कदंब राजवंशाचे कुलदैवत अशी ख्याती असलेले सप्तकोटेश्वराचे प्राचीन मंदिर फोंडा तालुक्यातील ओपा-खांडेपार येथे आहे. नदीतिरावर असलेले हे मंदिर बाराव्या शतकापूर्वी बांधलेले असावे, असा अभ्यासकांचा दावा आहे. नंतर आलेल्या परकीय आक्रमकांनी गोव्यातील इतर मंदिराप्रमाणेच याही मंदिराचा विद्ध्वंस केला होता. त्यानंतर झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. जांभ्या दगडात या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. गोव्यातील संरक्षित स्मारकात या मंदिराचाही समावेश होतो.
ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार, येथील सप्तकोटेश्वर मंदिरांचा उल्लेख कदंब राजांच्या ताम्रपत्रावर तसेच त्रिभुवनमल्ल आणि जयकेशी राजांच्या सुवर्णनाण्यांवर आढळत असे. येथे सापडलेल्या काही शिलालेखांवरही या मंदिरांचे उल्लेख सापडतात, ज्यात राजा शिवचित्त आणि राणी कमलादेवी यांचेही उल्लेख आहेत. कदंब राजवंशाचे कुलदैवत असल्यामुळे गोव्यात अनेक ठिकाणी सप्तकोटेश्वराची मंदिरे आहेत. इतर मंदिरांच्या तुलनेत खांडेपार येथील मंदिराची रचना आटोपशीर आहे. या मंदिराचा यापूर्वी विजयनगर काळात म्हणजेच चौदाव्या शतकात जिर्णोद्धार झाल्याने त्यावर विजयनगरशैलीचा प्रभाव दिसतो.
त्यानंतर परकीय आक्रमकांमुळे या मंदिराचे केवळ अवशेष शिल्लक राहिले होते. त्याचाच वापर करून २०१० मध्ये या मंदिराचा दुसऱ्यांचा जिर्णोद्धार करण्यात आला होता.
सप्तकोटेश्वर मंदिराचा परिसर म्हणजे प्राचीन मंदिराचा समुह आहे. या मंदिरसमुहाच्या पूर्वेकडे खांडेपार नदी असल्याने पश्चिम दिशेकडून मंदिरांच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरल्यावर डावीकडे केशव मंदिर व उजवीकडे दत्तमंदिर आहे. दत्तमंदिरापासून दहा ते बारा पायऱ्या उतरून नदीतिरावर असलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या मंदिरासमोर किनाऱ्यावर लहानसा घाट बांधलेला आहे व तेथून नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जास्त पाऊस झाल्यास या नदीचे पाणी सप्तकोटेश्वर मंदिराच्या गर्भगृहापर्यंत येते. अशावेळी गर्भगृहातील सप्तकोटेश्वराची पिंडी पाण्याखाली जाते.
सप्तकोटेश्वर मंदिराची रचना एखाद्या कौलारू घराप्रमाणे भासते. मात्र या मंदिराच्या छतासह संपूर्ण बांधकाम हे जांभ्या दगडात केलेले आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या छोटेखानी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला वरपर्यंत जाणाऱ्या स्तंभशाखा व दरवाजाच्या वर वातायन आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा साध्याशा आहेत व त्यात खालील दोन्ही बाजूला पुष्पनक्षी आणि ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात एका शाळुंखाकार पीठावर अखंड पाषाणातील प्राचीन नंदी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या कमानदार दरवाजाच्या शेजारी दोन देवकोष्टके आहेत. त्यापैकी एका कोष्टकात गणपतीच्या आकारातील एक शिळा आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर कोरीव कामाच्या खुणा आहेत. दगडी उंबरठ्यावर दोन हत्तीशिल्पे कोरलेली आहेत. या द्वारचौकटीवर द्वाररक्षकांच्या अस्पष्ट झालेली शिल्पे आहेत. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर अखंड काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे.
मंदिराचा सभामंडप, गर्भगृह, त्यावरील घुमट आणि शिखर यासाठीही जांभ्या दगडांचाच वापर करण्यात आलेला आहे. या मंदिराच्या छतावर प्राण्यांच्या शिल्पकृती आहेत. अशी रचना असलेले हे गोव्यातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. मंदिर प्रांगणात असलेल्या केशव मंदिराच्या सभामंडपात लाकडी स्तंभ आणि छत आहे. या मंदिराच्या भिंतींवर कावी कलेच्या खुणा आहेत. लाकडी महिरपीने सजलेल्या गर्भगृहात चतुर्भुज केशवाची देखणी पाषाणी मूर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी प्राचीन दत्तमंदिर आहे. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार १९८८ मध्ये करण्यात आला होता. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या सिमेंट स्लॅबच्या चौथऱ्यावरून समोरील नदीचे विहंगम दृश्य दिसते. दत्तमंदिराच्या गर्भगृहात गाईसह त्रिमुखी दत्ताची मूर्ती स्थापित आहे. दर गुरुवारी आणि गुरुपौर्णिमेला येथे भक्तांची मोठी गर्दी होते.
सप्तकोटीश्वराच्या मंदिरात दर सोमवारी भाविकांची गर्दी होते. महाशिवरात्री हा येथे साजरा करण्यात येणारा प्रमुख सण आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे शेकडो भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. दररोज सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत येथील मंदिरांत भाविक दर्शन घेऊ शकतात.