संत श्री सेवागिरी महाराज यांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्या समाधीस्थानामुळे पुसेगावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आलेले आहे. वेदावती नदीच्या किनाऱ्यावर असलेले सेवागिरी मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीपासून दहा दिवसांची येथे मोठी यात्रा भरते. सेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा होणारा रथसोहळा हे यात्रेतील प्रमुख आकर्षण असते. यावेळी लाखो भाविक येथे दर्शनाला येतात.
श्री सेवागिरी महात्म्यामध्ये वर्णन केल्यानुसार, राजस्थानमधील जुनागड येथे अमरसिंह आणि सुशिला हे क्षत्रिय वर्णाचे शिवभक्त दाम्पत्य राहत होते. एके दिवशी श्री पूर्णागिरी महाराज सुशिलामाईकडे भिक्षा मागण्यासाठी आले. भिक्षा झोळीत पडताच त्यांनी ‘कल्याणमस्तू पुत्रवतीभव’ असा आशीर्वाद दिला. उतारवयात आलेल्या सुशिलामाईच्या मनात काय चालले आहे हे त्यांनी जाणले आणि सांगितले की ‘माई, तू जगाचा उद्धार करणारी माता होशील. तुझ्या पोटी दोन पुत्र जन्म घेतील. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र संन्यासी होऊन जगाचे कल्याण करील व दुसरा पुत्र गृहस्थाश्रमी होईल,’ हा साधूचा शब्द आहे. ‘मी आजपासून सात वर्षांनी पुन्हा येथे येईन, तेव्हा तुझा ज्येष्ठ पुत्र तू माझ्या स्वाधीन करायचा आहेस,’ असे सांगून पूर्णागिरी महाराज निघून गेले.
ईश्वरकृपेने काही दिवसांनंतर सुशिलामाईची कूस उजवली. तिला दोन मुले झाली. थोरला शिवसिंग, तर धाकटा जयसिंग. मुलांचे लाड व कोडकौतुकात दिवस चालले होते. कधी सात वर्षे पूर्ण झाली त्यांना कळलेच नाही. तो दिवस उजाडला व श्री पूर्णागिरी महाराज सुशिलामाईच्या दारात हजर झाले. त्यांनी ज्येष्ठ पुत्रास संन्यासी म्हणून आपल्यासोबत नेण्याची मागणी केली. महाराजांच्या बोलण्याने अमरसिंह व सुशिलामाईचे डोळे भरून आले. महाराजांनी त्यांची समजूत काढून शिवसिंगास आपल्यासोबत येण्यास सांगितले. शिवसिंगाने आई–वडिलांना नमस्कार केला व साश्रूनयनांनी त्यांचा अखेरचा निरोप घेतला.
शिवसिंग हळूहळू पूर्णागिरी महाराजांच्या सहवासात रमून गेला. महाराजांनी दीक्षा दिल्यानंतर त्याचे नामकरण ‘सेवागिरी’ असे केले. सेवागिरीला दशनाम संप्रदायाची परंपरा आणि ज्ञान आत्मसात झाले. सद्गुरुंसमवेत त्यांनी चारधाम यात्रा केली. तीर्थाटनामुळे संपूर्ण देशाची परिस्थिती सेवागिरींच्या लक्षात आली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील सुख, दुःख, व्यथा व वेदना त्यांना जाणवू लागल्या. पूर्णागिरी महाराजांनी एक दिवस सेवागिरीस जवळ घेऊन सांगितले की आता तुला ज्ञानप्राप्ती झाली आहे. पूर्वसंचिताने जरी तू मनुष्य देह धारण केला असलास तरी तू मूळ दत्तावतारी आहेस. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तू जन्म घेतला आहेस. माझा कार्यभाग आता संपला आहे. आता तू मुक्त आहेस. तुला दक्षिणेकडील दंडकारण्यात जाऊन तेथील सर्वसामान्य लोकांचा उद्धार करावयाचा आहे. दंडकारण्यात वेदावती नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे एक स्वयंभू शिवलिंग आहे. तेथे जाऊन तुला अवतार कार्य सुरू करायचे आहे. तीच तुझी कर्मभूमी असेल.
गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सेवागिरी महाराज पुसेवाडीत आले. तेथे पाऊल ठेवताक्षणीच त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागले. सेवागिरी महाराज नदीकाठी आले. काठावरील झाडाझुडपांत फिरून त्यांनी स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर शोधून काढले. हेच पुसेगावमधील जागृत व स्वयंभू शिवलिंग असलेले सिद्धेश्वराचे मंदिर होय. सिद्धेश्वराचे मंदिर व स्वयंभू शिवलिंग पाहिल्यामुळे आपली कर्मभूमी हीच आहे, याची त्यांना प्रचिती आली. त्यानंतर त्यांनी मंदिरात मुक्काम करण्याचे निश्चित केले. दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून, वेदावतीत स्नान करून, मंत्रोच्चारात ते सिद्धेश्वराची पूजा करीत.
सेवागिरी महाराजांच्या विचारांमुळे, तपसाधनेमुळे, सेवाभावी वृत्तीमुळे व अज्ञानी लोकांचा उद्धार करण्याच्या भावनेमुळे त्यांचे भक्त वाढू लागले. महाराजांचे जनजागृतीचे काम सुरू असतानाच एके दिवशी त्यांनी गावातील भक्त मंडळींकडे एक समाधी मंदिर, त्यावर दत्त मंदिर बांधावे, असा विचार मांडला. महाराजांच्या इच्छेनुसार गावकऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सुरुवातीला घडीव दगडांचे चिरेबंदी भुयार स्वतःच्या समाधीसाठी महाराजांनी आपल्या हयातीतच तयार केले व त्यावर दत्तमूर्तीसाठी घडीव दगडांचा गाभारा कळसासह बांधून घेतला होता. महाराज स्वतः बांधकामात मदत करीत असत.
सर्व काम पूर्ण झाल्यावर महाराजांनी गाभाऱ्यात श्रीदत्त मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर येथे दरवर्षी दत्त जयंतीचा सोहळा सुरू झाला. दत्त जयंतीच्या दिवशी भंडारा केला जात असे. त्यावेळी महाराजांचा शिष्यवर्ग मोठ्या प्रमाणावर गूळ व इतर साहित्य घेऊन मंदिरात येत असे. सर्व स्त्रिया येताना पोळपाट–लाटणे, तवा, उलथने असे साहित्य बरोबर घेऊन येत होत्या. या एका दिवसात येथे खंडीभर डाळीचे पुरण शिजवले जात असे. पूजा, आरती व पाळणा झाल्यानंतर दत्तगुरूंना नैवेद्य दाखवून पंगती बसत असत. महाराज स्वतः सर्वांना प्रेमाने वाढत असत. कोणाची गाय व म्हैस दूध देईनाशी झाली तर गावातील लोक महाराजांकडे जाऊन भस्माची पुडी आणीत. मग त्या पूर्ववत दूध देत. महाराज त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या भक्तांना भस्माची पुडी देत. आजसुद्धा येथे भक्तांना विभूती दिली जाते.
महाराज आता ६५ वर्षांचे झाल्यानंतर जास्तीत जास्त मौन धारण करीत असत. दत्त जयंतीचा उत्सव नुकताच पार पडला होता आणि महाराजांनी आता निरवानिरवीस सुरुवात केली होती. सर्व शिष्यांना व भक्तांना महाराज मोलाचे मार्गदर्शन करू लागले. महाराज आता आपल्यात राहणार नाहीत, या भावनेने सर्वांची मने दुःखी झाली होती. शेवटी तो दिवस उजाडला. मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी, शनिवार, १० जानेवारी १९४८ या शिवरात्रीच्या दिवशी महाराजांनी श्री दत्तात्रय व श्री सिद्धेश्वराची पूजा करून समाधी घेतली आणि योग सामर्थ्याच्या जोरावर आपला आत्मा पंचतत्त्वात विलीन केला. त्यानंतर शिष्य व भाविकांनी महाराजांच्या इच्छेनुसार बांधलेल्या समाधी स्थानावर महाराजांचा देह ठेवला.
त्यानंतर पुढील वर्षीपासून सेवागिरी महाराजांची दहा दिवसांची यात्रा भरविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यासाठी गावात पूर्वीपासून सुरू असलेली भैरोबाची यात्रा बंद करण्यात आली आणि १९४९ पासून पुसेगावात सेवागिरी महाराज यात्रेला सुरुवात झाली. यात्रा ज्या परिसरात भरते तेथील शेतकरी त्यावेळी आपल्या जमिनीतून पिके न घेता सदर जागा मोकळी ठेवतात.
वेदावती नदीच्या तीरावर, मुख्य रस्त्याच्या बाजूला सेवागिरी मंदिर आहे. तटबंदीच्या कमानीतून आत गेल्यावर परिसरात अनेक लहान लहान मंदिरे दिसतात. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात सेवागिरी महारांजी मूर्ती व त्यामागे श्रीदत्तांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या खाली सेवागिरी महाराजांची समाधी आहे. मंदिराच्या शेजारी सिद्धेश्वर मंदिर आहे. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला मठाधिपती आणि इतर मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यावर त्यात सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवल्या जातात. फुलांनी सजविलेला, नोटांच्या माळांनी भरलेल्या रथाची पुसेगावातून मिरवणूक निघते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.
पुसेगावातील यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यात्रेच्या वेळी जनावरांचा बाजार भरतो. त्यामध्ये खिल्लारी बैलांची लाखो रुपयांना खरेदी–विक्री होते. याशिवाय दत्त जयंतीलाही उत्सव साजरा होतो. दुपारच्या वेळी भाविकांना मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. येथे भक्त निवास व रुग्णालयाचीही सुविधा आहे.