जाखादेवी मंदिर

गोखले मार्ग (दक्षिण), दादर (प.), मुंबई

मुंबईच्या मूळ रहिवाशांपैकी एक असलेल्या भंडारी या कष्टकरी, कलासक्त आणि लढाऊ समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जाखादेवीचे मंदिर दादरच्या सायंतन चौकी (सैतान चौकी) विभागात स्थित आहे. जाखादेवी ही कोकणात ‘जाकादेवी’ या नावानेही ओळखली जाते. मूलतः लोकदेवता असलेल्या जाखादेवीचे मंदिर शंभरहून अधिक वर्षांपासून येथे उभे आहे. ही देवी जागृत आहे आणि ती आपल्या मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवात येथे देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यात भंडारी बांधवांप्रमाणेच परिसरातील ख्रिश्चन व मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.

पत्रकार-संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर यांच्या ‘भंडारी समाजाचा इतिहास’ या पुस्तकात भंडारी समाजाच्या उत्पत्तीची हकीकत देण्यात आली आहे. ही कथा ‘ब्राह्मोत्तर खंड’ आणि ‘कथा कल्पतरू’ या ग्रंथांमध्ये त्रोटक स्वरूपात आलेली आहे. त्या कथेनुसार, कोणे एके काळी तिलकासूर नामक दैत्य फार माजला होता. तेव्हा भगवान शंकराने त्याला घाण्यात टाकले आणि नंदीला घाणा फिरवण्यास सांगितले. नंदीचे श्रम पाहून शंकराच्या कपाळावर घर्मबिंदू तयार झाले. त्यातील एक बिंदू जमिनीवर पडताच, त्यातून एक पुरुष निर्माण झाला. तो भंडाऱ्यांचा मूळ पुरूष होय. तो शंकराची स्तुती करीत होता म्हणून शंकराने त्याला ‘भावगुण’ असे नाव ठेवले. त्यावेळी शंकराने त्याच्याकडे शीतल पेय मागितले. तेव्हा भावगुण उत्तरला, “मी कोठून आणून देऊ?” तेव्हा शंकराने आपल्या लीलेने तेथे सुरातरूचा (नारळीचा) वृक्ष उत्पन्न केला. भावगुणाने त्या झाडापासून मधुर सुरा काढून दिल्यावर शंकर संतुष्ट झाले. त्यांनी त्याला अलकावतीच्या भांडारावर अधिकारी म्हणून नेमले आणि तेव्हापासून त्यांच्या वंशजांना ‘भंडारी’ असे नाव पडले.

‘महिकावतीची बखर’ तसेच ‘साष्टीची बखर’ या ग्रंथांनुसार पैठणहून उत्तर कोकणात आलेल्या क्षत्रियांच्या ६६ कुळांमध्ये शेषवंशीय भंडाऱ्यांच्या नऊ कुळांचा समावेश होता. बिंब राजांच्या काळापासून या बेटांवर भंडारी समाजाची वस्ती आहे. हा समाज काटक आणि लढाऊ बाण्याचा असल्याने शिवाजी महाराजांच्या आरमारात या समाजातील युवकांचा मोठा भरणा असे. इ.स. १६७० ते १६७७ या काळात मुंबईच्या गव्हर्नरपदी असलेल्या जेराल्ड ऑंजिअर याने शहराच्या सुरक्षेसाठी एक संरक्षक दल उभारले होते. भंडारी समाजाची निष्ठा पाहून या दलात भंडारी समाजाचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला होता. या संरक्षक दलास ‘भंडारी मिलिशिया’ असे म्हटले जात असे. मुंबईच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या या समाजातील ‘कवळी’ आडनावाच्या कुटुंबाने शतकापूर्वी येथे जाखादेवीच्या मंदिराची स्थापना केली. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या कुटुंबाने या परिसरात घर बांधण्याचे ठरवले होते. त्या घराच्या पायासाठी खोदकाम करीत असताना त्यांना तेथे जाखादेवीची मूर्ती सापडली. काहींच्या म्हणण्यानुसार, ब्रिटिश काळात येथे रस्त्यासाठी खोदकाम करीत असताना ही मूर्ती सापडली. त्यावेळी या मूर्तीभोवती सापांनी विळखा घातला होता, असे सांगितले जाते. त्यांनी ही मूर्ती बाहेर काढून तिची याच ठिकाणी विधिवत् प्रतिष्ठापना केली. यानंतर अनंत कवळी यांनी येथे देवीसाठी मंदिर बांधले. कालांतराने येथे देवीची संगमरवरी सुबक मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूळ मूर्ती या नव्या मूर्तीच्या खाली असलेल्या चौथऱ्यात ठेवण्यात आली आहे.
देवीचे हे मंदिर जुन्या काळच्या मोठ्या कोकणी घरासारखे आहे. सात पायऱ्या चढून या मंदिरात प्रवेश होतो. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात संगमरवरी फरसबंदी केलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला दर्शनी भिंतीवर दोन देवकोष्टके आहेत. त्यांतील उजवीकडील देवकोष्टकात त्रिमुखी दत्ताची मूर्ती, तर डावीकडे आदिमाया भगवती जगदंबेची प्रतिमा विराजमान आहे. या भिंतीवर गणेशाची तसेच जाखादेवीची मोठी प्रतिमा लावण्यात आलेली आहे. गर्भगृहात मध्यभागी उंच वेदीवर जाखादेवीची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. येथे देवी द्विभुज स्वरूपात आहे. तिने एका हातात त्रिशूळ धारण केले आहे आणि तिचा दुसरा हात अभय मुद्रेत आहे. येथे देवीला रोज वस्त्रालंकारांनी शृंगारले जाते. देवीच्या मूर्तीलगत गणेशाची पितळी मूर्ती विराजमान आहे.

या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. नवरात्र हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव होय. नवरात्राच्या कालावधीत येथे भाविकांची मोठी गर्दी असते. अनेक महिला या काळात येथे येऊन देवीची ओटी भरतात. ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे देवीच्या भक्तांमध्ये मुस्लिम तसेच ख्रिश्चन समाजातील महिलांचाही समावेश आहे.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून २ अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ८ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : पल्लवी कोरे, विश्वस्त, मो. ९२२४२४३४६३

जाखादेवी मंदिर

गोखले मार्ग (दक्षिण), दादर (पश्चिम), मुंबई

Back To Home