दक्षिणेतील कैलास अशी ख्याती असलेले माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजी राजे (शहाजी महाराजांचे वडील व शिवाजी महाराजांचे आजोबा), शहाजी राजे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज येथे दर्शनाला येत असत. सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या डोंगररांगांमध्ये हे देवस्थान असून ते नवसाला पावणारे आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर हे समुद्रसपाटीहून ३४४५ फूट उंच टेकडीवर आहे, म्हणून त्याला ‘शिखर शिंगणापूर’ असे म्हणतात. या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की एकदा कैलास पर्वतावर महादेव व पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी नारद तेथे आले व त्यांनी सुचविले की जो कोणी यात हरेल, त्याने वैराग्य स्वीकारायचे. यामध्ये महादेव तीन वेळा हरले. ठरल्याप्रमाणे वैराग्य धारण करून महादेव पुढे व पार्वती मागे, असा सह्याद्रीच्या डोंगररांगांतून त्यांचा प्रवास सुरू झाला. शिंगणापूर येथे आल्यावर महादेव एका ठिकाणी लपून बसले, तेव्हा पार्वतीला ते आठ ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दिसले. त्यानुसार येथे आठ लिंगांची स्थापना झाली. या अष्टलिंगांचे दर्शन एका दिवसात घेतल्यास पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. या ठिकाणी महादेव व पार्वतीने चैत्र शुद्ध अष्टमीला पुन्हा लग्न केले होते, असे सांगितले जाते. त्यामुळे दरवर्षी या तिथीला येथे त्यांचा विवाह सोहळा पार पडतो, या उत्सवात सहभागी होण्यासाठी यावेळी लाखो भाविक शिंगणापूरला येतात.
शिखर शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे हाल होत होते. त्यावेळी मालोजी भोसलेंनी गावात मोठा तलाव बांधला त्याला पुष्करतीर्थ असे म्हणतात. या तलावाच्या दगडी भिंतींवर अनेक प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत. येथील मूळ मंदिर यादव काळातील चक्रवर्ती सिंधनदेव राजाने बांधल्याचे सांगितले जाते. १७३५ साली छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. यावेळी त्यांनी मंदिराच्या पश्चिमेकडे शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मृतिमंदिरे बांधली. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकांमध्ये शिवपिंडी आहेत. १९७८ साली पुन्हा एकदा शिखर आणि मंदिराची डागडुजी करण्यात आली होती. शंभू महादेवांचे हे मंदिर खासगी मालकीचे असून छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे त्याची मालकी आहे.
डोंगरावर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी जुना पायरी मार्ग आहे. काही वर्षांपूर्वी नव्याने गाडीरस्ताही बनविण्यात आला असून त्यावरून थेट मंदिरापर्यंत जाता येते. पायरीमार्गावरून येण्यासाठी १५० पायऱ्या आहेत. या मार्गावर १६ मीटर उंचीचा एक भव्य दरवाजा आहे, त्याला शेंडगे दरवाजा म्हणतात. असे सांगितले जाते की २०० वर्षांपूर्वी हा दरवाजा एका भक्ताने बांधला होता. या दरवाजाच्या कमानीतून शिखरावरील मंदिराचे दर्शन होते. शंभू महादेवाच्या मंदिराभोवती काळ्या पाषाणातील तटबंदी आहे. हेमाडपंती रचनेच्या या मंदिरात जाण्यासाठी तटबंदीतून चार प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या आवारात नगारखाना, ओवऱ्या तसेच गणेश व श्रीकृष्ण यांची लहान मंदिर आहेत. येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर पूर्वजांच्या नावाने डंका पिटण्याची प्रथा आहे. मंदिरासमोर डाव्या व उजव्या बाजूला उंच दीपमाळा असून त्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. याशिवाय आणखी दोन लहान दीपमाळा आहेत.
