शीतलादेवी मंदिर

केळवे, ता. पालघर, जि. पालघऱ

इसवी सनाच्या बाराव्या शतकात महिकावती म्हणून ओळखले जाणारे आणि चंपानेरच्या गोवर्धन बिंब राजाचा भाऊ प्रताप बिंब याच्या सत्तेचे केंद्रस्थान असलेले गाव म्हणजे केळवे-माहिम. येथील निसर्गरम्य केळवे बीचपासून हाकेच्या अंतरावर शीतलादेवीचे प्राचीन व प्रसिद्ध देवस्थान आहे. या मंदिराजवळ वालुकेश्वराचे स्वयंभू शिवलिंग असून त्यासमोर श्रीरामांनी बाण मारून सिद्ध केलेले कुंड आहे. श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणी शीतलादेवीचे स्वयंभू स्थान आहे. क्षत्रिय तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील अनेक कुटुंबियांची कुलस्वामिनी असलेली ही देवी जागृत, नवसाला पावणारी व विविध आजारांचे निवारण करणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागांसह गुजरात, राजस्थानसारख्या राज्यांतूनही दररोज हजारो भाविक तिच्या दर्शनासाठी येतात.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संपादित केलेल्या ‘महिकावतीची बखर’ या प्राचीन ग्रंथात केळवे या गावाचा इतिहास नमूद आहे. या बखरीनुसार व अन्य ऐतिहासिक पुराव्यांनुसार, इ.स. ११३८ मध्ये चालुक्यांचा मांडलिक असलेल्या चंपानेरच्या गोवर्धन बिंब राजाने आपला भाऊ प्रताप बिंब याला उत्तर कोकणवर स्वारी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोन वर्षांनी पूर्ण तयारीनिशी इ.स. ११४०मध्ये प्रताप बिंब हा पैठण, नेवासे, जुन्नर या रस्त्याने दवणप्रांतात (दमण) उतरला. दमण जिंकून त्याने नंतर तारापूरहून पुढे जात केळवे-माहिमवर चढाई केली. त्यावेळी येथे विनाजी घोडेल हा स्थानिक राजा राज्य करीत होता. त्याला हटवून प्रताप बिंबाने केळवे-माहिम जिंकले तेव्हा या प्रांताची अत्यंत दुर्दशा झाली होती. महिकावतीच्या बखरीत याविषयी असे म्हटले आहे, की ‘तारापुरा पासोन यावतू महिकावती प्रविष्ट जाले ।। तेथे राजा विनाजी घोडेल ।। त्यास दूर करोन ।। राजा महिकावतीस राहिला ।। देशाची जमा पाहिली ।। देश उद्दश ठाइ ठाइ अतिशूद्र घोडेल नीचयाती उघडे लोक देखोन विचार मांडिला ।। जर या देशी भले लोक असते तर देश वसाईत होईल ।। ’ यानुसार नंतर प्रताप बिंबाने येथे भले-भले मराठे व ब्राह्मण लोक आणून देशाची वसाहत केली.असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या केळवेमध्ये शीतला देवी या संरक्षक, भाग्यकारक आणि आरोग्यदायी अशा देवतेचे सुप्रसिद्ध मंदिर आहे.

शीतला किंवा शितळामाता ही लोकदेवता असून, ती दुर्गेचा अवतार मानली जाते. शीतलादेवीच्या वंदनामंत्रातून तिच्या स्वरूपाचे दर्शन होते. हा मंत्र असा आहे – ‘वन्देsहंशीतलांदेवीं रासस्थांदिगम्बराम् । माक्जनीकलाशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम् ।।’ याचा अर्थ असा, की ‘गर्दभावर विराजमान, दिगंबरा, हातात झाडू तसेच कलश धारण करणाऱ्या, सूपाने अलंकृत मस्तक असलेल्या शीतला देवीस मी वंदन करतो.’ या श्लोकानुसार या देवीचे वाहन गाढव असून, तिच्या हातात झाडू आणि कलश आहे. यावरून ही स्वच्छतेची देवी असल्याचे मत व्यक्त केले जाते. संस्कृतमध्ये शीतला या शब्दाचा अर्थ जी थंडावा देते ती असा होतो. या देवीबाबत अशी धार्मिक धारणा आहे, की ही देवी लहान मुलांस होणाऱ्या ज्वर, गोवर आणि कांजण्या या आजारांचा नाश करणारी देवता आहे.

