साखरगडनिवासिनी मंदिर

किन्हई-साखरगड, ता. कोरेगाव, जि. सातारा

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात `किन्हईगाव आहे. या गावाच्या पूर्वेकडे असलेल्या साखरगड डोंगरावरील अंबाबाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या प्राचीन मंदिराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन संवर्धानाचे काम केल्यामुळे जागतिक स्तरावर त्याची दखल घेण्यात आली असून २०१४ मध्येयुनेस्कोकडून (UNESCO) या मंदिराचा ‘Cultural Heritage Conservation Award’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला महाराष्ट्र सरकारनेही तीर्थक्षेत्राचादर्जा दिला आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथे यमाई देवीचे जागृत स्थान आहे. किन्हईजवळ हिवरे नावाचे एक गाव आहे. पूर्वी तेथे त्र्यंबकपंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ राहत असत. ते रोज घोड्यावरून औंध येथील यमाई देवीच्या दर्शनाला जात असत. हा क्रम त्यांनी १२ वर्षे पाळला. त्यानंतर यमाई देवीने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. श्री. कुलकर्णी यांच्या पत्नी गर्भवती होत्या घऱी बाळंतपण करू शकणारे कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना औंधास जाण्याची विनंती केली; परंतु १२ वर्षे चुकविलेले देवीचे दर्शन कसे चुकविणार यासाठी ते औंधास गेले देवीस सांगितले की मी आता १५ दिवस येथेच थांबणार आहे. माझ्या पत्नीच्या बाळंतपणाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवत आहे. त्यानंतर ते औंध येथेच १५ दिवस राहिले.

१५ दिवसांनंतर घरी आल्यावर त्यांनी पाहिले की पत्नीचे बाळंतपण सुखरूप झाले होते. याबाबत पत्नीकडे विचारणा केली असता तिने सांगितले की तुमच्या लांबच्या नात्यातील बहिणीने बाळंतपण केले सर्व घरातील कामेही तीच पाहत होती. पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे धुंणीभांडी करण्यासाठी नदीवर गेलेल्या त्या बहिणीला पाहण्यासाठी ते नदीवर गेले असता तेथे भांडी होती, पण कोणतीही व्यक्ती नव्हती. कुलकर्णी यांच्या लक्षात आले की बहिणीच्या रूपात येऊन देवीनेच पत्नीचे बाळंतपण केले. दुसऱ्या दिवशी कुलकर्णी औंध येथे गेले देवीला दर्शन देण्यास विनंती केली. देवीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले वर मागण्यास सांगितले. त्यावर आपल्यासोबत येऊन देवीने आपल्या घरच्या देव्हाऱ्यात वास्तव्य करावे, असा वर त्यांनी मागितला. देवीने तथास्तु म्हटले; परंतु रस्त्यातून जाताना मागे पाहण्याची अट घातली.

साखरगडाच्या पायथ्याशी आल्यावर देवीच्या पैंजणांचा आवाज ऐकू आल्याने आपसूकच कुलकर्णी यांनी मागे पाहिले देवी त्याच ठिकाणी अदृश्य झाली. ज्या ठिकाणी देवी गुप्त झाली तेथे एक शिळा प्रगट झाली. तेथे आजही देवीची शिळा असून त्याला घाटजाई मंदिर, असे संबोधले जाते. त्यानंतर त्र्यंबकपंतांना देवीने सांगितले की अट मोडल्यामुळे आता घरी येणे शक्य नाही, पण आजूबाजूच्या डोंगरात जेथे वनगाय स्वतःहून वासराशिवाय दुधाच्या धारा सोडेल, तेथे माझे वास्तव्य आहे, असे समजून माझी पूजा कर. त्याप्रमाणे साखरगडावर वनगायीने दुधाच्या धारा सोडल्या, तेथे देवीचा स्वयंभू तांदळा होता. त्यानंतर औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्यातील राजांनी येथे मंदिर बांधले.

साखरगडावर देवीचे स्थान असल्यामुळे ही देवी साखरगडनिवासिनी म्हणून प्रसिद्ध आहे. किन्हई गावापासून दोन किमी अंतरावर हे मंदिर आहे. येथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग हा टेकडीच्या पायथ्यापासून २५० पायऱ्यांचा, तर दुसरा मार्ग हा थेट गडापर्यंत जाणारा डांबरी रस्त्याचा. या मार्गाने आल्यास घाट लागण्याच्या आधी घाटजाई देवीचे मंदिर लागते. तेथील शिलालेखात १७३६ ते १७४६ या दरम्यान औंधचे राजे रामचंद्र पंतप्रतिनिधी यांनी अंबाबाई मंदिराची उभारणी केली, अशी नोंद आहे.

