शांतादुर्गा शंखवाळेश्वरी मंदिर

गोठण, वेलिंग, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

गोमंतकातील देवीउपासकांतील शांतादुर्गा ही लोकप्रिय देवता. भगवान विष्णू आणि महादेव यांच्यातील महायुद्ध थांबवून विश्वात शांतता प्रस्थापित करणारी देवी म्हणून शांतादुर्गा देवीची पूजा केली जाते. कोकणात वारूळ स्वरूपात पूजली जाणारी व सप्तमातृकांपैकी एक मानली गेलेली सातेरी वा सांतेरी ही देवी म्हणजेच गोमंतकातील शांतादुर्गा. पुराण आणि इतिहासप्रसिद्ध अशा शंखावली म्हणजेच आजच्या शंखवाळ या गावातील ही देवी आज गोठण येथे विराजमान आहे. येथे शांतादुर्गा शंखवाळेश्वरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीचे जुने मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

स्कंदपुराणातील सह्याद्री खंडामध्ये प्राचीन शंखावली नगरीची कहाणी देण्यात आली आहे. त्यात ही नगरी इषुपात नामक रामक्षेत्राचा एक अलंकार होता व येथे चित्रगुप्ताचे मंदिर होते. या ठिकाणी स्वतः भगवान विष्णु व महादेवाचा वास होता. येथे समुद्रातून रोज शंखांची एक आयली म्हणजे पंक्ती किंवा रांग येत असे. त्यामुळे तिला शंखावली हे नाव पडले. त्याचाच अपभ्रंश शंखवाळी असा झाला. या नगरीत सातेरी देवीचे मोठे मंदिर होते. हिंदू धर्म परंपरेनुसार वारूळ हे सातेरी देवीचे प्रतिक मानले जाते. भगवान परशुरामाची माता रेणुका हिच्याबद्दल अशी पौराणिक आख्यायिका सांगण्यात येते की रेणुकेचा जन्म वारूळातून झाला होता, तसेच ती वारूळामध्येच अदृश्य झाली होती. देवी संप्रदायामध्ये वारूळाच्या पूजेस महत्त्वाचे स्थान आहे.

सातेरी देवीच्या शांतादुर्गा या रुपाची नामस्पष्टिकरणात्मक पौराणिक आख्यायिक अशी की प्राचीन काळी शिव आणि विष्णु यांचे घनघोर युद्ध झाले. ते दोन सहस्त्र वर्षे चालले होते. विष्णुचे सुदर्शन आणि शंकराचे पशुपतास्त्र यांच्या खणखणाटाने सर्व भूमंडळ हादरून जात होते. या युद्धात विश्वाचा अंत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. युद्धामुळे या दोन्ही देवतांची पालन-संहाराची कार्ये अडून राहू लागली होती. हे पाहून अखेर ब्रह्मदेवाने आपल्या दिव्य तेजाने आदिशक्ती जगदंबा निर्माण केली. तिला भूतलावर पाठवून या दोन्ही देवांमध्ये सलोखा घडवण्यास सांगितले. त्यानुसार ही देवी समरभूमीवर आली व दोन्ही योद्ध्यांच्या मध्ये उभे राहून तिने त्यांना उपदेश केला. ‘स्कंद पुराणा’तील ‘अंबिका खंडा’नुसार देवीने त्यांना ब्रह्म तोच हरि व महेश्वर आहे, असा उपदेश केला. अशा प्रकारे देवीने युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित केली. म्हणून तिचे नाव शांतादुर्गा असे पडले.

