पालघरनजीकच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या वज्रेश्वरी, जागमाता, जीवदानी, आनंदी भवानी, चुळणाई, शीतलाई व साकाई अशा सात देवी बहिणी आणि श्री गणोबा हा त्यांचा बंधू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यापैकी वसई तालुक्यातील उमेळे येथील साकाई देवी मंदिर हे जागृत आदिशक्ती देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी व हाकेला धावून येणारी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. चैत्र वद्य चतुर्दशीला या देवीची भरणारी येथील यात्रा ही पंचक्रोशीतील मोठी यात्रा असल्याचे सांगितले जाते.
ग्रामदेवता म्हणून येथे पुजली जाणारी साकाई देवी ही मातृदेवता आहे. पुराणांमध्ये ‘ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा। वाराही च तथेन्द्राणी चामुण्डाः सप्त मातरः।।’ म्हणजे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री, चामुंडा या सात मातृदेवता नमूद केल्या आहेत. मात्र या मातृकांची नावे आणि संख्या वेगवेगळ्या पुराणांत व तंत्रग्रंथांत वेगवेगळी सांगितलेली आहेत. विवाहादी मंगलकार्यात पुण्याहवाचनानंतर मातृकापूजन करतात. त्यात मातृकांची संख्या २३ आहे. त्यांच्या जोडीला गणपती, दुर्गा वा क्षेत्रपाल यांचेही आवाहन केले जाते. पालघरमधील या परिसरातही सात लोकदेवतांचे स्थान आहे. तसेच येथे गणोबा हा त्यांचा भाऊ मानला गेला आहे. त्यामुळे या स्थानिक सप्तमातृका असल्याचे स्पष्ट होते. यातील साकाई देवीच्या मूर्तीच्या कडेवर बाळही असून त्यामुळे या देवीचे मातृस्वरूप अधिक दृगोचर होते. तसेच तिचे नवदुर्गांमधील स्कंदमातेशी साहचर्य असल्याचे दिसते, असे अभ्यासकांचे मत आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की फार वर्षांपूर्वी उमेळे हद्दीतील सोपारा खाडी परिसरात काही कोळी बांधव मच्छीमारीसाठी गेले असताना त्यांना एक देवीची दगडी मूर्ती आढळली. त्यांनी ती मूर्ती चिखल व पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ती जागची हालत नव्हती. त्याच रात्री उमेळे गावातील एका भाविकाला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मी तुमची ग्रामदेवता आहे व येथील खाडीच्या पाण्यात मी प्रकट झाले आहे. मला तेथून काढून गावात आण व माझी स्थापना कर. त्याने गावकऱ्यांना या स्वप्नाबद्दल सांगितले. ज्या ठिकाणी मूर्ती होती तेथून त्या भाविकाला ती सहजगत्या पाण्यातून वर काढता आली. त्यानंतर ही मूर्ती उमेळे गावात आणण्यात आली. येथे इ.स. १९३० साली एक लहानसे मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून वसई तालुक्यातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान बनले आहे.
नायगाव पश्चिमेकडील उमेळे गावाच्या मध्यावर साकाई देवीचे स्थान आहे. सुरुवातीला लहान असलेल्या या मंदिराचा २००३ साली जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिरासमोर लहानसे प्रांगण आहे. त्यामध्ये एक तुळशी वृंदावन व मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. खुल्या मुखमंडपातून सभामंडपात जाण्यासाठी चार पायऱ्या आहेत. त्यापैकी पहिल्या पायरीवर संगमरवरी कासवाची मूर्ती आहे. दर्शनमंडपात दोन खांब आहेत व एका नक्षीदार महिरपीने ते एकमेकांशी जोडलेले आहेत. या खांबांवरही कोरीव काम आहे. सभामंडप हा बंदिस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात अडीच ते तीन फूट उंचीच्या वज्रपीठावर देवीची मूर्ती आहे. येथे देवीच्या कडेवर लहान बाळ आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चांदीचे सिंह व पाठशिळेच्या मागील चांदीच्या पत्र्यावर नक्षीकाम आहे. देवीच्या व बाळाच्या मस्तकांवर मुकुट व त्यावर चांदीचे छत्र आहे. गर्भगृहाच्या छताचा आकार हा उलट्या केलेल्या कमलपुष्पाप्रमाणे आहे.
दरवर्षी चैत्र वद्य चतुर्दशीला या देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. यावेळी मंदिरात भजन, कीर्तनासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भल्या पहाटे देवीचा अभिषेक व त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात येते. या उत्सवासाठी पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे व गुजरातमधूनही भाविक येथे उपस्थित असतात. उमेळे येथील जागृत साकाईदेवी ही गावची ग्रामदेवता व पंचक्रोशीतील अनेक कुटुंबीयांची कुलस्वामिनी आहे. साकाई मंदिरात विविध सण उत्सवांसोबतच अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रमही राबविले जातात. या देवीची अनेक लोकगीतेही प्रसिद्ध आहेत.
वर उल्लेख केल्याप्रमाणे सातबहिणींपैकी सांडोर येथील आनंदी भवानी देवीचे मंदिर येथून जवळच आहे. आनंदी भवानी ही एकवीरा देवीचे दुसरे रूप असल्याचे मानले जाते. साधारणतः १५० वर्षांपूर्वी या देवीची स्थापना येथे झालेली आहे. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली ही देवी येथील भंडारी व पालमार समाजातील अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे. हे मंदिरही प्राचीन व कौलारू रचनेचे आहे. मंदिरासमोरील चौथऱ्यावर एक दीपस्तंभ आहे. मंदिर जमिनीपासून काहीसे उंच असल्यामुळे सात पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात लाकडी खांब आहेत. पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून खुले गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन द्वारपाल आहेत. गर्भगृहात एका वज्रपीठावर देवी आनंदी भवानीची मूर्ती आहे.