संत बहिणाबाई समाधी मंदिर

शिऊर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश ।। या सुप्रसिद्ध अभंग ओळींची रचना करणाऱ्या, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिष्यत्वाचे भाग्य लाभलेल्या आणि विठ्ठलास समर्पित आयुष्य जगणाऱ्या संतकवयित्री बहिणाबाई पाठक यांनी शिऊर येथे .. १७०० मध्ये वयाच्या ७२व्या वर्षी समाधी घेतली. त्यांनी लिहिलेल्या निर्याणपर अभंगांनुसार १८ दिवस आधी त्यांना आपला मृत्यूकाळ समजला होता. आत्मज्ञान हेच तीर्थ आहे, असे मानणाऱ्या बहिणाबाईंनी अन्य तीर्थक्षेत्री जाता शिऊर येथेच समाधी घेण्याचा निर्णय घेतला. येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.

मराठीमध्ये आत्मवृत्ते आत्मचरित्रे यांची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेत संत बहिणाबाई यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. त्यांनी लिहिलेल्या आत्मवृत्तामुळे त्या पहिल्या स्त्री आत्मचरित्रकार ठरल्या आहेत. त्यांच्या या आत्मवृत्तामध्ये ११६ अभंग आहेत. त्यात त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचीच नव्हे तर त्यांच्या पूर्वजन्मातील स्मृतींचीही नोंद आहे. त्यांनी सांगितलेल्या आत्मवृत्तानुसार त्यांना मागील १२ जन्मांची आठवण होती. हे सर्व जन्म ३५१ वर्षांतील असून ते सर्व स्त्रीचे होते. आपल्या आत्मवृत्तात बहिणाबाईंनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनाही ओवीबद्ध केल्या आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटना प्रकाशात आल्या.

त्यांनी जेथे समाधी घेतली तेथेच त्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच समोर हनुमान मूर्तीचे दर्शन होते. त्याच्या बाजूला गणपती आणि शनिदेव यांच्या मूर्ती आहेत. मंदिरास खुला सभामंडप आहे. त्यातील भिंतीवरील देवळ्यांमध्ये अनेक संतमहात्म्यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. मुख्य मंदिराचा आकार षटकोनी असून मंदिरास उंचच उंच आठस्तरीय शिखर आहे. त्यावर ठिकठिकाणी गजमूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या उंच कळसावर वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज फडकत असतो.

मंदिराला दोन प्रवेशद्वारे असून द्वारपट्ट्यांवर धार्मिक प्रतिकांची कलाकुसर करण्यात आलेली आहे. समोरच संत बहिणाबाईंची समाधी आहे. तेथे १९६८ मध्ये . . . काशिनाथबाबा मोगल यांनी बहिणाबाईंच्या पादुकांची स्थापना केली. बाजूलाच बहिणाबाईंचे पुत्र संत विठोबा महाराज यांचीही समाधी आहे. त्या पाठीमागे भिंतीस लागून विठ्ठलरुक्मिणीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंतींवर देहूतील गाथामंदिराप्रमाणेच अभंग लिहिलेले आहेत.

बहिणाबाईंचा जन्म . . १६२८ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधील देवगाव येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्या तीन वर्षांच्या असतानाच गंगाधरपंत पाठक या तीस वर्षीय बीजवराशी त्यांचा विवाह झाला. ते भिक्षुक होते, तसेच वैद्यकीही करीत असत. लहानपणापासून बहिणाबाईंना परमार्थाची ओढ होती. कोल्हापूर येथे जयरामस्वामी वडगावकर यांच्या कीर्तनात त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले. तेव्हापासून त्यांना तुकाराम महाराजांच्या भेटीची ओढ लागली. कालांतराने देहूत येऊन त्यांनी तुकारामांची भेट घेतली. त्यावेळी मंबाजीने त्यांना आपले शिष्यत्व स्वीकारावे, असा आग्रह धरला; परंतु त्यांनी तो जुमानता तुकारामांचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे चिडलेल्या मंबाजीने बहिणाबाईंचा छळ सुरू केला. बहिणाबाई यांनी सांगितलेल्या कथेनुसार, मंबाजीने त्यांची गाय आपल्या घरात कोंडून ठेवून तिला सोट्याने मार दिला. असे सांगितले जाते की मंबाजी त्या गायीला मारत असे; परंतु त्याचे वळ तुकाराम महाराजांच्या पाठीवर उमटत असत. अखेर तुकाराम महाराजांनी विठ्ठलास साकडे घातले. त्यांच्या स्वप्नात गाय आली तिनेमला सोडवाअशी याचना केली. एवढ्यात मंबाजीच्या घरास आग लागली. लोक ती विझवण्यास गेले असता त्यांना तेथे ही गाय आढळली. त्या गायीच्या पाठीवरील वळ तुकारामांच्या पाठीवरील वळ पाहून सर्वच जण तुकाराम महाराजांची स्तुती करू लागले.

बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. त्यांनी तुकारामांप्रमाणेच अभंगरचना केली असून या अभंगांतून ठिकठिकाणी श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे तत्त्वज्ञान सहजसोप्या शब्दांत मांडले आहे. त्यांना विठोबा हा मुलगा होता. आपला मृत्यूकाळ जवळ आल्याचे समजल्यानंतर त्यांनी आपल्या मुलास आपल्या पूर्वजन्मांची हकीकत सांगितली. नंतर वायुनिरोधन करून त्यांनी आपला देह ठेवला. विठ्ठलभक्तीतून अध्यात्माच्या उच्चतम पायऱ्यांवर पोचलेल्या, तसेच प्रासादिक अभंगरचनांतून जीवनमार्गाची शिकवण देणाऱ्या थोर स्त्रीसंत तुकाराम महाराजांच्या एकमेव स्त्री शिष्या म्हणून आजही बहिणाबाई पाठक यांचे नाव भक्तिभाव आदराने घेतले जाते.

बहिणाबाईंच्या या समाधी मंदिरामध्ये भाद्रपद वद्य नवमी ते आश्विन शुद्ध प्रतिपदा या काळात पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवास . . . वै. शिवरामबाबा गोरे यांनी १९६७ मध्ये प्रारंभ केला असे सांगितले जाते. १९७२ पासून येथे . . . वै. काशिनाथबाबा मोगल यांनी पुण्यतिथी उत्सव, दिंडी, ज्ञानेश्वरी पारायण असे उपक्रम सुरू केले. दर आषाढी एकादशीस शिऊर येथून पंढरपूरला दिंडी नेण्यात येते. श्रीसंत बहिणाबाई महाराज संस्थानतर्फे दरवर्षीश्रीसंत बहिणाबाई महाराज फिरता नारळी सप्ताहही आयोजित करण्यात येतो. हा हरिनाम सप्ताह दरवर्षी वेगळ्या गावांमध्ये आयोजित करण्यात येत असल्याने त्यास फिरता नारळी सप्ताह असे म्हणतात. वै. काशिनाथबाबा मोगल यांचे चिरंजीव ... भागवताचार्य मधुसूदन . मोगल तसेच बहिणाबाईंच्या वंशातील मंडळी, संस्थान परिसरातील वारकरी यांचा या आयोजनात मोठा वाटा असतो. या सोहळ्यास वारकरी भजनी मंडळी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होत असते.

उपयुक्त माहिती:

  • वैजापूरपासून २४ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ५८ किमी अंतरावर
  • वैजापूर, कन्नड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : पवन पाठक, पुजारी, मो. ८१४९४ २१६९६
Back To Home