गोमंतकातील अनेक देवस्थानांप्रमाणेच शंखवाळ येथील सातेरी (शांतादुर्गा) मंदिरासही स्थलांतर करावे लागले. २८ फेब्रुवारी १५१० या काळ्या दिवशी गोमंतकात प्रवेशलेल्या पोर्तुगीजांनी त्याच वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये गोवा बेट जिंकले. यानंतर त्यांच्या धर्मांधतेने गोव्यातील हिंदूचे जगणे दुस्तर झाले. इ.स. १५६० साली गोवा बेटांत इन्क्विझिशन म्हणजेच धर्म समीक्षण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून हिंदूंचा क्रूर छळ सुरू झाला. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात येऊ लागली. त्यांना हिंदू देवदेवतांची पूजा करण्यास सक्त मनाई करण्यात आली. त्यांची मंदिरे पाडून, जाळून टाकण्यात येऊ लागली. याची झळ शंखवाळ क्षेत्रासही बसली. त्या वेळी येथील अनेक मंदिरांतील मूर्ती अन्यत्र स्थलांतरित करण्यात आल्या. त्यात तेथील लक्ष्मीनृसिंह, विजयादुर्गा या दैवतांप्रमाणेच शांतादुर्गेचाही समावेश होतो. क्रूर आणि धर्मांध पोर्तुगीजांच्या भयाने गावातील देवीभक्त महाजन, तसेच कुळाव्यांनी देवीची मूर्ती पोर्तुगीजांच्या राज्यातून शेजारील मुस्लिमांच्या राज्यात नेण्याचे ठरवले. त्यानुसार एके दिवशी काही लोकांनी देवीची मूर्ती घेऊन जुवारी नदी पार केली. ते प्रथम मडकई गावात आले. या गावाच्या किनाऱ्यावरील करंजाळ नामक वाड्यावरील एका जागेत ते राहिले. आदिलशाहाच्या ताब्यात असलेल्या फोंडा महालातील वेलिंग गावातील सुयोग्य जागा पाहून नंतर ही मूर्ती येथे आणण्यात आली. येथील गोठण वाड्यावर तिची स्थापना करण्यात आली. शके १६४३ (इ.स. १७२१)मध्ये रचण्यात आलेल्या ‘कोकणाख्यान’ या ग्रंथातील ‘दैवतांचे स्थलांतर’ या अध्यायात या विषयी असे म्हटले आहे की

‘कुशस्थळी श्रीमंगेश प्रियोळी। वेरणे म्हाळसा म्हाडदोळी। शंखावळी देव दोन्ही स्थळी। केरी आणि वेलिंगासी।। वेलिंगासी नरसिंह सांतेरी। विजयदुर्गा ते केरी माझारी। आणि केळोशीची शांतादुर्गा बरी। राहिली कवळे ते ग्रामी।।’ यात वेलिंग येथे सांतेरी देवीचे स्थलांतर झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मांतरासाठी सासष्टीत १ मे १५६० रोजी प्रवेश केल्याचे पुरावे आहेत. त्यावरून शंखवाळी येथील मंदिरांतील मूर्तींचे स्थलांतर १ मे १५६०च्या पूर्वी झाल्याचे स्पष्ट होते. कालांतराने येथे देवीचे मोठे देवालय बांधण्यात आले. वेळोवेळी झालेले नूतनीकरण आणि जीर्णोद्धार यानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वेलिंग गावापासून काही अंतरावर असलेल्या गोठण वाड्याच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात शांतादुर्गा शंखवाळेश्वरी देवीचे हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या विस्तिर्ण प्राकारास मोठे दगडी महाद्वार आहे. प्राकारात मध्यभागी वसलेल्या या मंदिरासमोर सहा स्तरीय दीपस्तंभ आहे. याच्या खालच्या स्तरातील देवकोष्ठकांत विविध देवदेवतांची उठावशिल्पे आहेत. त्याशेजारी सुंदरसे तुलसी वृंदावन आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीत उभारलेले आहे. दुमजली सभामंडप, अर्धमंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी मंदिर संरचना आहे. अर्धमंडपावर गोलाकार शिखर व त्यावर कलश आहे, तर गर्भगृहाच्या वर अष्टकोनी बैठ्या मनोऱ्यासारख्या बांधकामावर उतरत्या प्रकारचे कौलारू छप्पर आहे. त्यावर कलश आहे. भिंती आणि स्तंभांवर केलेले कावी कला प्रकारातील नक्षीकाम हे या मंदिराचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील भिंतीवर याच कलाप्रकारात कोरून रंगवलेल्या शेषशायी विष्णुची आणि गरुड व हनुमंताची प्रतिमा आहे. सभामंडपास दोन्ही बाजूंस उतरते छत आहे. त्यावर, तसेच त्याखालील तुळयांवर विविध प्रकारची नक्षी कोरलेली आहे. छताखालील भिंतीवर उठावशिल्प प्रकारात कोरलेले देवाच्या पालखीचे, तसेच व्यालांचे शिल्प आहे. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील ओट्यावर कमानदार प्रवेशद्वार आहे. अर्धमंडपात मंदिराचा स्वागतकक्ष आहे. येथून महामंडपात प्रवेश होतो. महामंडपाचे लाकडी प्रवेशद्वार कोरीव नक्षीकामाने सजवलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. महामंडपात आतील बाजूंस गोलाकार स्तंभ आहेत. छतास पितळी घंटा, काचेच्या हंड्या, तसेच झुंबर टांगलेले आहे. महामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर संगमरवरी टाइल्स लावलेल्या आहेत.

