जरी मरी माता मंदिर

स्वामी विवेकानंद रोड, वांद्रे (प.), मुंबई

जरी आणि मरी माता या लोकदेवतांचे प्रसिद्ध मंदिर वांद्रे रेल्वे स्थानकापासून जवळच एका तलावानजीक वसलेले आहे. हे मंदिर या परिसरातील क्षत्रिय मराठा परीट ज्ञातीचे आणि कोळी समाजाचे एक प्रमुख श्रद्धाकेंद्र आहे. येथील देवीचे स्थान सुमारे ३०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील जरी मरी माता जागृत आहे. ही देवी विविध आजारांचे निवारण करते असे मानले जाते. यामुळे या मंदिरात नेहमी भाविकांची वर्दळ असते. नवरात्रोत्सव हा येथील सर्वांत मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर परिसरास जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.

आदिम लोकसमुदायात निसर्गातील विविध तत्त्वांना ईश्वर मानून त्यांची पूजा केली जात असे. विविध नैसर्गिक आपत्ती, तसेच रोगराईच्या साथी या दैवीप्रकोपामुळे येतात, अशी सामान्य जनांची श्रद्धा असे. त्यातून या आपत्तींच्या वा रोगांच्या देवता कल्पून त्यांना संतुष्ट करण्याची प्रथा सुरू झाली. पूर्वी प्रत्येक गावामध्ये एक ग्रामसंरक्षक देवता असे. त्याचप्रमाणे गावाच्या सीमेवर रोगांच्या देवींचीही स्थापना करण्यात येत असे. जरी आणि मरी या लोकदेवता त्यातीलच एक होत. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, जरी आणि मरी या उग्र प्रकृतीच्या क्षुद्रदेवता आहेत. यातील जरी ही तापाच्या साथीची तर मरी ही पटकी आणि देवी यांसारख्या रोगांच्या साथीची देवी मानली जाते. प्रदेशपरत्वे ही देवी ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’ आणि ‘मरीभवानी’ अशा विविध नावांनी ओळखली जाते.

जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्यात किंवा गावाबाहेर झाडाखाली असते. तिच्या पुजाऱ्याला ‘पोतराज’ किंवा ‘पोतुराजा’ म्हणतात. हे पुजारी मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरतात. महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतातील मरीआईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व आहे. पोतराज हा मरीआईचा उपासक किंवा भगत असतो. त्याच्या माध्यमातून मरीआईला प्रसन्न करून घेता येते अशी सर्वत्र समजूत आहे. गावात आलेल्या साथीच्या शमनार्थ मरीआईचा गाडा गावसीमेपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो. त्याला काही ठिकाणी ‘कडकलक्ष्मी’ म्हणतात. मरीआईला संतुष्ट केल्याने गावावरील रोगराईचे संकट टळते, अशी लोकश्रद्धा आहे.

पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘भारतीय संस्कृतीकोश’ या ग्रंथाच्या सातव्या खंडात मरीआईविषयीच्या काही पौराणिक आख्यायिका दिलेल्या आहेत. त्यातील एका कथेनुसार पिरुह नावाच्या ऋषीची नागावली नावाची पत्नी होती. ती अत्यंत सुंदर होती आणि पतिव्रता म्हणून प्रसिद्ध होती. तिची ही कीर्ती ऐकून ब्रह्मा-विष्णु-महेशांनी तिची सत्त्वपरीक्षा घ्यायचे ठरविले. देव तिच्याकडे आले तेव्हा त्यांची ओळख न पटल्यामुळे नागावलीने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने तिन्ही देवांचे बालकांमध्ये रूपांतर केले. यामुळे देवांना राग आला आणि त्यांनी तिला “तुझे रूप नष्ट होऊन तू कुरूप बनशील” असा शाप दिला. या शापाच्या प्रभावाने नागावलीचे सौंदर्य नष्ट झाले आणि तिच्या मुखावर देवीच्या व्रणांसारखे व्रण उमटले. पिरुह ऋषींनी घरी येऊन पाहिले तेव्हा त्यांनी आपली पत्नी कुरूप झालेली दिसली. त्यांनी रागाने तिला घराबाहेर काढले आणि “तू राक्षसी म्हणून जन्माला येशील आणि लोकांना रोगाने पछाडून आपल्याप्रमाणेच कुरूप बनवत राहशील” असा पुन्हा शाप दिला. या शापाचा परिणाम म्हणून नागावली ‘मरिअम्म’ (मरीआई) च्या स्वरूपात जन्माला आली आणि तिच्या अवकृपेला लोक बळी पडू लागले.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार एक सुंदर ब्राह्मणकन्या होती. तिच्यावर एका चांडालाची नजर गेली. तो काशीला जाऊन वेद व ब्राह्मणी आचार शिकला. परत येऊन त्याने त्या ब्राह्मणाकडे मुलीला मागणी घातली. ब्राह्मणाला त्याचे कपट समजले नाही आणि त्यांनी त्याला मुलगी दिली. पुढे त्यांना मुलेही झाली. काही काळ गेल्यावर त्या मुलीला त्याचे कपट उमगले. तिने ही घटना आईबापांना सांगितली, तसेच संतापाने तिने आपल्या नवऱ्याला व स्वतःलाही शाप दिला. त्या शापाने ती मरी झाली व तिचा नवरा रेडा झाला. तिची मुले कोंबडी व बकरी बनली. अन्य एका आख्यायिकेत मरीमातेच्या जन्माची कथा रेणुकाआख्यानाशी जोडलेली आहे. जमदग्नी ऋषींच्या सांगण्यावरून परशुरामाने आपली माता मरिअम्म हिचा शिरच्छेद केला. त्यावेळी त्याच्या आड याणाऱ्या परिया (मातंग) जातीच्या स्त्रीचाही त्याने शिरच्छेद केला. परशुरामाची आज्ञाधारकता पाहून प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी त्यांना “हवा तो वर माग” असे सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या मातेस पुन्हा जिवंत करण्याचा वर मागितला. त्यानंतर जमदग्नींनी थोडे पाणी मंत्रून एक छडी दिली आणि “तुझ्या आईचे धड व शिर जुळवून त्यावर हे पाणी टाक आणि छडीने त्याला स्पर्श कर म्हणजे तुझी आई जिवंत होईल” असे सांगितले. मात्र आनंदातिरेकाने परशुरामाने चुकून त्या मातंग स्त्रीच्या धडाला आपल्या आईचे शिर आणि आईच्या धडाला त्या मातंग स्त्रीचे शिर जोडले. त्या दोघीही जिवंत झाल्या. ब्राह्मण स्त्रीचे शिर आणि परिया स्त्रीचे धड यांच्या जोडणीतून जिवंत झालेली स्त्री ‘मरिअम्म’ म्हणून मान्यता पावली, तर दुसरी स्त्री ‘यल्लम्म’ झाली. अशा प्रकारच्या आख्यायिकांमधून या लोकदेवतांचे उन्नयन करण्यात आले आहे. यातूनच मरीमाता ही कृष्णाची बहीण आणि जरी-मरी या आदिमाया पार्वतीचा अवतार असल्याच्या कथाही प्रचलित करण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या सात बेटांप्रमाणेच सालसेत (साष्टी) बेटांवरील गावपाड्यांमध्ये जरी आणि मरी माता यांची अनेक मंदिरे आहेत. वांद्रे तलावानजीकचे जरी मरी माता मंदिर हे त्यांपैकीच एक. साष्टी बेटांचा भाग असलेल्या वांद्रे या गावाचे मूळ रहिवासी कोळी होते. इ.स. १५३४ मध्ये दिएगो दा सिल्व्हेरा याच्या नेतृत्वाखालील पोर्तुगीज नाविकांनी आणि चाच्यांनी वांद्र्यावर ताबा मिळवला. पोर्तुगीज या गावाला ‘बांदोर’ असे संबोधत असत. पोर्तुगीज भाषेत याचा अर्थ बंदर असा होतो. त्यावरून या गावाला बांद्रे किंवा वांद्रे असे नाव पडले असे सांगितले जाते. ‘महिकावतीची बखर’ मधील पोर्तुगीज कालोत्तर भागामध्ये या गावाचा उल्लेख ‘वांदरे’ असा करण्यात आलेला आहे.

येथील जरी मरी माता मंदिराबाबतच्या एका आख्यायिकानुसार सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे क्षत्रिय मराठा परीट ज्ञातीचे काही लोक राहत होते. ते वांद्रे तलावावर कपडे धुण्यास जात असत. एकदा त्या तलावात काही लोकांना अचानक जरी आणि मरी माता यांची सांप्रदायिक चिन्हांसह स्वयंभू मूर्ती आढळल्या. तो दिवस मार्गशीर्ष वद्य द्वादशीचा होता. तारीख होती ९ जानेवारी १६९६. हा जरी-मरीचा प्रकट दिन म्हणून येथे साजरा केला जातो. पुढच्या काळात वांद्र्यातील पोर्तुगीजांचे प्रस्थ कमी झाले होते आणि हा भाग ब्रिटिशांच्या अंमलाखाली आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या मूर्तींची तलावानजीक प्रतिष्ठापना केली. कालांतराने तेथे देऊळ बांधण्यात आले. हळूहळू या देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागली. तेव्हा येथे मोठे देवस्थान उभारण्यात आले. यानंतर मंदिराच्या त्रिशताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने सन १९९६ मध्ये या देवालयाचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्याला आजचे सुंदर स्वरूप देण्यात आले.