येथील देवीच्या स्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते, की सध्या शीतलादेवीचे मंदिर आहे त्याच्या समोरच्या बाजूस बगलवाडी नावाची वाडी होती. तेथे देवीचा गुप्त स्वरूपात वास असे. एकदा गावातील एका शेतकऱ्यास देवीचा स्वप्नदृष्टान्त झाला. त्याची माहिती गावातील गोपाळपंथीय लोकांना समजताच त्यांनी देवीच्या स्थानाचा शोध घेतला. एका विवरात त्यांना देवीची मूर्ती सापडली. त्याच ठिकाणी त्यांनी या मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली. तेथे लहानसे मंदिर बांधले. असे सांगतात की अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

केळवा बीचपासून पाच मिनिटांच्या अंतरावर शीतलादेवीचे हे मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ व शांत आहे. मंदिरासमोर दोन मोठ्या दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या मागील बाजूस रामकुंड आहे. या रामकुंडाबाबत अशी अख्यायिका आहे, की रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेला जाण्याआधी श्रीराम ‘कर्दलीवाह’ (आताचे केळवे) येथे विश्रांतीसाठी थांबले होते. शिवभक्त असलेल्या श्रीरामांना येथील शिवपिंडीला अभिषेक घालायचा होता. त्यासाठी त्यांनी बाण मारून हे कुंड निर्माण केले. आजही याच कुंडातील पाणी मंदिरातील पुजेसाठी वापरले जाते. या कुंडातील जल प्राशन केल्यास सर्व आजारांवर तसेच संकटांवर मात होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कुंडाच्या सभोवती प्रत्येक राशी व नक्षत्रांप्रमाणे झाडे लावण्यात आली आहेत.

जमिनीपासून काहीशा उंच जगतीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पाच पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ शीतलादेवी आणि तिच्या सहा बहिणींचा भाऊ असलेल्या गोवळाचे स्थान आहे. मुख्य मंदिरात जाण्यासाठी मंदिराच्या दर्शनी भागात दोन प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांजवळ मुखमंडपांची रचना आहे. प्रवेशद्वारांच्या वरील बाजुस कलश आणि समई अशी मंगल प्रतिकांची उठावशिल्पे आहेत. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील बंदिस्त सभामंडप हा भलामोठा असून भाविकांच्या सुविधेसाठी त्यात दर्शनमार्गाची व्यवस्था आहे. सभामंडपाच्या समोरील बाजुला दोन गर्भगृहे आहेत. यातील उजवीकडे असलेल्या गर्भगृहात शीतलादेवीची मूर्ती आहे. अखंड दगडात कोरलेल्या या शेंदूरचर्चित मूर्तीच्या एका हातात चांदीचा झाडू तर दुसऱ्या हातात शीतल जल असलेले पात्र आहे. सौम्य, शीतल प्रकृतीच्या या वस्त्रालंकारित देवीचे कपाळ मोठे आहे. देवीच्या माथ्यावर चांदीचा मुकुट व मूर्तीमागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे.
गर्भगृहाबाहेरील भिंतीवर असलेल्या देवकोष्ठकांत पार्वती व सिद्धिविनायक यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या गर्भगृहात वालुकेश्वर महादेवाची पिंडी आहे. शीतलादेवीच्या स्थापनेपूर्वीपासून हे शिवलिंग येथे आहे, अशी मान्यता आहे. दुष्काळादरम्यान या शिवलिंगाची पूजा केल्यास काही दिवसांतच पाऊस पडतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की पूर्वी एक भुजंग (साप) या लिंगाभोवती विळखा मारून बसत असे. मात्र, मंदिरात गर्दी वाढू लागल्यानंतर तो मंदिर परिसरात वास्तव्य करू लागला. आजही त्याचे अनेक भक्तांना दर्शन होते.

नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या शीतलादेवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येथे येतात. नवसपूर्तीसाठी अनेक भाविकांकडून देवीला सोन्या-चांदीच्या वस्तू व दागिने अर्पण केले जातात. दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते.

येथे चैत्र पोर्णिमेला तीन दिवसांची यात्रा असते. या तीन दिवसांत मंदिरात विविध कार्यक्रम होतात. तिसऱ्या दिवशी देवतांच्या मूर्तींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. उत्सवकाळात पूर्वी देवीस बकऱ्या आणि कोंबड्यांचा बळी दिला जाई. मात्र १९६५मध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन पशुहत्येची ही प्रथा बंद केली. त्या ऐवजी आता उत्सवाची सांगता करताना कोहळ्याचा बळी दिला जातो.
नवरात्रोत्सवातील नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या काळात देवीसमोर सुंदर आरास केली जाते. या उत्सवादरम्यान देवीला स्नान घातले जात नाही. तिचे केवळ पाय धुतले जातात. अशी मान्यता आहे की या काळात देवी युद्धात गुंतलेली असते. विजयादशमीच्या दिवशी देवीला स्नान घालण्यात येते. कारण ती दानवांचा वध करून शांत झालेली असते. विजयादशमीच्या दिवशी मंदिरात सीमोल्लंघन केले जाते. त्रिपुरारी पोर्णिमेच्या दिवशी येथे होणाऱ्या दीपोत्सवादरम्यान परिसर दिव्यांनी उजळून निघतो. महाशिवरात्रीला येथील शिवलिंगावर रुद्राभिषेक करण्यात येतो. येथे हनुमान जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी होते. येथे माघी गणेशोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिराच्या प्रांगणात एक हनुमान मंदिर आहे. नजीकच इ.स. १८४९ मध्ये बांधलेले राम मंदिरही आहे.

उपयुक्त माहिती

  • पालघरपासून १२ किमी, तर सफाळेपासून १५ किमी अंतरावर
  • पालघर येथून केळवेसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९३९५८९२८२४
  • वेबसाईट : https://kelwashitladevi.org
Back To Home