शंकरगिरी महाराज संस्थान

पळशी झाशी, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा

सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत आणि पांडव नदीच्या एका उपनदीच्या तीरावर वसलेल्या पळशी झाशी या गावात शंकरगिरी महाराज संस्थान आहे. हिमालयात तपश्चर्या करताना त्यांना येथे असलेल्या स्वयंभू शिवलिंगाबाबत साक्षात्कार झाला आणि त्यानंतर १९व्या शतकाच्या अखेरीस शंकरगिरी महाराज या गावात आल्याचे सांगितले जाते. येथे स्वयंभू शिवलिंगाचे तसेच शंकरगिरी महाराजांच्या संजीवन समाधीस्थानाचे दर्शन होते. विदर्भात शंकरगिरी महाराजांचे अनेक अनुयायी आहेत. या संस्थानामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. या दिवशी तब्बल १०७० किलोचा ‘महारोठ’ बनवण्यात येतो. प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या या महारोठाच्या सेवनाने अनेक रोग बरे होतात, अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे.

एका आख्यायिकेनुसार, शंकरगिरी महाराजांनी हिमालयात अनेक वर्षे घोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना येथील प्राचीन वटवृक्षाच्या छायेत असलेल्या स्वयंभू शिवलिंगाबाबत साक्षात्कार झाला. त्यानंतर शेकडो मैलांचा पायी प्रवास करीत ते १९व्या शतकाच्या अखेरीस या गावात आले. त्यांनी गावाच्या पूर्व दिशेकडील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या स्वयंभू शिवलिंगाची सेवा केली. अखेरपर्यंत त्यांचे येथे वास्तव्य होते. त्यांनी येथे अनेक लीला केल्या आहेत. या लिलांचे संकलन ‘श्रीशंकरगिरी विजय’ या ग्रंथात करण्यात आले आहे. सन १९०५ मध्ये त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील शिवलिंगाच्या ठिकाणी दगडी मंदिर उभारले. शिवशंकरांच्या सेवेचे आणि लोकोद्धाराचे कार्य संपत आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी आपल्या अनुयायांना संजीवन समाधी घेण्याचे संकेत दिले. समाधी घेण्यापूर्वी काही वर्षे आधी त्यांनी समाधीचे स्थानही निश्चित केले होते. त्यांच्या हयातीतच या समाधी मंदिराच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. २३ ऑगस्ट १९३५ रोजी श्रावण वद्य नवमीच्या दिवशी त्यांनी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत संजीवन समाधी घेतली. त्यांनी समाधी घेतल्यानंतर एका तासानेच त्यांच्या प्रिय गायीनेही येथे प्राण सोडले. तिची समाधीही येथे विद्यमान आहे. एके दिवशी प्रसाद बनवण्यासाठी दूध कमी पडले तेव्हा शंकरगिरी महाराजांनी या वांझ गायीच्या पाठीवर हात फिरवल्यावर तिला पान्हा फुटला व प्रसादाची सोय झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. शंकरगिरी महाराजांच्या पश्चात येथे धन्वंतरी महाराज आणि सोमवारपुरी महाराज होऊन गेले; त्यांच्या समाध्याही या परिसरात आहेत. काही वर्षांपूर्वीच येथील शिवमंदिराचे जुने स्वरूप कायम ठेवून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच वेळी समाधी मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात आला.

संग्रामपूरपासून तीन किलोमीटर अंतरावर पळशी झाशी हे गाव आहे. गावातील मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर हे मंदिर वसले आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मुखमंडपात उजव्या बाजूस शंकरगिरी महाराजांची मूर्ती आहे. १९५३ मध्ये या मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मूर्तीसमोर त्यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तीच्या डाव्या बाजूला शंकरगिरी महाराजांची गादी आहे आणि येथे त्यांची प्रतिमा आहे. मुखमंडप व सभामंडपात दगडी स्तंभ आहेत. सभामंडपातील भिंतींवर देवकोष्ठके कोरण्यात आली आहेत. गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन होते. पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. येथे मोठ्या शाळुंकेमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या मागील बाजूस छोट्या पीठासनावर पार्वतीमातेची मूर्ती आहे. तिच्या शेजारीच गणेशाच्या दोन मूर्ती आहेत. त्यापैकी एक मूर्ती पद्मासनात आहे तर दुसऱ्या मूर्तीत एक पाय खाली सोडलेला आहे. गर्भगृहातील भिंतींवरही काही देवकोष्ठके आहेत.