प्रवेशद्वार चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवलेले आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची चांदीची मूर्ती आहे. त्यावर कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस स्टीलच्या सळया लावलेल्या खिडक्या आहेत. आत चांदीच्या मखरामध्ये उच्चासनावर शांतादुर्गा देवीची मुखवटास्वरूपातील मूर्ती विराजमान आहे. देवीच्या मस्तकी सोनेरी मुकूट आहे. मागच्या बाजूस प्रभावळ असून त्यावर कीर्तमुख कोरलेले आहे. देवीच्या या प्रभावळीच्या मागे रोयण वा रोहण म्हणजे वारूळ आहे. हे सातेरी देवीचे प्रतीक आहे. मूर्तीच्या पुढे लक्ष्मीनरसिंह, विजयादुर्गा यांच्या पंचधातूच्या लहान मूर्ती आहेत. यांमध्ये गणेशाची पाषाणाची लहान मूर्ती आहे. देवीच्या मखराच्या अधिष्ठानास खालच्या बाजूस टेकून देवीची पंचधातूची मूर्ती विराजमान आहे. येथे या मूर्तीस प्रसादकौल लावला जातो.

मंदिर प्रांगणात ‘शांतादुर्गा नीलायम’ नावाची अग्रशाळा आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस एका रांगेत असलेल्या देवळ्यांमध्ये ग्रामपुरूष, तसेच विविध गोत्रांच्या पुरुषांची लिंगरुपात स्थापना करण्यात आली आहे. यातील एका देवळीत दंडपाणी वा क्षेत्राधिपती आहे. दंडपाणीची मूर्ती उभ्या काळ्या पाषाणाची आहे.

या देवस्थानात वर्षप्रतिपदा, अक्षय्य तृतीया, नागपंचमी, नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या वेळी येथे शिबिकोत्सवही होतो. अश्विन महिन्यात विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी सीमोल्लंघनासाठी देवीची पालखी विशिष्ट स्थानी नेली जाते. तेथे एकाच वेळी तीन वेगवेगळ्या दैवतांच्या म्हणजे शांतादुर्गा शंखवाळेश्वरी, लक्ष्मीनृसिंह आणि वेताळेश्वर यांच्या पालख्या जमतात. या समारंभात हजारो भाविक सहभागी होतात. येथे नवरात्रात मखरोत्सवाचा भव्य कार्यक्रम होतो. या काळात येथे चंडीपारायण आणि होमहवन आयोजित केले जाते. गोमंतकातील अन्य देवालयांप्रमाणेच येथेही प्रसादकौलाची वहिवाट आहे.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ८ किमी आणि पणजी येथून २४ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • फोंडा व पणजीतून राज्य परिवहन सेवेच्या बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : योगेश शिरडोणकर, अध्यक्ष, मो. ७३५०५४१३०५,
  • शिशिर कडकडे, सचिव, मो. ९८२२४८८४५४
Back To Home