शांतादुर्गा हे पार्वतीचे रूप असून विष्णू व महादेवाच्या युद्धात जग विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले तेव्हा ब्रह्मदेवाने पार्वतीला या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याची विनंती केली. देवीच्या मध्यस्थीने दोघांमधील युद्ध थांबले व शांतता प्रस्थापित झाली म्हणून देवी शांतादुर्गा नावाने संबोधली जाऊ लागली. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील काही प्रांतात शांतादुर्गा देवीची पूजा केली जाते. गोवा व कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात वारुळाच्या रुपात देवीची पूजा केली जाते तर काही गावांमध्ये या देवीची विशाल मंदिरे उभी आहेत. यापैकीच देवीचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर गोव्यातील धारगळ गावात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराचा इतिहास सुमारे ४५० वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. येथील मूळ मूर्ती त्याहून अधिक प्राचीन आहे. पूर्वी ही मूर्ती म्हापसा येथील तळेवाडा भागातील मंदिरात होती. पोर्तुगीज सरकारच्या काळात मंदिरांना धोका निर्माण झाल्यानंतर मूर्ती साकळे गावात नेण्यात आली. परंतु तेथेही सुरक्षिततेची खात्री न वाटल्याने मूर्ती सावंतवाडीच्या राजांच्या छत्रछायेखाली धारगळ या गावी १५३७ साली आणण्यात आली. त्याच वेळी या ठिकाणी मंदिर उभारून मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे पंचायतन देवस्थान आहे व येथील इतर मंदिरेही तितकीच प्राचीन आहेत. शांतादुर्गा हे कालिका, चामुंडा देवीचे रूप आहे व ही उग्र देवता गोव्याच्या भूमीत येऊन शांत झाली म्हणून तीस शांतादुर्गा नाव पडले, अशीही अख्यायिका सांगितली जाते.
मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची मोठी स्वागतकमान आहे. कमानीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन चौकोनी स्तंभ असून स्तंभांवर सज्जा आहे. सज्जावर अर्धचंद्राकार बाशिंग व त्यावर मध्यभागी एक व दोन्ही कडे दोन अशी एकूण तीन शिखरे आहेत. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराभोवती असणाऱ्या भक्कम तटबंदीत मागील व पुढील बाजुला असलेल्या प्रवेशद्वारांतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मुख्य प्रवेशद्वार दुमजली आहे व त्याच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आणि आतील बाजूला लाकडी छत आहे.
मंदिराच्या मागील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन भक्कम स्तंभ आणि त्यांवर सज्जा आहे. सज्जावर मध्यभागी गोपुरम् पद्धतीचे उंच शिखर व दोन्ही बाजूला दोन लहान शिखरे आहेत.
मंदिराचे प्रशस्त प्रांगण पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे. प्रांगणात प्राचीन तुलसी वृंदावनात गरुड शिल्प आहे. प्रांगणात षटकोनी चौथऱ्यावर नऊ थरांची षटकोनी दीपमाळा आहे. दीपमाळेच्या शीर्षभागी एक महाशिखर व सहा लघूशिखरे आहेत. याशिवाय प्रांगणात प्राचीन बांधणीची अग्रशाळा आहे व त्यात सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. प्रांगणात असलेल्या दुमजली भक्त निवासात भाविकांसाठी सुसज्ज अशा तीस खोल्या आहेत. याशिवाय येथे मंगल कार्यालय सभागृह आहे.
सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप पूर्णखुल्या स्वरूपाचा आहे. प्रांगणापेक्षा उंच असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारात अर्धचंद्राकार तोरण आहे. सभामंडपात गोलाकार स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात मधल्या स्तंभांच्या मधील जमीन खोलगट आहे व येथे भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.
सभामंडपात लहान मेघडंबरीत शिवपिंडी स्वरूपात नितकारी देव आहे. पंचायतन देवस्थान व पंचक्रोशीच्या रक्षणाची जबाबदारी या देवावर असल्याचे सांगितले जाते.
पुढे मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. मुख्य सभामंडप दुमजली आहे. मुख्य सभामंडपात प्रत्येकी सहा गोलाकार स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत व कमानीवर वरील मजल्याचा सज्जा आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या स्तंभशाखा व त्यावरील तोरण चांदीचे आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख आहे. गर्भगृहात वज्रपिठावर शांतादुर्गा देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. ही मूर्ती अलीकडील काळात घडवली असल्याचे सांगितले जाते.
देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या मागील दोन हातात नागपाश, पुढील एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात पानपात्र आहे. डोक्यावर मुकुट व मुकुटामागे सप्तफणी नाग कोरलेला आहे. मूर्तीच्या मागील पाठशिळेवर आडव्या धारेच्या नक्षी आहेत.
मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत मध्यभागी कीर्तीमुख व दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी आहेत. मूर्ती चांदीच्या मखरात विराजमान आहे व मखरातील स्तंभांवर गजतोरण आहे. वज्रपिठापुढे चांदीच्या सिंहासनावर विराजमान देवीची चांदीची उत्सवमूर्ती आहे. ही मूर्ती पालखी सोहळ्यावेळी पालखीत ठेवण्यात येते. शांतादुर्गा देवीच्या उजव्या बाजूला वज्रपिठावर सातेरी देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या देवीचे मूळ स्थान म्हापसा येथे असल्याचे सांगितले जाते. देवीच्या मागील बाजूला इतर स्थानिक देवतांची पाषाणे आहेत. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. त्याचा खालील पहिला थर चौकोनी आहे. दुसरा गोलाकार थर उंच व वर निमुळता आहे. शिखराच्या शीर्षभागी अमलक, कळस व ध्वजपताका आहे.
या मंदिराच्या शेजारी महादेवाचे कौलारू मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात शिवपिंडी, गणेश मूर्ती व इतर स्थानिक देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. या मंदिराच्या बाजूला दंडपाणेश्वर देवालय आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील गर्भगृहात वज्रपिठावर दंडपाणेश्वर देवाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याशिवाय येथे रवळनाथ, रामशेट खलप मूळ पुरुष यांची समाधी ही मंदिरे आहेत.
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. फाल्गुन शुद्ध चतुर्दशी, श्रावणी सोमवार आदी प्रसंगी देवीचा पालखी उत्सव साजरा केला जातो. या वेळी देवीची ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, पालखी मिरवणूक काढण्यात येते. रथसप्तमीस रथोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी होते. सर्व उत्सवांच्या वेळी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवीस खणानारळने ओटी भरून साडीचोळी व सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात.