संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर

आपेगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

विश्वात्मक देवाकडे अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे आणिज्ञानेश्वरीहा श्रीमद्‌भगवद्‌गीतेवरील मराठी टीकाग्रंथ लिहून सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्मज्ञानाची गंगा आणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू गुरू निवृत्तीनाथ, कनिष्ठ बंधू सोपान आणि भगिनी मुक्ताबाई यांचे आपेगाव हे जन्मस्थान. पुढे ज्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दीक्षा दिली, त्याच पर्वतातून उगम पावणाऱ्या गोदावरीच्या विस्तीर्ण पात्राशेजारी हे गाव वसलेले आहे. तेथे ज्ञानेश्वर महाराजांचे पाषाणशिळांतून बांधलेले मंदिर प्रसिद्ध आहे.

विठ्ठलपंत रुक्मिणीबाई यांच्या पोटी निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान मुक्ता ही चार अपत्ये जन्माला आली ती आळंदी येथे, असा समज पूर्वी रूढ होता. मात्र त्यांची जन्मभूमी आपेगाव हीच असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यावर आपेगाव संस्थानचे प्रमुख ... ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने संत ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडांची जन्मभूमी ही आळंदी वा पैठण नसून आपेगावच असल्याचा निकाल विविध पुरावे आणि नोंदी पारखून दिला होता. त्यास आता ४० वर्षे उलटून गेली आहेत. या गावामध्ये संत ज्ञानदेवांचे पुरातन मंदिर आहे. या प्राचीन मंदिराच्या बाजूला आता नवीन दगडी मंदिर बांधण्यात आले आहे.

प्राचीन इतिहासानुसार, हरिपंत कुळकर्णी हे यजुर्वेदी ब्राह्मण आपेगावचे कुळकर्णी होते. ते ज्ञानेश्वरांचे ज्ञात पूर्वज तसेच पणज्यांचे पणजे होते. त्या घराण्यातील गोविंदपंत त्यांची पत्नी निराई यांचा विठ्ठल हा पुत्र होय. या विठ्ठलपंतांना तारुण्यातच वैराग्य, भक्ती ज्ञान उत्पन्न होऊन ते तीर्थयात्रेस गेले. आळंदी येथे त्यांची तेथील थोर ब्राह्मण सिद्धोपंत यांच्याशी भेट झाली. सिद्धोपंत यांच्या आश्रमातच विठ्ठलपंत राहिले. नंतर सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र ते प्रवृत्तीने विरक्त संन्यासी असल्याने त्यांनी सन्यास घेतला ते काशीस गेले; परंतु तेथे त्यांच्या गुरूंस ते विवाहित असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची आज्ञा केली. त्यानुसार विठ्ठलपंतांनी पत्नी रुक्मिणी हिच्याशी आपेगाव येथे पुन्हा संसार थाटला. तेथे त्यांना निवृत्तीनाथ (माघ शुद्ध प्रतिपदा, शके ११९५, सोमवार, .. १२७३), ज्ञानेश्वर (श्रावण वद्य अष्टमी, शके ११९७, गुरुवार, .. १२७५), सोपान (कार्तिक शुद्ध पौर्णिमा, शके ११९९, रविवार, .. १२७७), मुक्ताबाई (अश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १२०१, शुक्रवार, .. १२७९) अशी चार मुले झाली. या चौघांचे जन्मस्थान म्हणून आज आपेगाव सर्वत्र ओळखले जाते. ज्ञानेश्वरादी भावंडांचा आपल्या जीवनातील अधिक काळ म्हणजेच १२ ते १४ वर्षे या गावात वास्तव्य होते. या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी तप अनुष्ठान केल्यामुळे या भूमीस ज्ञानेश्वरांचे शक्तिपीठ म्हणून संबोधले जाते. हे स्थान भौगोलिकदृष्ट्याही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोदावरी तीरावर वसलेले श्री क्षेत्र आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना अहिल्यानगर या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.

गावामध्ये शिरताच पहिल्यांदा एक मोठे प्रवेशद्वार दिसते. ‘दानशूर श्रीमान रसिकलाल माणिकचंद धारीवाल प्रवेशद्वारअसे त्याचे नाव आहे. प्राचीन कमानदार वेशीसारख्या या प्रवेशद्वाराच्या खांबांवर सिंहमुख तसेच यक्षमूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. याशिवाय प्रवेशद्वारावर एका मावळ्याची उभी प्रतिमा आहे. त्याच्या बाजूला तोफांच्या दोन प्रतिकृती आहेत. या वेशीतून गावात गेल्यानंतर एका टोकास बाहेरून एका जुन्या प्राचीन वाड्यासारखी भासणारी वास्तू दिसते. पिवळ्या रंगात रंगवलेल्या या वास्तूचे प्रवेशद्वार गावाबाहेरील वेशीप्रमाणेच उंच आणि कमानदार असून त्यावर दोन्ही बाजूंस भालदारचोपदारांच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. या प्रवेशद्वारातून आत शिरताच समोर दगडी बांधकाम असलेले ज्ञानेश्वर मंदिर दिसते.

मंदिराचे बांधकाम हेमाडपंती शैलीप्रमाणे दगड, चुना शिसे यांचा वापर करून करण्यात आलेले आहे. दगडी उंच जोत्यावर मंदिर बांधलेले आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. सभामंडप हा खुल्या प्रकाराचा असून त्यात दहा खांब आहेत. त्यांवर पुष्पाकृती कोरून त्यांची सजावट करण्यात आलेली आहे. हे सर्व खांब दगडी महिरपीने एकमेकांस जोडलेले आहेत. सभामंडपावर छोटे शिखर असून त्यावर कळस आहे. तेथे वरपासून खाली टांगलेली एक घंटा आहे. मध्यभागी छोट्या दगडी ओट्यावर पादुका आहेत. तेथूनच गर्भगृहातील संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे मुखदर्शन होते. गर्भगृहाच्या चौकटीस चांदीचा पत्रा मढवलेला असून त्यावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. द्वारपट्टिकेवर गणेशाची मूर्ती दोन्ही बाजूंस शुंड उभारलेली गजमुखे आहेत. आत समोरच एका उंच दगडी आसनावर बसलेली संत ज्ञानदेवांची अर्धपारदर्शक हस्तिदंत रंगाची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीचा एक हात शांतमुद्रेत असून एका हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे. आसनावरही कलाकुसर केलेला चांदीचा पत्रा मढवलेला आहे.

या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम .. २०१९ मध्ये पूर्ण झाले. मंदिराच्या प्रांगणात कीर्तन सभागृह आहे. त्यात संत ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडांच्या जीवनातील विविध प्रसंगांची भीत्तिचित्रे चितारण्यात आलेली आहेत. येथेच या भावंडांच्या वंशावळीची माहिती देणारा वंशवृक्षही दाखवण्यात आला आहे. मंदिराचे शिखर ५१ फूट उंचीचे असून त्यावर सोन्याचा कळस आहे. मंदिराच्या बाजूला संत त्र्यंबकपंत संजीवन समाधी मंदिर आहे. असे सांगितले जाते की त्र्यंबकपंतांना गोरक्षनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. ज्ञानेश्वरांच्या कुटुंबातील पहिली संजीवन समाधी त्र्यंबकपंतांनी घेतली.

मंदिर आवारात अजानवृक्ष आणि पिंपळ आहे. अशी आख्यायिका आहे की गृहस्थाश्रमाचा त्याग करून निघून गेलेले विठ्ठलपंत परत यावेत म्हणून त्यांच्या पत्नीने या पिंपळास सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. आवारात एक गुरुकुल बांधण्यात आले असून तेथे पाचव्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच त्यांना कीर्तनप्रवचनाचे धडे, गीता, हरिपाठ विचारसागर हे शिकवले जाते. ही मुले गावातील जिल्हा परिषदेच्या, तसेच खासगी शाळेत शालेय शिक्षणही घेतात. याच आवारात अलीकडे गुरुवर्य विष्णुमहाराज कोल्हापूरकर यांच्या समाधीचे दुमजली दगडी मंदिर बांधण्यात आले आहे. खालच्या मजल्यावर त्यांचे समाधिस्थान आहे. बाहेरून लोखंडी शिडीने मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर जाता येते. तेथे महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. विष्णुमहाराज कोल्हापूरकर ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी आपेगाव हीच ज्ञानेश्वर अन्य भावंडांचे जन्मगाव आहे हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयापर्यंत जाऊन प्रयत्न केले होते.

या मंदिरात सातत्याने धार्मिक कार्यक्रम होत असतात. ज्ञानेश्वरांचा जन्म गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर झालेला असल्याने त्या दिवशी येथे मोठा उत्सव केला जातो. पारायण, हरिपाठ आदी कार्यक्रम येथे वर्षभर सुरू असतात. २९ ऑगस्ट १९७५ रोजी शासनाच्या वतीने येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म सप्तशताब्दी सोहळा साजरा करण्यात आला होता. याशिवाय आपेगावच्या विकासासाठी राज्य शासनाने २०११ मध्ये पैठणआपेगाव विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.

उपयुक्त माहिती:

  • पैठणपासून आठ किमी, संभाजीनगरपासून ६३ किमी 
  • पैठण, शहागड येथून एसटीची सुविधा तसेच खासगी वाहतूक सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासासाठी धर्मशाळा हॉटेलची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२८ ३६६१६, ८२०८३३८९९३
  • ईमेल : dnyaneshwarmaharaj@gmail.com
Back To Home