभारा यांची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपाच्या मधोमध हे गर्भगृह आहे. त्यात उंच ओट्यावर उभारलेल्या मोठ्या संगमरवरी देव्हाऱ्यामध्ये सप्तअश्वारूढ रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची संगमरवरी मूर्ती आहे. सभामंडपाच्या भिंतीमध्ये देवकोष्ठे तयार करण्यात आली आहेत. त्यात गजानन महाराज, नर्मदा देवी, प्रजापिता ब्रह्म, गणेश आदींच्या मूर्ती प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत. तसेच सभामंडपात एका चौथऱ्यावर त्र्यंबकेश्वराची पिंडी नंदीही आहे. येथील शिवलिंग हे मुखलिंग स्वरूपात आहे त्यावर फणा उभारलेला पितळी नाग आहे. सूर्यनारायण मंदिरासही काचेरी नक्षीकामाने, काचांतून तयार केलेल्या विविध भौमितिक आकारांनी सजवण्यात आले आहे. मंदिरास उंच शिखर आहे.

या मंदिराप्रमाणे येथील शेषनारायण मंदिराचीही रचना आहे. येथेही काचेची सजावट केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंस प्रतिहारींच्या मूर्ती आहेत. लाकडी कोरीव काम केलेल्या रुंद दरवाजातून मोठ्या आयताकृती सभामंडपात प्रवेश होतो. तेथील भिंतीतील देवकोष्ठांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. गाभाऱ्यात शेषशायी नारायणाची मूर्ती आहे. या समोरच श्री बालाजीचे मंदिर आहे. तेही काचेच्या नक्षीकामाने सजविलेले आहे. मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी चार गोलाकार खांब आहेत. मंडपाच्या भिंतींवर नारायणदेव बाबा यांची विविध मुद्रांतील आणि प्रसंगांतील मोठमोठी छायाचित्रे लावण्यात आली आहेत. गर्भगृहात चौथऱ्यावर बालाजीची कृष्णपाषाणात कोरलेली मूर्ती आहे.

या सर्व मंदिर परिसराच्या मधोमध नारायणदेव बाबा यांचे मंदिर आहे. २८ ऑगस्ट २०१७ रोजी, वयाच्या ९३व्या वर्षी नारायणदेव बाबांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे समाधी मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर गोलाकार उंच अधिष्ठानावर बांधलेले आहे. त्याच्या मधोमध गोलाकार गाभारा आहे. त्याभोवती सर्व बाजूंनी गोल कोरीव स्तंभांचा आधार दिलेला प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गाच्या समतल छतावर खालच्या बाजूने सुंदर नक्षी कोरलेली आहे. मंदिराच्या बाहेरून भिंतींवरही कोरीव काम आहे. प्रवेशद्वारासमोर लहानसे तुळशी वृंदावन आहे. द्वार चौकोनी आहे. त्यास उंच उंबरठा म्हणजेच मंडारक आहे. त्यास अर्धचंद्रशिला आहे. येथील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गाभाऱ्यात एका उंच चौथऱ्यावर अभयमुद्रेमध्ये बसलेली नारायणदेव बाबा यांची मोठी मूर्ती आहे.

नारायणदेव बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दरवर्षी येथे भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यात कीर्तन, प्रवचन, भजन आदी कार्यक्रम होतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करण्यात येते. येथे महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते. ही यात्रा महाशिवरात्रीच्या आधी आठ दिवस सुरू होते महाशिवरात्रीस समाप्त होते. यात्रेस हजारो भाविक उपस्थिती लावतात. येथे गुरुपौर्णिमा, गुढीपाडवा, नवरात्र हे उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. येथे शिवेश्वर तसेच अमरनाथ मंदिर असल्याने दर सोमवारीही येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • कन्नड येथून ३६ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ७० किमी अंतरावर
  • सिल्लोड, फुलंब्री येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : प्रमोद जोशी, पुजारी, मो. ९६७३१६८१७८
Back To Home