पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिराबरोबरच डहाणूनजीकच्या आशागड येथील संतोषी मातेचे मंदिरही प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या देवस्थानी, देवीचे नवीन तसेच जुने मंदिर आहे. नवीन मंदिराच्या मागील बाजूस गुहेतील दगडांच्या कपारीत स्वयंभू मूर्तीचे स्थान आहे. पौराणिक माहितीनुसार, संतोषी माता ही महालक्ष्मीचे रूप व गणपतीची कन्या आहे. संतोषी मातेची उपासना केल्याने दुःख व दारिद्र्य नष्ट होते, सर्व प्रकारच्या क्लेशांचे व संकटांचे निवारण होते आणि ऐश्वर्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की या गावात राहणारे जेठ्या बाला करमोडा हे शेती करत. १९६० मध्ये एके दिवशी ते गावातील एका पिंपळाच्या झाडाखाली पूजा करत असताना त्यांना देवीने दृष्टांत दिला. त्यानंतर सतत सात दिवस देवी त्यांच्या स्वप्नात आली. सातव्या दिवशी स्वप्नात आलेल्या देवीने ‘मी आशागड गावातील कोकत्री डोंगरावर असून माझी प्रतिष्ठापना कर’, असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली. या जागृत व नवसाला पावणाऱ्या देवीची महती हळूहळू पंचक्रोशीत पसरून अनेक भाविक तिच्या दर्शनासाठी येथे येऊ लागले. १९७५ मध्ये आलेल्या कानन कौशल अभिनित व विजय शर्मा दिग्दर्शित ‘जय संतोषी माता’ या चित्रपटाने देशात प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर येथील मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
डोंगरी व सागरी भागात वसलेल्या डहाणू तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. उत्तरेस तलासरी तालुका तसेच गुजरातची सीमा, दक्षिण दिशेला पालघर, पूर्वेला जव्हार व विक्रमगड तर पश्चिमेला अरबी समुद्र असलेला हा आदिवासीबहुल तालुका आहे. आदिवासींच्या वैशिष्ट्यपूर्ण, जगप्रसिद्ध वारली चित्रकलेचे उगमस्थान असलेल्या या तालुक्यात महालक्ष्मी (डहाणू), महालक्ष्मी (विवळवेढे), साईबाबा मंदिर (नरपड) आदी प्रसिद्ध मंदिरेही आहेत. त्यापैकीच एक असलेले संतोषी मातेचे हे मंदिर डहाणू-चारोटी मार्गावरील आशागड येथे आहे. मंदिराच्या मार्गावर फुले व प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहेत. लांबूनच नव्या मंदिराचे शिखर लक्ष वेधून घेते. काही अंतर चालत गेल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर असलेली मोठी दीपमाळ पाहायला मिळते. पायऱ्या संपल्यावर फरसबंदी केलेल्या मोकळ्या जागेत होमकुंड आहे. समोरच असलेल्या मंदिरात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पायऱ्या चढून आल्यावर प्रशस्त आवार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना सिंह आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतींलगत दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. सभामंडप, गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर देवीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मूर्तीवर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहात देवीच्या मूर्तीमागे मोठ्या दगडी शिळा आहेत. त्या शिळा तशाच ठेवून तेथे मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. देवीच्या उजवीकडे अन्य दोन देवींचे शेंदूरचर्चित तांदळे आहेत. अनेक भक्त मंदिराच्या खिडक्यांच्या जाळ्यांवर नवसाचे नारळ तसेच देवीसाठी आणलेली चुनरी बांधतात.
मंदिराच्या डावीकडे हनुमानाचे मंदिर आहे. येथे शंकराची दोन मंदिरे आहेत. त्यापैकी एका मंदिरात शिवपिंडीसोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे पिंडीच्या डावीकडील मागील भिंतीजवळ एक उभी शिळा आहे. दुसऱ्या मंदिरात केवळ शिवपिंडी आहे. मंदिराच्या उजवीकडे असलेल्या प्रशस्त सभामंडपात भाविक उद्यापन करतात. उद्यापनासाठी दर शुक्रवारी १० ते २ या वेळेत पुजारी उपलब्ध असतात. मंदिराच्या डावीकडे असलेल्या सभागृहात दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिराच्या परिसरात जेठ्या बाला करमोडा यांची समाधीही आहे. मंदिराच्या मागील बाजूस देवीचे मूळ स्थान असलेली गुहा आहे. पायऱ्या उतरून येथे यावे लागते. या परिसरात फरसबंदी करण्यात आली असून गुहेकडे येणाऱ्या मार्गावर पत्र्याची शेड आहे. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराला छोटे लोखंडी गेट आहे. गुहेचे मुख अरुंद असल्याने नतमस्तक होऊन आत जावे लागते. एका वेळी केवळ एकच व्यक्ती गुहेत प्रवेश करू शकते. गुहेतील काही पायऱ्या चढून गेल्यावर दगडाच्या कपारीत स्वयंभू देवीचा शेंदूरचर्चित तांदळा आहे. येथील एका ठिकाणी भाविक चुनरी बांधून देवीला नवस बोलतात. येथून मंदिर परिसरातील गर्द वनराईचे दर्शन होते.
ही देवी भक्तांना रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक येथे येतात. देवीचा वार असलेल्या शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्रोत्सवादरम्यानही भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून जातो.