मंदिर परिसरातच शंकरगिरी महाराजांची समाधी आहे. हे स्थान जमिनीखाली असल्यामुळे येथे पायऱ्या उतरून यावे लागते. संगमरवराचा वापर करून या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. समाधीस्थानी शंकरगिरी महाराजांच्या पादुकांचे दर्शन होते. समाधीमंदिराजवळच शंकरगिरी महाराजांच्या गायीची समाधी आहे. तिला लागूनच नागदेवतेचे मंदिर आहे. काही अंतरावर शंकरगिरी महाराजांची धुनी आहे. येथून काही पावलांवरच महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या दिवशी महारोठ बनवण्याची जागा आहे. परिसरात असलेल्या वटवृक्षाच्या छायेत शंकरगिरी महाराजांची मूर्ती आहे.

महाशिवरात्र हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो भाविक स्वयंभू शिवलिंगाच्या व शंकरगिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. या दिवशी रात्री महारोठ बनवण्यात येतो. शंकरगिरी महाराजांनी घालून दिलेल्या नियमांनुसारच हा महारोठ तयार केला जातो. भाविकांच्या शारीरिक व मानसिक व्याधी निवारण्यासाठी त्यांनी या महारोठाचा महाप्रसाद सुरू केल्याचे सांगितले जाते. तो बनवण्यास सुरुवात करण्यापूर्वी गावातील वीस-पंचवीस तरुण थंड पाण्याने स्नान करून, ओल्या अंगानेच कटिभागी वस्त्र नेसतात. त्यानंतर हा रोठ बनवण्यासाठी असलेल्या साडेपाच फूट खोल आणि तेवढ्याच रुंद खड्ड्याची विधिवत पूजा करून अग्निकुंड प्रज्ज्वलित केला जातो. त्यानंतर ही मंडळी गव्हाचे पीठ, साखर तसेच काजू, बदाम, खारीक, खोबरे, जायफळ आणि मनुका या सुक्या मेव्याचे मिश्रण करतात. या मिश्रणात दूध व तूप टाकले जाते. या मिश्रणात पाण्याचा वापर केला जात नाही. त्यानंतर या मिश्रणाचे दोन-दोन किलो वजनाचे गोळे बनवून ते एका भांड्यात ठेवले जातात. सर्व गोळे तयार झाल्यावर मातीचे मोठे कोपर उलटे ठेवून त्यावर केळीच्या पानापासून तयार केलेले १६ बंध (सोपटे) गोलाकार ठेवले जातात. त्यावर केळीची पाने पसरली जातात. नंतर त्यावर १० मीटर कोरे शुभ्र कापड ठेवले जाते. या कापडावर गोळे एकावर एक ठेवून महारोठ बनवण्यात येतो. त्यावर केळीची पाने अंथरून ती केळीच्या सोपटांनी बांधली जातात. मध्यरात्री एकच्या सुमारास महारोठ बनवून तयार होतो. त्यानंतर अग्निकुंडात पाच ते सहा तास ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी हा रोठ ‘हर हर महादेव’च्या जयघोषात साखळदंडाच्या साहाय्याने बाहेर काढला जातो. त्यानंतर आरती व पूजा करून या प्रसादाचे भाविकांना वाटप केले जाते. शंकरगिरी महाराजांच्या हयातीत सव्वा मणाचा महारोठ बनवण्यात येत असे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता तब्बल १० क्विंटल ७० किलोचा महारोठ बनवण्यात येतो. अनेक भाविक या प्रसादाचे सेवन करतात तर काही भाविक वर्षभर हा प्रसाद आपल्या घरात ठेवतात. येथे शंकरगिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रावण वद्य नवमीच्या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. त्यात भजनसंध्या आणि पालखी मिरवणुकीचाही समावेश असतो. येथे कोजागिरी पौर्णिमेलाही मोठा उत्सव होतो. मंदिर संस्थानातर्फे येथे अनेक सामाजिक कार्येही केली जातात.

उपयुक्त माहिती:

  • संग्रामपूर येथून ४ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून १०१ किमी अंतरावर
  • संग्रामपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे
  • संपर्क: मंदिर कार्यालय, मो. ७७७४९२०५०३

शंकरगिरी महाराज संस्थान

पलशी झाँसी, ताल। संग्रामपुर, जिला. बुलढाना

Back To Home