छत्रपती संभाजीनगर शहरातील राजाबाजार येथील संस्थान गणपती हे या शहराचे ग्रामदैवत आहे. शहरातील अनेक राजकीय व सामाजिक स्थित्यंतरांचा साक्षीदार असलेल्या या मंदिरातील गणेशाची मूर्ती स्वयंभू असून येथील गणेश नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शहरातील प्रत्येक उत्सव तसेच सार्वजनिक महत्त्वाच्या कार्यक्रमांची सुरुवात या गणपतीची पूजा करून केली जाते. याशिवाय कोणतीही निवडणूक असल्यास उमेदवार निवडणूक अर्ज भरण्याआधी या मंदिरात दर्शनाला येतात.
छत्रपती संभाजीनगर शहराची खडकेश्वर, कर्णपुरा देवी आणि संस्थान गणपती ही ग्रामदैवते आहेत. यापैकी एक असलेल्या राजाबाजार येथील गणेशाची काळ्या पाषाणाची स्वयंभू मूर्ती सुमारे ३५० वर्षांपूर्वी येथील एका पिंपळाच्या झाडाखाली सापडली होती. असे सांगितले जाते की ही मूर्ती नवव्या ते दहाव्या शतकातील आहे. मूर्ती ज्या ठिकाणी सापडली तेथे लहानसे मंदिर उभारून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दादासाहेब गणोरकर यांच्या पुढाकाराने १९३० मध्ये येथे शहरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. तेव्हापासून या गणेशाला येथे मानाचे स्थान आहे. गणेशोत्सवात या मंदिराचा मान पहिला असतो. शहरातील सार्वजनिक मंडळांमध्ये सर्वात आधी येथील गणपतीची प्राणप्रतिष्ठा व महाआरती होते. त्यानंतर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होते. अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभही येथूनच होतो. अनेक वर्षांपासून ही परंपरा जपण्यात आली आहे.
असे सांगितले जाते की १९१० च्या सुमारास ताई महाराजांचा दत्तक विधानावरील खटला औरंगाबादच्या न्यायालयात सुरू असताना वकील म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औरंगाबादला येत असत. त्यावेळी सर्वप्रथम या गणेशाचे दर्शन घेऊन ते खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात जात. १९८८ मध्ये औरंगाबाद महापालिकेची पहिली निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेला जाण्यापूर्वी या गणेशाचे दर्शन घेतले होते. महापालिकेत सत्ता आल्यास सोन्याचा मुकुट अर्पण करेन, असा नवस त्यांनी केला होता. त्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यावर शिवसेनाप्रमुखांनी स्वतः येऊन या गणेशाला सुमारे २३ तोळ्यांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला व आपला नवस पूर्ण केला. तत्पूर्वी शहरातील क्रांती चौक ते गणपती मंदिरापर्यंत मोठी मिरवणूक निघाली होती.
१९६० मध्ये मंदिराच्या ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला लाकडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला. या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी पूर्वी जागा नव्हती. या पार्श्वभूमीवर १९८५ मध्ये झालेल्या दुसऱ्या जीर्णोद्धारादरम्यान त्याचे ३५० चौरस फुटांचे संगमरवरी मंदिरात रूपांतर झाले. अनेक वर्षे पूजा–अर्चनेदरम्यान शेंदूरलेपन करण्यात आल्याने मूर्तीचा मूळ आकार बदलत गेला. मूर्तीवर शेंदूराचे थर चढत गेले. या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये शेंदूराचे जुने थर काढून मूर्तीवर वज्रलेपन करण्यात आले होते.
राजाबाजारच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या पूर्वाभिमुख संगमरवरी मंदिराचे स्वरूप सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा आहे. सभामंडपातील खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. मंदिराच्या संगमरवरी नक्षीदार महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस श्रीदत्ताची संगमरवरी मूर्ती दिसते. सभामंडप व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारांवरील ललाटबिंबांच्या वरील भागांवर कलश कोरलेले आहेत. गर्भगृहात एका उंच संगमरवरी चौथऱ्यावर, चांदीच्या पत्र्याने मढविलेल्या मखरात, गणपतीची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती बसलेल्या स्थितीत, पावणेदोन फूट उंचीची शेंदूरचर्चित व डाव्या सोंडेची आहे. गणेशाची ही मूळ मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. अष्टविनायकातील श्री चिंतामणी गणेशाप्रमाणे हे रूप आहे. गणपतीचे मुकुट, कान, डोळे व दात चांदीचे आहेत. मंदिराच्या सभामंडपावर व गर्भगृहावर असे दोन शिखर आहेत. या शिखरांवरही कोरीव काम केलेले आहे.
गणेशोत्सवात येथे अनेकदा चलत्चित्र देखावे केले जातात. रोज सकाळी अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन पठण व दुपारी अन्नदानाचे (भंडारा) आयोजन होते. सुमारे ६५ वर्षांची परंपरा असलेल्या या भंडाऱ्याचा हजारो भाविक लाभ घेतात. भंडाऱ्याच्या अन्नदानासाठी पुढील अनेक वर्षांसाठी देणगीदार ठरलेले आहेत. नव्या देणगीदारांसाठी येथे मोठी प्रतीक्षा यादी आहे. भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत व माघी जयंतीस येथे उत्सव साजरे होतात. यावेळी राजाबाजार, किराणा चावडी, शहागंज, जाधवमंडी हा परिसर भाविकांनी फुलून जातो. गणेशोत्सवादरम्यान येथे दीपोत्सवही होतो, त्यावेळी हजारो दिव्यांनी येथील परिसर उजळून निघतो. येथील गणेशोत्सवात पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असे. काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. काही वर्षांपूर्वी येथे तुरटीपासून बनविण्यात आलेल्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
संस्थान मंदिर चौकातील होळीही मानाची होळी म्हणून ओळखली जाते. या होळीला १५० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. होळीसाठी आणलेल्या एरंडाच्या झाडाच्या चारही बाजूंना लाकडे आणि गोवऱ्या रचण्यात येतात. त्याभोवती रांगोळी काढण्यात येते. सायंकाळी होलिकादहनापूर्वी होणाऱ्या महाआरतीला जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच विविध राजकीय पक्षांचे आमदार, खासदार व इतर नेते उपस्थित असतात.
मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जातात. गरजूंना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. माफक दरात दवाखाना चालवला जातो. आरोग्य, रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले जाते. त्याशिवाय गुणवंत विद्यार्थी, शिक्षक तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही केला जातो. दुष्काळादरम्यान चारा छावण्यांमध्ये चारा वाटपही केले जाते. मंदिराची जागा कमी पडत असल्याने विश्वस्त मंडळाने आजूबाजूची १९०० चौरस फूट जागा खरेदी केली आहे. आणखीही जागा खरेदी करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. ती जागा मिळाल्यास येथे दुमजली मंदिर उभारण्याचा मंडळाचा मानस आहे.