निळाशार समुद्र, चंदेरी वाळूमय समुद्र किनारे, स्वस्तात मिळणारे मद्य आणि मुक्त जीवनशैली यामुळे गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असले तरी गोव्याची मूळ ओळख ही देशातील महत्वाच्या धार्मिक पर्यटन स्थळांपैकीही एक अशी आहे. येथील मंगेशी, शांतादुर्गा, भगवती, दत्तात्रेय, चंद्रनाथ, कामाक्षी, मदनांत मंदिर, महागणपती मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे प्रसिद्ध आहेत. म्हापसा येथील गणेशपुरी भागातील संग्राम गणेश मंदिर त्यापैकीच एक असून गोव्यातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
हे मंदिर दोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिर फार प्राचीन नसले तरी मूर्तीशी संबंधित इतिहास मात्र प्राचीन आहे. मंदिराबाबत अख्यायिका अशी की या गणेशाचे मूळ मंदिर दिवार बेटावर होते. सन १५४० मध्ये ते धर्मांध पोर्तुगीजांनी उध्वस्त केले. त्यानंतर तेथील गणेश भक्तांनी गणपतीची मूर्ती प्रथम खांडेपार, नंतर नार्वे व शेवटी खंडोला येथे हलवली. परंतु तेथील काही भक्त म्हापसा येथे स्थलांतरीत झाले. त्यांना आपल्या आराध्य देवाची सेवा करता यावी म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी हे मंदिर उभारले. हा देव आयुष्यात संघर्ष करण्याचे बळ देणारा असल्याने तो संग्राम गणेश नावाने ओळखला जातो, असे येथील ग्रामस्थ सांगतात. पुढे मंदिराच्या आसपास लोकवस्ती वाढत गेल्याने हा परिसर गणेशपुरी नावाने ओळखला जाऊ लागला.
गावाजवळ निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर स्थित आहे. गावापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्का रस्ता आहे. मंदिराजवळ वाहनतळ आहे. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रशस्त प्रांगणात गवताचा गालिचा असलेले उद्यान आहे. उद्यानात अनेक प्रकारची फुलझाडे आहेत. प्रांगणातून मंदिराकडे येणाऱ्या पायवाटेवर पेव्हर ब्लॉक लावलेले आहेत.
प्रांगणात प्रवेशद्वारासमोर अष्टकोनी चौथऱ्यावर अष्टस्तंभाची रचना असलेली आठ थरांची दीपमाळ आहे. दीपमाळेच्या प्रत्येक थरात आठ असे एकूण ६४ हस्त आहेत. दीपमाळेच्या शीर्षभागी मंगल कलशाची प्रतिकृती आहे.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपात दोन्ही बाजूला गजराज शिल्पे आणि डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी तीन नक्षीदार स्तंभ आहेत. मुखमंडपाला गजपृष्ठ आकाराचे छत आहे. मुखमंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे तीन पायऱ्या चढून त्यात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व त्यांवर तोरण आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख व दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी आहेत. प्रवेशद्वाराला नक्षीदार लाकडी झडपा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी सहा स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. हे स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार तोरणांनी जोडलेले आहेत. तोरणांवर तुळई व त्यावर गजपृष्ठ आकाराचे छत आहे. सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी व मध्यभागी मोठे झुंबर टांगलेले आहेत. सभामंडपात गर्भगृहाकडे व प्रवेशद्वाराकडे असलेल्या सज्जावर विविध देवीदेवतांची शिल्पे आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दरवाजे आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपिठावर काळ्या पाषाणातील मूषक मूर्ती आहे.
पुढे रांगेत तीन गर्भगृहे आहेत. मधल्या मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार लाकडी असून द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. या गर्भगृहात वज्रपिठावर गणेशाची काळ्या पाषाणातील मोठी चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या मागील दोन हातात परशू व अंकुश असून पुढील एका हातात मोदक आहे. गणपतीचा चौथा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. देवाचे नेत्र, सोंड व कर्ण चांदीच्या आवरणाने आच्छादित आहेत व डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. गणपतीच्या मागे चांदीच्या प्रभावळीतील स्तंभांवर खाली गणपतीचे वाहन मूषक प्रतिमा व वर रिद्धी सिद्धी शिल्पे कोरलेली आहेत. प्रभावळीत पानाफुलांची नक्षी असलेले तोरण आहे. वज्रपिठासमोर चांदीच्या समई आहेत.
मुख्य गर्भगृहाच्या डावीकडील गर्भगृहात वज्रपिठावर गणेशाची काळ्या पाषाणातील उत्सवमूर्ती आहे. येथे भाविकांना स्वहस्ते देवाची पूजा करता येते. उजव्या बाजूच्या गर्भगृहात विशाल शिवपिंडी व त्यामागील भिंतीलगत पितळी वज्रपिठावर महादेवाचा पितळी मुखवटा आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या मागील बाजूला स्वतंत्र गर्भगृहात वज्रपिठावर सत्यनारायणाची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या शेजारी चांदीचा मखर असून येथे भाद्रपद महिन्यात २१ दिवसांच्या गणेशोत्सव काळात पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते. मुख्य गर्भगृहाच्या छतावर उंच लंबगोलाकार शिखर आहे. या शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. डाव्या व उजव्या बाजूला गर्भगृहाच्या छतावर सारख्याच रचनेची परंतु तुलनेने लहान शिखरे आहेत.
माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती व भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून २१ दिवसांचा पार्थिव गणेशोत्सव हे येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भाद्रपद महिन्यात पार्थिव गणेश मूर्तीची येथे स्थापना केली जाते. दोन्ही उत्सवांच्या वेळी मंदिरात हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यासोबतच चैत्र शुद्ध षष्ठीला मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यावेळी दुपारी आरती व महाप्रसाद आणि रात्री पालखी सोहळा असतो. याशिवाय गुढीपाडवा, वटपौर्णिमा, घटस्थापना, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, नरक चतुर्दशी, दीपावली, लक्ष्मीपुजन, तुलसी विवाह, महाशिवरात्र, होळी व धुळीवंदन हे सर्व सण व उत्सव येथे साजरे केले जातात. संकष्टी चतुर्थी व मंगळवारी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
दररोज सकाळी ७ ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात गणेशाचे दर्शन घेता येते. मंगळवार, विनायकी व संकष्ट चतुर्थीला दर्शनाची वेळ सकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत असते.