सताई देवी मंदिर

कोंगळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी

कोंगळे हे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीकिनारी असलेले गाव. या गावाच्या मुख्य वस्तीपासून दूर आणि घनदाट जंगलात सताई देवीचे पेशवेकालीन मंदिर आहे. कोंगळेचे ग्रामदैवत असलेले हे स्वयंभू देवस्थान आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी आणि हाकेला उभी राहणारी देवी, अशी आई सताईची सर्वदूर ख्याती आहे. देवस्थान अतिदुर्गम भागात असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भक्त सताईच्या दर्शनासाठी येत असतात.

दापोली तालुक्यात आंजर्ले खाडीकिनारी दोन डोंगरांच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. गावात जाण्यासाठी डोंगरउताराच्या रस्त्याने जावे लागते. श्री सताई देवीचे सध्याचे मंदिर आधुनिक बांधकामाचे आहे. २०१२ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यापूर्वी सताईचे मंदिर लाकडी, दगडी खांबांचे आणि कौलारू होते. सताई देवीचा महिमा पाहून स्वतः पेशव्यांनी सताईचे मंदिर बांधल्याचे कोंगळे गावातील ग्रामस्थ सांगतात. पेशवेकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या समोरील बाजूस भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक कमान असून तेथे जयविजय या द्वारपालांची शिल्पे आहेत. दर्शनमंडपापासून तीन फूट उंचीवर असलेला मंदिराचा सभामंडप मोठा आहे. गर्भगृहात सताईची काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती आहे. तिला सणउत्सवाच्या काळात साडीचोळी, विविध अलंकार आणि सोने चांदीच्या मुखवट्याने सजविण्यात येते. याशिवाय गर्भगृहात मानाई, झोलाई, काळेश्री, जाखमाता, वाघजाई, देव चटकोबा, देव हनुमंत यांच्याही प्राचीन दगडी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या डाव्या उजव्या बाजूला दोन उपगृहे आहेत.

दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीस सताईचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. शिमगोत्सव, नवरात्रोत्सव यांसारखे प्रमुख उत्सवही मंदिरात साजरे होतात. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीला पहिली होळी पेटवून कोंगळे येथील श्री देवी सताईच्या शिमगोत्सवास सुरुवात होते. यावेळी सताई देवीची पालखी रात्री मंदिरातून निघते ती कोंगळे आणि आंजर्ले गावात फिरते. आंजर्लेवासीसुद्धा पालखीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. आंजर्ले येथील काही प्रमुख मानकरी असलेल्या ब्राह्मण कुटुंबांच्या भेटीसाठी सताईची पालखी रात्रभर आंजर्ले गावात फिरते. पहाटे ती आंजर्ले गावातून परत निघते. यावेळी ताडाचा कोंड परिसरात देवीच्या पालखीसमोर पारंपरिक टीपरीनृत्य केले जाते. टीपरीनृत्य पाहण्यासाठी पहाटेच्या वेळी शेकडो लोक येतात. पालखी पुन्हा सताई देवीच्या मंदिरात आल्यावर पहाटे होम पेटवला जातो. तसेच शिमगोत्सव काळात सताईच्या पालखीचा शेरणे काढण्याचा कार्यक्रमही खूप प्रसिद्ध आहे. सायंकाळी पालखी सजवून शेरणे काढण्याचा हा सोहळा पार पडतो.

घटस्थापनेपासून मंदिरात नवरात्रोत्सव सुरू होतो. सताई देवीच्या मंदिरात घटस्थापना करून घटावर दरदिवशी माळ चढवली जाते. या काळात दररोज रात्री मंदिरात भजन, कीर्तन, जाखडीनृत्य यांसारखे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात. नवरात्रोत्सवाच्या काळात पंचक्रोशीतील महिलांची सताईची ओटी भरण्यासाठी मंदिरात गर्दी असते. या काळात देवीसमोर नवसही केले जातात. नवसाला पावणारी अशी सताई देवीची ख्याती असल्याने अनेक भाविक नवरात्रोत्सव काळात सताई देवीच्या दर्शनासाठी येतात. विजयादशमी कोजागरी पौर्णिमेला रात्री सताई देवीच्या मंदिरात इतर कार्यक्रमांबरोबरच दांडीया नृत्यही होतो. या नृत्यात सगळे गावकरी सहभागी होतात.

सताई देवीचा संपूर्ण परिसर वनराईने नटलेला आहे. मंदिराजवळच एक बारमाही वाहता झरा आहे. याच झऱ्याचे पाणी मंदिरातील पूजाअर्चेसाठी वापरले जाते. सताई देवीचे मंदिर आणि कोंगळे गाव अतिदुर्गम भागात असल्याने दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या आवारात भक्त निवासाची सुविधा करण्यात आलेली आहे. परिसरातील अनेक कुटुंबांची ही देवी कुलदैवत आहे. मंदिराशेजारी पुरातन शिवमंदिर आहे. प्राचीन शिवपिंडीसोबत मंदिरात असलेली पाषाणातील प्राचीन गणेशमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.

उपयुक्त माहिती:

  • दापोलीपासून २० किमी, तर रत्नागिरीपासून १७३ किमी अंतरावर
  • दापोली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात भक्त निवासाव्यतिरिक्त निवास न्याहरीची सोय नाही
Back To Home