विलेपार्लेतील संन्यास आश्रम हे शैव आणि वैष्णव पंथातील विविध देवालयांचे भव्य संकुल आहे. देशात स्वातंत्र्याचा अखेरचा लढा सुरू असल्याच्या काळात स्थापन झालेल्या या आश्रम मंदिरामध्ये भाविकांना शंकर आणि विष्णूचे श्रीराम, श्रीकृष्ण व नरसिंह हे अवतार यांच्याबरोबर विविध देवदेवतांच्या दर्शनाचा लाभ होतो. या आश्रम मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथील पुरुषोत्तम भगवान मंदिर. या मंदिराचे दरवाजे केवळ अधिक मासात दर्शनासाठी खुले होत असल्याने या काळात येथे भाविकांची अलोट गर्दी लोटते.
येथील संन्यास आश्रमाचे मूळ पीठ हरिद्वारमधील सुरतगिरी बंगला येथे आहे. हा आश्रम दशनामी संप्रदायाशी संबंधित आहे. हा एक शैव पंथ आहे. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, या पंथाचा पुरस्कार आद्य शंकराचार्यांच्या शिष्यांनी तसेच प्रशिष्यांनी (गुरू-शिष्य परंपरेनुसार, एखाद्या गुरूच्या शिष्याच्या पुढील पिढीतील शिष्याला ‘प्रशिष्य’ म्हटले जाते) केला. पद्मपाद, हस्तामलक, सुरेश्वर आणि तोटक हे शंकराचार्यांचे चार प्रमुख शिष्य होते. शंकराचार्यांनी भारतात चारही दिशांना मठ स्थापून त्यांच्यावर या एकेका शिष्याची नेमणूक केली. त्यांच्यापैकी पद्मपाद यांचे तीर्थ व आश्रम असे दोन शिष्य होते, तर हस्तामलक यांचे वन व अरण्य, सुरेश्वर यांचे सरस्वती, पुरी व भारती असे तीन आणि तोटक यांचे गिरी, पर्वत व सागर असे तीन शिष्य होते.
या दहा शिष्यांच्या नावांवरून पुढे निर्माण झालेल्या पंथास ‘दशनामी’ असे संबोधण्यात आले. या पंथातील साधूंच्या नावापुढे पुरी, भारती, गिरी इत्यादी शब्द असतात.
महामंडलेश्वर स्वामी महेश्वरानंद गिरी यांनी २० जानेवारी १९४५ रोजी विलेपार्ले येथे संन्यास आश्रमाच्या या शाखेची स्थापना केली. महेश्वरानंद गिरी हे संस्कृत आणि वेदान्ताचे पंडित होते. १९३८ मध्ये त्यांची सुरतगिरी बंगला गादीचे नववे पीठाधीश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबईत संन्यास आश्रमाची स्थापना केल्यानंतर हळू हळू हा आश्रम सुमारे पाच एकर परिसरात विस्तारला. सन १९५२ मध्ये त्यांनी आश्रमात देवालयांचे मोठे संकुल उभारले. त्यामध्ये काशी विश्वनाथ महादेव, एकाम्रेश्वर महादेव, पार्वती परमेश्वर, कैलाशपती शिव, द्वादश ज्योतिर्लिंग, नटराज यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे येथे लक्ष्मीनारायण, श्रीनाथजी (श्रीकृष्ण), राम दरबार, राधाकृष्ण, विराट भगवान, पुरुषोत्तम भगवान, बालाजी, विठ्ठल-रुक्मिणी, नरसिंह भगवान या वैष्णव देवतांचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याचबरोबर या देवालय संकुलात गणपती, सिद्धिविनायक, हनुमान, दत्तात्रेय, सरस्वती, अंबा माता, खोडियार माता, चामुंडा माता, गायत्री माता, संतोषी माता, शीतला माता यांचीही प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे.
दशनामी संप्रदायाचे आद्यगुरू असलेल्या आदि शंकराचार्यांची, तसेच येथील संन्यास आश्रमाचे संस्थापक महेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या मूर्तीही येथे विराजमान आहेत. महेश्वरानंद गिरी यांचे १ मे १९७० रोजी निधन झाले. त्यानंतर दहावे पीठाधीश्वर म्हणून महामंडलेश्वर ब्रह्मानंद गिरी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात सत्तर आणि ऐंशीच्या दशकतात या मंदिर संकुलात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले. सध्या अकरावे पीठाधीश्वर विश्वेश्वरानंद गिरी महाराज हे या आश्रमाचा कारभार पाहतात.
विलेपार्ले रेल्वे स्थानकापासून जवळच प्रशस्त परिसरात संन्यास आश्रम वसलेला आहे. त्याच्या प्रांगणात मोठा वटवृक्ष आहे. समोरच ‘हरगोविंददास व्याख्यान मंदिर’ ही भव्य वास्तू उभी आहे. मध्यभागी प्रशस्त असा सभामंडप आणि त्याच्या तीन बाजूंना विविध गर्भगृहांत विविध देवदेवतांच्या मूर्ती अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रवेशस्थानी नंदीची मोठी मूर्ती आहे. येथील गर्भगृहांत लक्ष्मीनारायण, शिवपार्वती, श्रीकृष्ण, श्रीनाथजी, विराट भगवान, अंबा माता यांच्या सुंदर संगमरवरी मूर्तींचे दर्शन होते. या सभामंडपावर घुमटाकार शिखरे आहेत. तसेच मुख्य गर्भगृहांवर तीन उंच शिखरे आहेत.
या मंदिराच्या लगतच उजवीकडील मंडपामध्ये छोटी-मोठी देवालये तसेच देवकोष्टके आहेत. येथे गायत्री देवी, नटराज, गणेश, नरसिंह, मत्स्यभगवान, विठ्ठल-रुक्मिणी, तिरुपती बालाजी, खोडियार माता, संतोषी माता आदी देवतांचे दर्शन होते. याचप्रमाणे येथे समोरच्या बाजूस पुरुषोत्तम भगवानाचे मंदिर आहे. हे मंदिर केवळ अधिक मासात दर्शनासाठी खुले ठेवण्यात येत असल्याने या कालावधीत येथे रोज अनेक भाविकांची रीघ लागते. येथे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगेही विराजमान आहेत. येथे नजीकच एकाम्रेश्वर महादेवाचे स्वतंत्र देवालय आहे. त्यात महादेवाची मोठी पिंड विराजमान आहे. या संन्यास आश्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील गंगाधर भगवान म्हणजेच शिवशंकराचे मोठे शिल्प. हरगोविंददास व्याख्यान मंदिराच्या डाव्या बाजूस उघड्यावर हे शिल्प मांडलेले आहे.
संन्यास आश्रमात रोज सकाळी ६ ते १२ आणि सायंकाळी ३.३० ते ९ या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे विविध हिंदू सण व उत्सव मोठ्या उत्साहाने व धार्मिक वातावरणात साजरे केले जातात. खासकरून श्रावणी सोमवार, खोडियार उत्सव, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या आश्रमातर्फे गोशाला, तसेच संस्कृत विद्यालय चालवले जाते.