बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा हे गाव पैनगंगेची उपनदी असलेल्या भोगवती नदीच्या तीरावर वसलेले आहे. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात अनेक महान विभूतींनी जन्म घेतला आहे. त्यामध्ये विदर्भाच्या रूक्ष आणि खडकाळ जमिनीवर भक्तीचा मळा फुलवणारे संत म्हणून सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज (रामदासी) यांचे नाव आदराने घेतले जाते. साखरखेर्डा येथे असलेले संत प्रल्हाद महाराज संस्थान हे हजारो भाविकांचे व महाराजांच्या अनुयायांचे श्रद्धास्थान आहे.
संत प्रल्हाद महाराज (रामदासी) यांचा जन्म १८९३ मध्ये माघ अमावस्येच्या दिवशी मेहकर तालुक्यातील वेणी या लहानशा गावी मुकुंदशास्त्री काळे आणि गंगाबाई या दांपत्याच्या पोटी झाला. लहानपणापासूनच प्रल्हाद महाराजांची वृत्ती अत्यंत शांत आणि अंतर्मुख होती. बालपणातच त्यांच्यातील दयाळू आणि अहिंसक वृत्तीची प्रचिती आली, जेव्हा त्यांनी शाळेत कीटक मारण्याच्या मोहिमेला विरोध करत ‘मी जीवांची हत्या करणार नाही’ असे ठणकावून सांगत शाळा सोडून दिली. शालेय शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांना वेद, शास्त्र आणि पुराणांचे ज्ञान वडिलांकडून आणि मोठ्या भावाकडून मिळाले होते.
लौकिक शिक्षणापेक्षा आत्मज्ञानाची ओढ त्यांना अधिक होती. साखरखेर्डा हे गाव त्यांच्या पूर्वजांचे, येथेच त्यांचे वास्तव्य होते. ऐन तारुण्यात जेव्हा मुले संसारात रमतात, तेव्हा प्रल्हाद महाराज तासनतास एकांतवासात नामस्मरण करत असत. त्यांच्या या तीव्र ओढीने त्यांना सद्गुरूंच्या शोधात आणले आणि चिखली तालुक्यातील किन्होळा येथे त्यांची भेट समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतील आणि गोंदवलेकर महाराजांचे पट्टशिष्य असलेल्या रामानंद महाराजांशी झाली. १९१० च्या हनुमान जयंतीला साखरखेर्डा येथे त्यांना अनुग्रह मिळाला आणि प्रल्हाद महाराज खऱ्या अर्थाने ‘रामदासी’ झाले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात विलक्षण पैलू म्हणजे त्यांचा विवाह. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा कृष्णाबाईंशी (जिजिमाय) विवाह झाला खरा, पण हा विवाह संसारासाठी नव्हता तर सहयोगाने ईश्वरप्राप्ती करण्यासाठी होता. पती-पत्नी दोघांनीही ‘आजीवन ब्रह्मचर्य’ पाळण्याचा जो संकल्प केला, तो त्यांनी आयुष्यभर निष्ठेने पाळला. गृहस्थाश्रमात राहूनही त्यांनी ज्या प्रकारे अलिप्तता जपली, ते आधुनिक काळातील एक आश्चर्य मानले जाते.
१९२० मध्ये गुरूंच्या एका सूचनेवरून त्यांनी आपली सर्व मालमत्ता आणि घर ब्राह्मणांना दान करून टाकले आणि स्वतः राममंदिरात राहून लोकसेवा व
नामस्मरण सुरू केले. महाराजांनी आपल्या आयुष्यात १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण करण्याचा संकल्प केला होता, जो त्यांनी अत्यंत शिस्तीने पूर्ण केला. ‘रामनाम घ्या, रामराया तुमचे कल्याण करेल,’ हा त्यांचा साधा पण प्रभावी संदेश हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा देऊन गेला. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात फिरून समर्थ रामदास स्वामींच्या ‘दासबोधा’चा प्रचार केला आणि अनेक ठिकाणी श्रीराम व मारुती मंदिरांची स्थापना करून भक्तीचे जाळे विणले. महाराजांच्या भक्तीची व्याप्ती इतकी अफाट होती की त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक जण भारावून जात असे. असे म्हटले जाते की त्यांच्या अंतर्मनात रामनामाचा जप इतका भिनला होता की त्यांच्या नाडीतूनही ‘राम-राम’ असा ध्वनी उमटत असे. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे साखरखेर्डा हे गाव भक्तीचे केंद्र बनले. आयुष्यभर श्रीरामाची भक्ती आणि समाजाचे आध्यात्मिक प्रबोधन केल्यानंतर, १९७९ मध्ये कार्तिक शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अकोला येथे या महान महात्म्याने आपला देह ठेवला. साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराजांच्या या मंदिरात त्यांची समाधी आहे;
येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. महाराजांनी सुरू केलेला नामस्मरणाचा आणि अन्नदानाचा वारसा आजही येथे त्याच श्रद्धेने सुरू आहे.
साखरखेर्डा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंदिर उभारण्यामागची कथाही वेगळी आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी मोठ्या देणग्यांची अपेक्षा न करता, ‘भिक्षा – एक वीट’ अशी योजना राबवली गेली. रामायणात ज्याप्रमाणे सेतू बांधताना खारीने मदत केली होती, त्याचप्रमाणे गावातील आणि परिसरातील गरीब जनतेने एक-एक वीट देऊन हे मंदिर उभे केले. त्यामुळे हे संस्थान खऱ्या अर्थाने ‘सर्वसामान्यांचे’ आहे, असे म्हटले जाते. या मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे. उंच अधिष्ठानावर उभ्या असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात येण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. या सभामंडपात उजवीकडे लहानसे मारुतीचे मंदिर आहे. सभामंडपात मध्यभागी खुले अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना रामदास स्वामी व ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर संगमरवरी मखरात श्रीरामाची मूर्ती आहे. या वज्रपिठाला लागून खालच्या बाजूला श्री प्रल्हाद महाराज (रामदासी) यांची मूर्ती आहे.
सभामंडपात डावीकडे महाराजांचे समाधीस्थान आहे. सभामंडपातून सुमारे १५ पायऱ्या उतरून महाराजांच्या समाधी मंदिरात प्रवेश होतो. येथे महाराजांच्या समाधी स्थानावर त्यांची मूर्ती आहे. या समाधी स्थानाच्या शेजारीच जिजिमाय यांचे समाधी स्थान आहे.
मंदिरात दररोज सकाळी ५.३० वाजता भूपाळी आरती होते. दुपारी १२ ते १ या वेळेत महानैवेद्य व आरती आणि सायंकाळी ८ ते ९ या वेळेत दासबोधाचे वाचन होते. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत येथील समाधीस्थान भाविकांना दर्शनासाठी बंद असते. या संस्थानात वर्षभरात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात.
त्यामध्ये चैत्र शुद्ध नवमीला श्रीराम नवमी, चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती, वैशाख वद्य दशमीला जिजीमाय पुण्यतिथी, आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा महोत्सव, कार्तिक शुद्ध चतुर्थी प्रल्हाद महाराजांची पुण्यतिथी, गोकुळाष्टमी, मार्गशीर्ष वद्य दशमीला दत्तचैतन्य महाराज पुण्यतिथी, मार्गशीर्ष वद्य द्वादशीला रामानंद महाराज पुण्यतिथी, माघ वद्य नवमीला दासनवमी उत्सव, माघ वद्य द्वादशीला रामानंद महाराज जन्मोत्सव व माघ अमावस्येला प्रल्हाद महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.