विश्वमोहिनी त्रिपुरसुंदरी/गजानन महाराज मंदिर

सिद्धार्थनगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई

शाक्त संप्रदायामध्ये देवीची दहा प्रधान रूपे मानण्यात आली आहेत. महाकाली, उग्रतारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला अशी त्यांची नावे होत. त्यांनाच आगमशास्त्रात दशमहाविद्या, तर निगमामध्ये विराटविद्या असे म्हणतात. यातील षोडशी देवीचे दुसरे नाव त्रिपुरसुंदरी असे आहे. तिला ललिता असेही म्हणतात. या देवीचे मुंबईतील एकमेव विख्यात मंदिर गोरेगाव येथे आहे. या मंदिरातच संत गजानन महाराज यांचीही मूर्ती विराजमान आहे.

त्रिपुरसुंदरी ही दैवी सौंदर्याची आणि सर्व सृष्टीची अधिष्ठात्री देवी मानली जाते. देशभरात या देवीची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यातील त्रिपुरा राज्यातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथील त्रिपुरसुंदरी मंदिर हे ५१व्या शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. याचप्रमाणे वाराणसीतील ललितादेवी मंदिर आणि तिरुवनंतपुरम येथील त्रिपुरसुंदरी मंदिरही विशेष प्रसिद्ध आहे. ‘गीता प्रेस’ने प्रकाशित केलेल्या ‘दशमहाविद्या’ या ग्रंथानुसार, महाविद्यांमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या षोडशी या देवीला ललिता, राजराजेश्वरी, महात्रिपुरसुंदरी, बालापंचादशी आदी नावांनी ओळखले जाते. तंत्रशास्त्रामध्ये या देवीस पंचवक्त्र म्हणजे पाच मुखांची असल्याचे म्हटले आहे. यातील चार मुखे चार दिशांची आणि एक मुख वरच्या बाजूस असते. ही मुखे तत्पुरुष, सद्योजात, वामदेव, अघोर आणि ईशान या शंकराच्या पाच रूपांची प्रतीके मानली जातात.

