संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या एकमेव स्त्रीशिष्या संत बहिणाबाई यांचे समाधिस्थान असलेल्या शिऊर गावात तुकाराम महाराजांचे शिष्य असलेले संत निळोबाराय यांचे शिष्य संत शंकरस्वामी महाराज यांची समाधीही आहे. या समाधी मंदिरात शंकरस्वामींचे पुत्र नारायणस्वामी महाराज यांचीही समाधी असून पिता–पुत्रांची एकाच ठिकाणी समाधी असणारे हे दुर्मिळ स्थान मानले जाते. प्राचीन व जागृत रावणेश्वर महादेव मंदिर, बहिणाबाई आणि शंकरस्वामी यांच्या समाधी मंदिरांमुळे संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर हे गाव भाविकांसाठी भक्तिपीठ बनले आहे.
इ.स. १६३५ मध्ये म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या काळात निळोबाराय यांचा जन्म झाला होता. त्यांची आणि संत तुकारामांचे पुत्र नारायणबुवा, कान्होबाकाका यांची भेट झाली होती. तेथेच त्यांनी मनोमन तुकाराम महाराजांना गुरू मानले. अशा या थोर संतांचे शिष्यत्व शंकरस्वामी महाराज यांनी स्वीकारले होते. विशेष म्हणजे निळोबाराय यांचे जन्मस्थान शिऊर गाव असून शंकरस्वामी यांचे समाधिस्थळही शिऊर येथे आहे. इ.स. १७२५ मध्ये मार्गशीर्ष वद्य अष्टमीस त्यांनी येथे समाधी घेतली. इ.स. १८४९ मध्ये येथील ग्रामस्थांनी स्वखर्चातून त्यांचे समाधी मंदिर बांधले होते. पुढे २०१३ मध्ये केलेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे.
शिऊर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रणिता तीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तलावाकाठी संत शंकरस्वामी महाराज यांचे १२८ फूट उंचीचे समाधी मंदिर आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर मराठवाड्यातील सर्वांत उंच मंदिर आहे. मंदिरास चारी बाजूंनी उतरत्या छपराच्या आकाराचे शिखर असून ते नागरशैलीत बांधण्यात आलेले आहे. या शिखरावर चारही बाजूंनी छोट्या शिखरांच्या उठावदार प्रतिकृती आहेत. या सर्व शिखरांवर नक्षीकाम आहे. मंदिरास द्विस्तरीय आमलक (शिखर व कळस यामधील भाग) आणि त्यावर कळस आहे. या मंदिराच्या रंगकामात मोठ्या प्रमाणावर सुवर्णरंगाचा वापर करण्यात आलेला आहे. उंच जोत्यावर बांधण्यात आलेल्या या मंदिरास सर्व बाजूंनी सुवर्णरंगी नक्षीदार खांबांचा आधार देण्यात आला आहे. भिंतींवर मोठ्या जाळीदार खिडक्या आहेत. या खिडक्यांना बाहेरच्या बाजूने महिरपी कमानी आहेत. सात संगमरवरी पायऱ्या चढून मंदिराच्या भव्य आणि दुमजली सभामंडपात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराजवळच सभामंडपात कासवाची मूर्ती असून त्यापुढे संत शंकरस्वामी महाराज आणि त्यांचे पुत्र नारायणस्वामी महाराज यांच्या दोन स्वतंत्र चौथऱ्यांवर समाध्या आहेत. सभामंडपाला लागून असलेल्या खुल्या गर्भगृहात एका उंच चौथऱ्यावर मध्यभागी विठ्ठल–रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या उजव्या बाजूला संत तुकाराम महाराज आणि डाव्या बाजूला संत निळोबाराय यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.
या मंदिर परिसरात विश्वस्त मंडळाचे कार्यालय, कीर्तनकार व प्रवचनकार यांच्यासाठीची निवासव्यवस्था व अध्यात्म संस्कार केंद्र आहे. याशिवाय येथे चाळीस हजार चौरस फूट आकाराचा भव्य असा कीर्तन मंडप आहे. या ठिकाणी होणाऱ्या कीर्तन सोहळ्यांना हजारो भाविक उपस्थित राहतात. श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थानतर्फे दरवर्षी ऑगस्ट महिन्यात अत्यंत भव्य स्वरूपात ‘अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताह’ साजरा करण्यात येतो. दरवर्षी हा सप्ताह वैजापूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये होत असल्याने त्यास फिरता नारळी सप्ताह असे म्हणतात. या सप्ताहाकरीता त्या त्या ठिकाणी हजारो भाविक बसू शकतील, असे जलरोधक मोठे मंडप बांधण्यात येतात. तेथे ज्ञानदानाबरोबरच अन्नदानाचाही भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. असे सांगितले जाते की संत शंकरस्वामी महाराजांनी इ.स. १७४५ मध्ये ही अन्नदानाची परंपरा सुरू केली होती. आज तिला अत्यंत भव्य असे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सप्ताहातील अन्नदानाकरीता वैजापूर, गंगापूर, कन्नड, नांदगाव या तालुक्यांतील सुमारे १२५ गावांतून तेथे भाकऱ्या आणण्यात येतात. सप्ताहस्थळी हजारो लिटर आमटी तयार करण्यात येते. महाप्रसादासाठी १११ पोती साखर वापरण्यात येते. दोन ते अडीच डझन चुलांगणावर हा स्वयंपाक सिद्ध केला जातो. लाखो भाविकांच्या पंगती येथे उठतात. पंगतींमध्ये अनेकदा अक्षरशः ट्रॅक्टरच्या साह्याने आमटी वितरित केली जाते.
या सप्ताहात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात, तसेच राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळी येथे आपली सेवा रुजू करतात. काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होते. या समाधी मंदिराचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे येथे वर्षाचे ३६५ दिवस व दररोज २४ तास अखंड वीणावादन होते.