अंबाबाई मंदिर हेमाडपंती शैलीतील असून त्याला संपूर्ण तटबंदी आहे. तटबंदी तीन फूट रुंदीची, घडीव काळ्या पाषाणात बांधलेली असून त्यावर वीटकाम आहे. सहा बुरुज असलेल्या तटबंदीतील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या हिंदू शैलीतील कमानीवर बहामनी शैलीतील मिनार आहेत. चुन्यातील नाजूक कलाकुसर नगारखान्याच्या सौंदर्यात भर घालतात. प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला काळ्या पाषाणामध्ये एक मीटर उंचीची देवीची मूर्ती दिसते. मंदिर परिसरात असलेल्या उंच दगडी दीपमाळा दख्खनच्या पठारावरील काळ्या दगडांत बांधलेल्या आहेत. या दीपमाळांवर दिवे ठेवण्यासाठी दगडात ऐटदार मोर कोरलेले आहेत.

मंदिर दगडी बांधकामात असून त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण कळस हा वीट चुन्याचा वापर करून बांधण्यात आला आहे. क्रमाक्रमाने उंच जाणाऱ्या कळसाला मध्येच मिनारांची जोड दिलेली आहे. कळसावर अनेक देवीदेवतांची शिल्पे असून त्यामध्ये गणेश, दुर्गा, विष्णू आदी देवतांची अनेक रूपे आहेत. या मंदिरापुढे असलेला सभामंडप पेशवेकाळात बांधलेला आहे. मात्र तो लाकडाचा आहे. यामध्ये १९३३३४ साली काढलेली काही चित्रे (पेंटिंग्ज्) लावलेली आहेत. मूळ मंदिरामध्ये या मंडपाला जोडलेला आणखी एक (पहिला) मंडप आहे. याला तीनही बाजूला दरवाजे आहेत. गर्भगृह मात्र पूर्णपणे बंदिस्त आहे. गर्भगृहात अंबाबाई देवीची मूर्ती असून मुकुट, विविध अलंकार ल्यालेली वस्त्रे परिधान केलेली देवीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते.

त्र्यंबकपंत कुलकर्णी यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन औंधच्या यमाई देवीने येथे अंबाबाईच्या रूपाने वास्तव्य केले आहे. त्याचे स्मरण म्हणून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला (त्रिपुरारी पौर्णिमा) औंधच्या अंबाबाईची पालखी साखरगडाच्या पायथ्याशी येते. त्याचवेळी साखरगडनिवासिनी अंबाबाईची पालखी यमाई देवीच्या भेटीसाठी पायथ्यापर्यंत जाते. हा भेट सोहळा येथे मोठ्या उत्साहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. कार्तिक महिन्यात औंधची यमाई देवी येथे मुक्कामाला असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीचे येथील स्थान जागृत असल्याचे मानले जाते, त्यामुळे दररोज येथे शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

डोंगरावर अहोरात्र वाहणारा वारा, ऊन, पाऊस यामुळे मंदिराची हानी होत होती. त्यावेळी मंदिर समितीच्या परवानगीने किन्हईकर कुलकर्णी भावंडांनी आपल्या कुलदेवतेसाठी मंदिराचे शास्त्रशुद्ध जतनसंवर्धनाचे काम हाती घेतले ते पारही पाडले. मूळ शैलीला धरून केलेल्या या जतनसंवर्धनाच्या कामाची दखल थेटयुनेस्कोने घेऊन २०१४ ला ‘Cultural Heritage Conservation Award’ हा पुरस्कार दिला होता. आपला वारसा मूळ स्वरूपात पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्व जाणून, त्याबद्दल समाजात जनजागृती व्हावी, या हेतूने अशा पुरस्कारांचे युनेस्कोकडून वितरण करण्यात येते. त्यावेळी नऊ देशांतील तज्ज्ञांकडून आंतरराष्ट्रीय निकषांनुसार मंदिराची पाहणी करून या पुरस्कारासाठी साखरगडनिवासिनी मंदिराची निवड करण्यात आली होती.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून २१ किमी अंतरावर
  • सातारा, कोरेगाव येथून किन्हईसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट साखरगडाच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home