या देवीची मूर्ती कमलपुष्पावर बसलेली व चतुर्भुज स्वरूपात घडवली जाते. तिच्या हातात पुष्प, धनुष्य, बाण आणि पाश असतात. अन्य विद्या भक्तांस भोग किंवा मोक्ष यांपैकी कोणतीही एकच गोष्ट देतात. मात्र षोडशी अर्थात त्रिपुरसुंदरी ही देवी आपल्या उपासकांना भोग (भुक्ती) आणि मोक्ष (मुक्ती) या दोन्ही गोष्टी प्रदान करते, असे दशमहाविद्या या ग्रंथात म्हटले आहे. आद्य शंकराचार्यांनी श्रीविद्येच्या रूपातील याच देवीची उपासना केली होती. त्यामुळे सर्व शांकरपीठांमध्ये षोडशी त्रिपुरसुंदरी देवीची श्रीयंत्राच्या स्वरूपात पूजा केली जाते. गोरेगाव येथील मंदिरातही देवीची मूर्तीबरोबरच श्रीयंत्र स्वरूपात उपासना केली जाते.
गोरेगाव येथील त्रिपुरसुंदरी आणि गजानन महाराज मंदिराचा इतिहास असा, की या परिसरातील दंतवैद्य डॉ. स्वरूप प्रामाणिक यांनी या मंदिराची स्थापना केली. शेगावच्या गजानन महाराजांचे ते भक्त आहेत. सन १९९३ मध्ये त्यांनी येथे प्रथम गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना केली. डॉ. प्रामाणिक व त्यांची पत्नी भाग्यश्री हे त्रिपुरसुंदरी मातेचेही उपासक आहेत. या मंदिरात लावण्यात आलेल्या माहितीपत्रकानुसार, भाग्यश्री प्रामाणिक यांनी २५ वर्षांहून अधिक काळ देवीची साधना केली. त्या श्रीविद्येच्या उपासक म्हणून ओळखल्या जातात. देवीवरील या श्रद्धेतून त्यांनी गजानन महाराजांच्या या मंदिरामध्ये त्रिपुरसुंदरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. त्यानुसार २८ मार्च २०२२ रोजी या मंदिरात देवीच्या सुंदर मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवणारे म्हैसूर येथील सुविख्यात शिल्पकार अरुण योगीराज यांनीच येथील देवीची मूर्ती घडवली आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) आणि आरेचे जंगल यामुळे सुप्रसिद्ध असलेल्या गोरेगावमधील सिद्धार्थनगर येथील गजानन महाराज मार्गावर, रस्त्यालगतच हे मंदिर स्थित आहे. सभामंडप आणि त्यात गर्भागार अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून, त्यास संगमरवरी फरसबंदी केलेली आहे. सभामंडपास एक मुख्य आणि दोन उप अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. या कमानदार प्रवेशद्वारातून आत शिरताच या सभामंडपामध्ये डाव्या बाजूस संत गजानन महाराजांचे गर्भागार आहे. कोरीव नक्षीकाम केलेला सोनेरी पत्रा जडवलेल्या खुल्या प्रकारच्या गर्भागारामध्ये सुशोभित सिंहासनावर संत गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. वस्त्र आणि अलंकारांनी शृंगारलेल्या या मूर्तीच्या वर चांदीचे छत्र आहे. याच्या गर्भागाराच्या उजवीकडे एका उंच अधिष्ठानावर शंकर महाराज यांची मूर्ती विराजमान आहे. येथून पुढे काही अंतरावर विश्वमोहिनी त्रिपुरसुंदरीचे गर्भागार आहे. यात उंच वेदीवर त्रिपुरसुंदरीची कृष्णवर्णीय मूर्ती विराजमान आहे. साडेपाच फूट उंचीची ही मूर्ती एकाच काळ्या पाषाणात घडवण्यात आली आहे. येथे त्रिपुरसुंदरी ही शिवशंकरावर आरूढ आहे. देवीची ही मूर्ती चतुर्भुज स्वरूपात आहे. तिने खालच्या बाजूच्या डाव्या हातामध्ये कोदंड धारण केलेले आहे. याचा अर्थ हे धनुष्य इक्षुकांडापासून तयार केलेले असते. त्याची प्रत्यंचा मधुमक्षिकांनी बनलेली आहे. देवीच्या खालच्या बाजूच्या उजव्या हातामध्ये बाण आहेत. हे बाण कमळ, रक्तकैरव, कलहर, इंदिवर आणि आम्र या वृक्षांच्या फुलांनी बनलेले आहेत. ही आयुधे भोगप्रदान करणारी मानली जातात. देवीच्या वरच्या डाव्या हातात पाश आहे, तर उजव्या हातात अंकुश आहे. देवीने मस्तकी मुकुट धारण केलेला असून, त्यावर अर्धचंद्रकोर आहे. देवीच्या मूर्तीस विशेष सण-उत्सवांच्या वेळी सुवर्ण अलंकारांनी शृंगारले जाते. देवीच्या या मूर्तीसमोर श्रीयंत्र विराजमान आहे. या मंदिराच्या शेजारीच भव्य असा मंडप आहे. तेथे नागदेवतेचे देवालय आहे. या मंदिरात संगमरवरी वेदीवर पंचमुखी नागदेवतेची उठावशिल्प स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे.

या मंदिरात रोज सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या काळात भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात माघ वद्य सप्तमीस गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. याचप्रमाणे येथे ऋषीपंचमी, राम जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा, अक्षय तृतीया हे सण व उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात. नवरात्र हा या मंदिरातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत जल्लोषात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणारा उत्सव होय. या वेळी येथे श्री विद्येच्या उपासना पद्धतीनुसार विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

उपयुक्त माहिती

  • गोरेगाव रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • बोरिवली एस.टी. बसस्थानकापासून १२ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून येथे येण्यासाठी बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी :

विश्वमोहिनी त्रिपुरसुंदरी/गजानन महाराज मंदिर

सिद्धार्थ नगर, गोरेगांव (पश्चिम), मुंबई

Back To Home