वांद्रे तलावाच्या शेजारून वाहणाऱ्या मुख्य रस्त्याला लागूनच देवीचे हे मंदिर उभे आहे. मंदिर आधुनिक बांधकामातील आहे. तीन प्रवेशद्वारे असलेला आडवा सभामंडप आणि त्यात देवीचे गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपावर पत्र्याचे छप्पर आहे. मध्यभागी गर्भगृहाच्या वरच्या भागात शंखाकृती शिखर आहे. शिखरावर चक्राकार आमलक आणि त्यावर कलश आहे. सभामंडपाच्या मुख्य दरवाजातून आत जाताच समोरच संगमरवरी फरशा लावलेले गर्भगृह आहे. त्याच्या बाह्यभिंतींवर साईबाबा आणि भवानीमाता यांची चित्रे असलेल्या टाईल्स लावलेल्या आहेत. छताकडील बाजूस रासगरबा खेळत असलेल्या गोप-गोपिकांच्या चित्रांची रांग आहे. आत चांदीचा पत्रा जडवलेल्या आणि सूर्यनारायणासारखी प्रभावळ असलेल्या मखरवेदीवर जरी आणि मरी मातेची अनघड पाषाणमूर्ती विराजमान आहे. या शेंदूरचर्चित मूर्तीस पुष्पालंकारांनी शृंगारले जाते. देवीच्या बाजूला तिच्या बहिणी आणि भाऊ यांचे शेंदूरचर्चित पाषाण आहेत. सभामंडपातून गर्भगृहाला प्रदक्षिणामार्ग आहे. गर्भगृहाच्या उजवीकडे मागच्या बाजूस सप्तशृंगी मातेची प्रतिमा आहे. याशिवाय या सभामंडपात उजवीकडे चौकोनी खड्ड्यासारख्या जागेमध्ये भगवान शंकराची पिंड विराजमान आहे.

मंदिरात सकाळी ८ ते १२.३० आणि दुपारी ३ ते ८.३० या काळात भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जगन्नाथ जोशी अशा अनेक मातब्बर नेत्यांनी या मंदिरात येथे येऊन देवीची पूजा केल्याचे सांगितले जाते. येथे दररोज सकाळी ८.३० वाजता आणि सायंकाळी ७.४० वाजता आरती केली जाते. येथील जरी मरी माता ही नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक महत्त्वाचे कार्य हाती घेण्यापूर्वी येथे येऊन देवीस कौल लावतात. सोमवार, बुधवार, गुरूवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ५.३० या कालावधीत येथे कौल लावण्याचा विधी केला जातो. चैत्र आणि शारदीय नवरात्रातील नऊ दिवस मात्र कौलाचा विधी केला जात नाही. याचप्रमाणे येथील शिवलिंगावर सकाळी ९ ते दुपारी १२ या काळातच जल किंवा दुग्धाभिषेक केला जातो. या मंदिरात पाच महिन्यांपुढील गर्भवती महिलांना प्रवेश दिला जात नाही. मंदिरात चैत्र आणि शारदीय नवरात्र, तसेच शिवरात्र व होलिकोत्सव हे उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. नवरात्राच्या काळात येथे जत्रेसारखे वातावरण असते. या काळात देवीचा विशेष शृंगार, अभिषेक, पूजा आणि होमहवन केले जाते. वांद्रे आणि मुंबईच्या इतर भागांतून हजारो भाविक या नऊ दिवसांत देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येथे येतात. या सोहळ्यात परीट आणि कोळी बांधवांप्रमाणेच गुजराती, सिंधी, पारशी आणि मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. आषाढाच्या शुक्लपक्षात मढच्या जरीमरी मातेची यात्रा सुरू झाल्यानंतर या देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ होतो. पंधरा दिवस ही यात्रा चालते.

उपयुक्त माहिती

  • वांद्रे रेल्वे स्थानकापासून सुमारे ५०० मीटर मीटर अंतरावर
  • बोरिवली एस.टी. बसस्थानकापासून १८ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून येथे येण्यासाठी बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

जरी मरी माता मंदिर

स्वामी विवेकानन्द रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई

Back To Home