
संपूर्ण भारतात शाकंभरी देवीची सहा शक्तिपीठे आहेत. त्यामध्ये केदारघाटी मंदिर (उत्तराखंड), सहारनपूर मंदिर (उत्तर प्रदेश), सकराय आणि साम्भर मंदिर (राजस्थान), बदामी मंदिर (कर्नाटक) व सहावे स्थान महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात नागेवाडी या गावात आहे. यापैकी सहारनपूर हे देवीचे सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन शक्तिपीठ आहे. शाकंभरी देवीच्या इतर शक्तिपीठांचे हे उगमस्थान असल्याचे मानले जाते. नागेवाडी येथील देवीचे स्थान स्वयंभू असून ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर लिंबखिंड ओलांडली की नागेवाडी गाव लागते. गावाच्या सीमेवर निसर्गसमृद्ध वातावरणात असलेले शाकंभरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडांत केलेले आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे मंदिरासमोर असलेली शिवपिंडीच्या आकाराची दगडी विहीर. याला येथे पायविहीर असे म्हटले जाते. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या असून देवीची नित्यपूजा आणि अभिषेकासाठी या विहिरीतील पाणी वापरण्यात येते. ही देवी देवांग कोष्टी समाजातील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असल्याने वर्षभर देवीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात.
मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळात येथे प्रचंड दुष्काळ पडला होता. अन्न–पाण्यावाचून माणसांचे व प्राण्यांचेही हाल सुरू होते. दुष्काळाच्या झळांमुळे येथील लोक देवीचे होमहवन, तसेच जप–तप करायचे विसरून गेले. कुठूनही अन्न–पाणी मिळेल याची शक्यताच नव्हती. त्या वेळी सर्व लोक शाकंभरी देवीला शरण आले. देवीने आपल्या भक्तांचे होणारे हाल पाहून हजारो नेत्रांनी सृष्टीकडे पाहिले. ज्या ज्या ठिकाणी देवीची नजर पडली त्या त्या ठिकाणी जमिनीतून भाजीपाला उत्पन्न झाला. देवीने आपल्या भक्तांना
सांगितले की जोपर्यंत हा दुष्काळ संपत नाही तोपर्यंत तुम्ही हा भाजीपाला खाऊ शकाल. तेव्हापासून दररोज या देवीला भाज्यांचा नैवेद्य दाखविला जाऊ लागला. आजही ती प्रथा कायम आहे. नवसपूर्तीनंतर भाविकांकडून या देवीला ६४ आणि त्यापेक्षा जास्त भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो.
चहुबाजूने उसाच्या शेतीमध्ये असलेल्या या मंदिराभोवती तटबंदी आहे. साधारणतः तीन फूट उंचीच्या जोत्यावर मंदिर असून त्याची रचना सभागृह आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात एक शिवपिंडी असून त्यासमोर चौथऱ्यावर चांदीच्या प्रभावळीत शाकंभरी मातेची अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या सात हातांमध्ये विविध आयुधे आहेत. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आणि तीन ते साडेतीन फूट उंचीची आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चवरी ढाळणाऱ्या दासी व वादिका (वाद्य वाजविणाऱ्या स्त्रिया) आहेत. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही देवी शरभारूढ (शरभ म्हणजे अर्धा भाग सिंहाचा व अर्धा भाग मानवाचा) आहे. वास्तविक शाकंभरी म्हणजे बनशंकरी (भुवनेश्वरी) देवीचे रूप असून तिचे वाहन वाघ आहे, पण या ठिकाणी मात्र येथे शरभ हे वाहन आहे. मंदिराच्या सभामंडप व गर्भगृहावर शिखरे आहेत. मुख्य मंदिरासमोर एक लहानसे समाधी मंदिर असून समोरील विहिरीच्या शेजारी चौंडेश्वरी आणि मरिमाई देवीची मंदिरे आहेत.
नवरात्रोत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या काळात येथे विविध धार्मिक कार्यक्रम व आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यावेळी नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.