रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात तुरंबव येथे विद्येची देवता असलेल्या शारदादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. शारदादेवीचे कोकणातील हे एकमेव मंदिर आहे. तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगरांमध्ये वसलेल्या मंदिराची उभारणी राजस्थानी पद्धतीने करण्यात आली आहे. अपत्यप्राप्तीच्या नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी देवी, असा शारदादेवीचा लौकिक आहे. येथील उत्सव, देवीची ख्याती व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यावरून राज्य सरकारनेही या मंदिराचा तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन गौरव केला आहे.
मुंबई–गोवा महामार्गावरील सावर्डेनजीकच्या वहाळ फाट्यावरून तुरंबव येथे येता येते. शेजारून वाहणारी कापशी नदी, गर्द झाडी व नागमोडी रस्त्यांमुळे हा परिसर सुंदर भासतो. प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदी असलेल्या प्रांगणात आल्यावर संगमरवरी दगडांमध्ये बांधकाम करण्यात आलेले हे दुमजली मंदिर लक्ष वेधून घेते. दहा वर्षांपूर्वी दीड कोटी रुपये खर्चून राजस्थानी पद्धतीने मंदिराची गावच्या पूर्वेकडे नव्याने उभारणी करण्यात आलेली आहे. मंदिराच्या प्रांगणातील उद्यानात अनेक शोभेची झाडे व फुलझाडे लावली असल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
मुखमंडप, प्रशस्त सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सुमारे ४५ फूट लांब व ३४ फूट रुंद असलेला सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा (बाजूने भिंती नाहीत) आहे. संगमरवरी फरशा व येथील खांबांवरील आकर्षक रंगसंगतीमुळे सभामंडप सुंदर व प्रसन्न भासतो. सभामंडपात हातात वीणा घेऊन मोरावर आरुढ झालेल्या शारदादेवीची सुंदर प्रतिमा आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस असलेल्या गर्भगृहात लांब ओट्यावर शुभ्र संगमरवरी मखराचे चार भाग असून त्यामध्ये ग्रामदेवता वरदायिनी, मानाई, चंडिका यांच्या मूर्ती व मध्यभागी शारदादेवीची मूर्ती आहे. पाचवी मूर्ती गौरीची असून ती लहान आहे. ती फक्त नवरात्रीच्या उत्सवावेळी गर्भगृहात ठेवली जाते व तिची पूजा केली जाते. येथील सर्व मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत. येथील दर्शनमंडपाला अष्टकोनी शिखर व गर्भगृहाला असलेल्या उंच शिखरावर अनेक शिखरांच्या व त्यावर असलेल्या कळसांच्या प्रतिकृती आहेत.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत येथे होणाऱ्या नवरात्रोत्सवात परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. या उत्सवानिमित्त मंदिराला केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघतो. नोकरी–व्यवसायानिमित्त राज्यातील विविध भागांत स्थायिक झालेले येथील ग्रामस्थ या उत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात. अपत्यप्राप्तीसाठी देवीला नवस बोलल्यास देवी तो नवस पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे उत्सवकाळात नवस बोलण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक येतात.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या रुप्याच्या मूर्तीची, तसेच शारदादेवीचे रूप असलेल्या गौराई देवीची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तींना विविध वस्त्रालंकाराने शृंगारले जाते. विजयादशमीपर्यंत हा साज तसाच ठेवला जातो. पहिल्या दोन दिवसांत देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य, भजन, दिंडी आदी कार्यक्रम होतात. तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून दर्शन व देवीची ओटी भरण्याचे कार्यक्रम होतात. रात्री नऊ वाजता देवीची महाआरती होते. त्यानंतर दीपारत्यांचे नृत्य व पारंपरिक जाखडी नृत्य होते. विशिष्ट प्रकारचे धोतर, कमरेला रंगीत शेला, डोक्यावर मराठेशाही पगडी, पायात चाळ असा पारंपरिक पेहराव करून गावातील मानकरी उघड्या अंगाने या नृत्यात सहभागी होतात. त्यानंतर प्रत्यक्ष नवस करण्याचा व फेडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तो पहाटे पाच वाजेपर्यंत चालतो. नवस करण्यासाठी येथे टोकन दिले जातात. देवीकडे केलेल्या नवसानंतर अपत्यप्राप्ती झालेले भक्त विविध वयोगटांतील बालकांना घेऊन देवीचरणी नतमस्तक होतात. त्यानंतर विजयादशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
विजयादशमीला मंदिरात सोने लुटण्याचा मोठा सोहळा होतो. यावेळी गावातील घराघरांत नवरात्रोत्सवादरम्यान नऊ दिवस रूजवलेले धान्य (रोव) एकमेकांना दिले जाते. दुसऱ्या दिवशी, एकादशीला पहाटे नवीन आलेल्या हुरड्याचे भक्तांना वाटप केले जाते. हा हुरडा घरातील धान्यात मिसळल्यास धान्यवृद्धी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सकाळी दहाच्या सुमारास महाप्रसाद वाटल्यानंतर उत्सवाची सांगता होते.
नवरात्रोत्सवाबरोबरच येथे श्रावण शुद्ध चतुर्दशी (जागर पौर्णिमा), आश्विन कृष्ण चतुर्दशी (दिवाळी), मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा (देवदेवाळी) व फाल्गुन पौर्णिमेला शिमगोत्सव साजरा केला जातो. भक्त व पर्यटकांना राहण्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात भक्त निवासाची सुविधा करण्यात आलेली आहे. येथील पर्यटन वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फेही येथे निवास–न्याहारी योजना सुरू करण्यात आलेली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत भाविकांना शारदादेवीचे दर्शन घेता येते.