साईबाबा मंदिर / प्रकटभूमी

धूपखेडा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर


शिर्डीचे साईबाबा हे देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय भाविक शिर्डीत येत असतात. शिर्डीमध्ये साईबाबांच्या जीवनचरित्रातील अनेक प्रसंग चमत्कार घडले असल्याने ते तीर्थक्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध झाले आहे. मात्र साईबाबांच्या जीवनचरित्रातील काही घटना अन्य गावांतही घडल्या आहेत. पैठण तालुक्यातील धूपखेडा हे त्यातीलच एक गाव आहे. बाबांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली काही वर्षे धूपखेडा येथे व्यतीत केली होती. साईबाबांची प्रकटभूमी म्हणून आज हे गाव देशभरात ओळखले जात आहे.

धूपखेडा येथे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर उंच लोखंडी प्रवेशकमान आहे. तेथून पुढे काही अंतरावर गावातील साईबाबांचे मंदिर दिसते. या मंदिराबाबत असे सांगण्यात येते की धूपखेडा येथे वास्तव्यास असताना साईबाबा रोज रात्री ज्या ठिकाणी झोपत असत, त्या जागेवरच हे मंदिर बांधलेले आहे. सभामंडप, गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ साईंचा पालखीरथ ठेवलेला असून तेथेच तुळशी वृंदावनही आहे. मंदिराची द्वारचौकट वरच्या बाजूला अर्धवर्तुळाकार आहे. मंडपात सर्वत्र संगमरवरी फरशी बसवण्यात आली आहे. समोरच मंदिराचे गर्भगृह आहे. हे गर्भगृह विनाद्वार असल्याने सभामंडपातून कुठूनही आत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीचे दर्शन घेता येते. गर्भगृहात साईबाबांच्या पादुकाही ठेवण्यात आल्या आहेत.

गाभाऱ्याच्या बाजूला एका भिंतीलगत काचेच्या पेटीमध्ये साईबाबांच्या वापरातील दगडी पाट चिलीम ठेवलेले आहेत. मंडपातील एका भिंतीवर एक मोठे छायाचित्र लावले असून त्यात एका वृक्षाखाली काही तरुण पूजा करीत असल्याचे दिसत आहेत. त्यात एका कोपऱ्यात मोठी सावली पडलेली दिसत आहे. ग्रामस्थांची अशी धारणा आहे की ती सावली प्रत्यक्ष साईबाबांची आहे. हे छायाचित्र २० नोव्हेंबर २००८ रोजी सकाळी .०३ वाजता टिपलेले होते.

मंदिराच्या बाहेर एका बाजूला साईबाबांची अखंड धुनी आहे. सिमेंटमध्ये बांधकाम केलेली ही धुनी अखंड पेटती असते. मंदिराच्या डाव्या बाजूला धूपखेडाचे तत्कालीन ग्रामाधिकारी साईबाबांचे शिष्य चांद पटेल यांची मजार आहे. त्याच्या बाजूला एक कडुनिंबाचे झाड आहे. तेथे साईबाबांची मोठी प्रतिमा लावण्यात आली असून एक शिवलिंग नंदीची मूर्तीही आहे. या झाडाबाबतची कथा अशी की धूपखेडा येथे राहत असताना साईबाबा या कडुनिंबाच्या झाडाखाली असलेल्या एका दगडावर बसून भक्तांना भेटत असत. साईबाबांच्या स्पर्शाने पुनीत झालेला तो दगड या झाडाखाली एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेला आहे. या कडुनिंबाच्या झाडाबाबत भाविकांची अशी श्रद्धा आहे की या झाडाची पाने कडू लागता गोड लागतात. तसेच साईबाबांनी चांद पटेल यांना एक पोपट पाळण्यासाठी दिला होता. त्या पोपटाचे वंशज आजही या झाडावर नांदतात.

साईबाबांची ही प्रकटभूमी असल्याबद्दलची कथा शिर्डीच्या साई संस्थानने प्रकाशित केलेल्या अधिकृत साईचरित्रामध्ये देण्यात आलेली आहे. ‘श्री साईसच्चरितअसे या ग्रंथाचे नाव असून गोविंद रघुनाथ दाभोलकर यांनी त्याचे लेखन केलेले आहे. दाभोलकर यांनी स्वतः साईबाबांसमवेत काही काळ व्यतीत केला होता. चरित्रात धूपखेडा या गावाबद्दलची हकीकत पुढीलप्रमाणे सांगण्यात आली आहे -‘औरंगाबाद जिल्ह्यांतील। धूप खेडेगांवामधील। मुसलमान भाग्यशील। चांदपाटील नांव जया।। सफर करिता औरंगाबादेची। घोडी एक हरवली त्याची। दोन महिने दाद तिची। आता कशाची आढळते।। पाटील पूर्ण निराश झाले। घोडीलागीं बहु हळहळले। खोगीर पाठीवरी मारिलें। माघारां फिरले मार्गाने।। औरंगाबाद मागें टाकिलें। साडेचार कोस आले। मार्गात आंब्याचें झाड लागलें। तळीं दिसलें हें रत्न।। डोईस टोपी अंगांत कफनी। खाकेस सटका तमाखू चुरूनी। तयारी केली चिलीम भरूनी। नवले ते स्थानीं वर्तलें।। चांदपाटील छायेखालता बसता बैस जरा।। फकीर पुसे हें खोगीर कसलें। पाटील म्हणे जी घोडें हरवलें। मग तो म्हणे जा शोध ते नाले। घोडें सांपडलें तात्काळ।।अशा प्रकारे चांद पटेल यांची बालफकीर साईबाबांची भेट झाली होती आणि त्या भेटीतच त्यांना त्यांचे अवलियापण दिसले.

यानंतर पाटील यांनी साईबाबांना आपल्या घरी येण्याचा आग्रह धरला. त्यावरूनदुसरे दिवशीं गावांत गेले। पाटिलाच्या येथें उतरले। कांही काळ तेथेंचि राहिले। पुढें ते परतले शिरडीस।।या कहाणीनुसार, चांद पटेल यांच्या भाच्याचा, शिर्डीतील मुलीशी निकाह लावण्यासाठी ते सारे शिर्डीस जायला निघाले होते. त्यावेळी चांद पटेल यांच्या आग्रहाखातर बाबाही शिर्डीस गेले होते. ‘लग्न झालें वऱ्हाड परतलें। बाबा एकटेचि मागें राहिले। राहिले ते राहूनि गेले। भाग्य उदेलें शिरडीचे।।या प्रसंगी हे बालफकीर जेव्हा प्रथम वऱ्हाडासह शिर्डीत उतरले तेव्हा ते प्रथम खंडोबा मंदिराचे पुजारी श्री म्हाळसापती यांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी त्यांनीया साईअसे पुकारले. तेव्हापासून बाबांना साईबाबा हे नाव पडले.

साईबाबांनी धूपखेडामध्ये किती काळ व्यतित केला याबाबत या चरित्रात सांगितलेले नाही. मात्र धूपखेडातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बाबा सहा ते सात वर्षे येथे राहिले होते. या मंदिरात दर गुरुवारी महाआरती केली जाते. यावेळी गावातील घराघरांतील सर्व जातीधर्माचे लोक येथे उपस्थित असतात.

उपयुक्त माहिती:

  • पैठणपासून २२ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ३२ किमी अंतरावर
  • पैठण, गंगापूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : पांडुरंग वाघचौरे, अध्यक्ष, मो. ९८२२३३४७९९
  • श्रीरंग वाघचौरे, उपाध्यक्ष, मो. ९८२२०६४०१८
Back To Home