मुख्य मंदिराचा पाया हा चांदणीच्या आकाराचा असून त्यावर मंदिर उभे आहे. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या मंदिरात जाण्यासाठीही तीन प्रवेशद्वारे आहेत. नंदीमंडपासमोर चांदीच्या पत्र्याने मढविलेली, महादेवाला शरण गेलेली पार्वतीची मूर्ती आहे. येथील सभामंडप आकाराने काहीसे लहान असून तेथील स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. त्यात पुराणातील अनेक प्रसंग, शिकारीची दृश्ये व मैथुनशिल्पे कोरलेली आहेत. या स्तंभांच्या वरील भागावर भारवाहक यक्ष आहेत. खुल्या प्रकारच्या सभामंडपात कक्षासने (सभामंडपात कडेने बसण्यासाठी तयार केलेले दगडी ओटे) आहेत. येथील गर्भगृहाच्या समोरील बाजूस धातूचे पाच नंदी व दोन मोठ्या घंटा आहेत. या घंटांवर १६७० व १७२० असे साल कोरलेले आहे. नंदीच्या समोर दगडांत एक अष्टकोनी आकृती कोरलेली आहे. असे सांगितले जाते की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५१ साली सक्तीने मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते. सभामंडपाच्या छतावर १०० पाकळ्यांचे एक मोठे कमळ कोरलेले आहे.
गर्भगृहाचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविलेला आहे व त्याच्या कमानीवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृह काहीसे खाली असल्यामुळे पायऱ्या उतरून जावे लागते. येथील चौकोनी आकाराची शिवपिंडी स्वयंभू मानली जाते आणि त्यावर दोन शाळुंका आहेत. शिव व शक्ती यांचे ते प्रतीक मानले जाते. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर, शिखरावर अनेक देवी–देवता, ऋषी, नर्तिका व अप्सरा यांची शिल्पे आहेत. रंगकामामुळे ही सर्व शिल्पे आणखी खुलून दिसतात. मंदिराच्या शिखरावर असणारा मुख्य कळस हा सोन्याचा असून त्या बाजूला आणखी चार कळस आहेत.
गुढीपाडव्यापासून (चैत्र शुद्ध प्रतिपदा) १२ दिवस डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमावन येथे शिखर शिंगणापूरची यात्रा भरते. यामध्ये चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री १२ वाजता महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडतो. या दिवशी शंभू महादेव मंदिराचा कळस ते अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत ५५० फुटांची जाड दोरी बांधली जाते, याला ‘पागोटे’ असे म्हणतात. ही दोरी महादेवाच्या लग्नातील आहेर मानली जाते. उमावनात प्रत्येक गावासाठी एक एक झाड दिलेले आहे. यात्रा कालावधीत गावकरी आपापल्या झाडापाशी जमतात आणि यात्रेचा आनंद लुटतात. अशाप्रकारे गावाला झाड नेमून देणारी ही दुर्मिळ यात्रा असावी.
चैत्र शुद्ध द्वादशी म्हणजे यात्रेच्या अखेरच्या दिवशी महादेवाला अभिषेक घालण्यासाठी मुंगी घाटातून खाच–खळगे, दगड–धोंड्यांच्या कठीण वाटेवरून कावडींमधून पाणी आणले जाते. यामध्ये मानाची कावड ही तेल्या भुत्याची असते. (पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शिवभक्त संत तेल्या भुत्या हे येथे कावड घेऊन येत असत) या कावडीला दोन मोठे रांजण लावलेले असतात. कावड देवाकडे नेत असताना भाविक ‘म्हाद्या (महादेवा) धाव, मला सांभाळ’ अशी साद घालतात. कावड वर चढवत असताना हलगी, तुरे व लेझीमच्या तालावर भाविक तल्लीन होऊन नाचतात. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी लाखो भाविक येथे उपस्थित असतात. या कावडीतील पाण्याने रात्री १२ वाजता शंभू महादेवाला अभिषेक घातला जातो. त्यानंतर येथील यात्रेची सांगता होते.
दररोज सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत भाविकांना येथे शंभू महादेवाचे दर्शन घेता येते. मंदिर परिसरात दररोज दुपारच्या वेळी आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो.