सत्पुरूष मंदिर

मोरजी, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा

मोराच्या आकारात वसलेले आणि ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांमुळे जगाच्या नकाशावर आलेले मोरजी हे गाव शापोरा टेकडीच्या परिसरात वसलेले आहे. शापोरा नदी आणि समुद्राची साथ लाभलेल्या या गावाची रक्षकदेवता म्हणून येथे सत्पुरूषाची पूजा केली जाते. इतिहासकाळात अरबी घोड्यांच्या व्यापाराचे केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातील मोरजाई मातेचे मंदिर तेथील कावी कला प्रकारातील नक्षीमुळे सुप्रसिद्ध आहे. या मंदिराप्रमाणेच कावी कला नक्षीने येथील सत्पुरूषाचे मंदिर नटलेले आहे. यामुळे येथे भाविकांबरोबरच मंदिर अभ्यासक व पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येत असतात.

सत्पुरूष ही गोव्यातील एक लोकदेवता आहे. ती निसर्गाचे प्रतीक आहे. त्याच प्रमाणे त्यास गावाचा राखणदारही मानले जाते. मोरजी येथील सत्पुरूष हा गावाचा निर्माताही मानला जातो. स्थानिक लोककथेनुसार, डिचोली येथील शिरगावातील एका दरिद्री कुटुंबात सात बहिणी आणि एक भाऊ होता. केळबाई, महामाया, शीतला देवी, मीराबाई ऊर्फ मिलाग्रेस, अजदीपा, लईराई आणि मोरजाई ही त्या बहिणींची नावे होती. खेतोबा उर्फ खेतलो हा त्यांचा धाकटा भाऊ. या भावंडांच्या माता-पित्याचे निधन झाले होते. यातील लईराई ही रागीट स्वभावाची होती. एकदा मोरजाईने तिची आज्ञा पाळली नाही. त्यामुळे रागावलेल्या लईराईने तिला समुद्रात फेकून दिले. त्यावेळी या गावामध्ये सत्पुरूष वास्तव्यास होता. त्याने मोरजाईला बुडताना वाचवले व गावातील टेकडीवर आणले.

आणखी एका आख्यायिकेनुसार, एके काळी मोरजी गाव अनेक आपत्तींनी ग्रस्त झाले होते. त्यावेळी गावातील एक व्यक्ती समुद्राकडे तोंड करून चिंतामग्न अवस्थेत बसलेली होती. अचानक त्या ग्रामस्थाला समुद्रातील लाटांवरून चालत येत असलेली एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीच्या मुखमंडलाभोवती प्रभावळ होती. या ग्रामस्थाने त्या व्यक्तीला गावावरील आपत्तींची माहिती दिली. तेव्हा त्या व्यक्तीने त्या संकटांपासून सुटकेचा मार्ग दाखवला. त्या व्यक्तीला सत्पुरूष या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे ग्रामस्थांनी त्याचे मंदिर बांधले.

गोव्यात अनेक ठिकाणी सत्पुरूषाची मंदिरे आहेत. त्याविषयी अनेक गजाली, लोककथा सांगण्यात येतात. एका लोककथेनुसार, एका गावामध्ये एक भजनप्रिय व्यक्ती राहात असे. तो सतत भजनात मग्न असे. कोठेही भजन सुरू झाले की त्याचे भान हरपत असे. एकदा त्या गावात दोन दादले (पुरूष) आले. त्यांनी त्याला, ‘चल तुला भजन ऐकवतो’ असे आमिष दाखवून स्वतःबरोबर नेले. ते दादले आपणांस कोणत्याही मंदिरात न नेता भलतीकडेच घेऊन चालले आहेत, हे लक्षात आल्यावर ती व्यक्ती घाबरली. तिने सत्पुरूषाचा धावा सुरू केला. तेव्हा त्याला सत्पुरुषाने दृष्टान्त देऊन सांगितले की त्या दादल्यांची शेंडी धर. त्याने तसे करताच, त्याच्या हातात दोघांचीही शेंडी आली आणि ते दादले अदृश्य झाले. ते पाहून ती व्यक्ती बेशुद्ध झाली. तिला जेव्हा जाग आली, तेव्हा ती गावातील सत्पुरूषाच्या मंदिरासमोर होती. अशा प्रकारे सत्पुरूष हा गावातील लोकांचे सदैव रक्षण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मोरजी गावातील एका उंच जागी, हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या परिसरात मोठ्या प्रांगणामध्ये सत्पुरूषाचे मंदिर स्थित आहे. चारही बाजूंनी आवारभिंत असलेल्या या प्रांगणात प्रवेश करताच डावीकडे सहा स्तरीय दीपस्तंभ आहे. त्याच्या बाजूस अष्टकोनी आकाराचे मोठे तुळशीवृंदावन आहे. या वृंदावनाच्या सर्व बाजूंनी असलेल्या देवकोष्टकांत विविध देवता तसेच साधुसंतांच्या कोरीव मूर्ती आहेत. यामध्ये संत तुकाराम, तसेच समर्थ रामदास यांच्याही मूर्ती आहेत. चारही बाजूंनी ओसरी आणि मध्ये सभामंडप, अर्धमंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. खुले कमानदार प्रवेशद्वार, खुला सभामंडप, त्यात कक्षासने, कमानीने जोडलेले मोठे स्तंभ, उतरती कौलारू छपरे, तसेच मनोऱ्याच्या आकाराचे शिखर ही गोव्यातील मंदिर स्थापत्यशैलीची काही वैशिष्ट्ये होत. ती या मंदिरातही पाहावयास मिळतात. या मंदिरातील कमानींवर, तसेच स्तंभांवर कावी कला प्रकारातील भौमितिक आकाराचे नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशकमानीच्या वर कीर्तिमुख लावलेले आहे. सभामंडपास घुमटाकार वितान आहे. त्यावर अष्टदिक्पालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. तर मंदिराच्या अंतराळाच्या दर्शनीभिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना लाकडात कोरलेल्या वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. अंतराळाचे प्रवेशद्वार लाकडी व कोरीव नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सोनेरी पत्र्याचे आवरण चढवण्यात आलेले आहे. त्यावरही कोरीव नक्षीकाम आहे. द्वारचौकटीवर खालच्या बाजूला गजप्रतिमा आणि द्वारपालांच्या मूर्ती आहेत, तर ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख कोरलेले आहे. त्यावरील उत्तरांग भागात दोन मयुरप्रतिमांच्या मध्यभागी ओंकार कोरलेला आहे. गर्भगृहात संगमरवरी चौथऱ्यावर सत्पुरूषाच्या काळ्या पाषाणातील दोन मूर्ती विराजमान आहेत. यातील एका मूर्तीच्या हातात तलवार व वरील बाजुस छत्र आहे. या मूर्तींच्या बाजूला काही पाषाणही ठेवलेले आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः चौकोनाकार वा आयताकार असलेल्या या पाषाणांचा वरचा भाग टोकदार आहे. मंदिराच्या गर्भगृहावर षटकोनी मनोऱ्याच्या आकाराचे व वरच्या बाजूस घुमट असलेले मोठे शिखर आहे. या घुमटावर त्रिस्तरीय कलश आहे.

या मंदिरात रोज नित्यनेमाने सत्पुरूषाची पूजा केली जाते. मोरजाई मंदिराप्रमाणेच नवरात्रोत्सव काळात या मंदिरात खास सजावट केली जाते. येथे नवरात्रोत्सवाप्रमाणेच विविध हिंदू सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मोरजाईच्या दर्शनासाठी येणारे परगावातील भाविक, तसेच पर्यटक आवर्जून या मंदिरात येऊन सत्पुरुषाचे दर्शन घेतात.

उपयुक्त माहिती:

  • पेडणे येथून १५ किमी आणि पणजी येथून ३१ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पेडणे येथे येण्यासाठी बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home