
निसर्गरम्य अजिंठा डोंगररांगांच्या कुशीत, सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या गावानजीकच्या लेण्यांमध्ये असलेले रुद्रेश्वर गुहा मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे ३००० वर्षे प्राचीन असलेल्या या लेण्या रुद्रेश्वर गणेश लेण्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. येथे गुहेच्या आतील भागात कातळात कोरलेल्या शिवलिंगाजवळ गणेशमूर्तीही कोरलेली आहे. या लेण्यांजवळ असलेला धबधबा येथे येणाऱ्या भाविकांचे तसेच पर्यटकांचेही आकर्षण आहे. या वाहत्या धबधब्याखाली स्नान करून येथील शिवलिंगाचे व गणेशाचे दर्शन घेतल्यास अपत्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
येथील संपूर्ण परिसर हा हिरवाईने नटलेला असून निसर्गसमृद्ध आहे. अनेकदा येथे वन्यप्राण्यांचेही दर्शन होते, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
अजिंठा लेण्यांच्याही आधी या लेण्या कोरण्यात आल्या असाव्यात, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. येथे येण्यासाठी सोयगाव–गलवाडा–वेताळवाडी हा एक, तर सिल्लोड–उंडणगाव–हळदा–वेताळवाडी हा दुसरा असे दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांवरून आल्यास पायवाटेने काही अंतर कापल्यावर खोल दरीत उतरून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या रुद्रेश्वर मंदिराकडे यावे लागते. या पायवाटा सुमारे दोन किमी अंतराच्या असून शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या आहेत. त्यासाठी ४० ते ४५ मिनिटे वेळ लागतो. या वाटांवरून जाताना वाऱ्याची सळसळ व पक्ष्यांचे कुजन कानी पडतात. याशिवाय डावीकडे सोयगाव धरणाचा जलाशय, तर उजवीकडे उंच डोंगरावरील वेताळवाडी किल्ला अशी दृश्ये दिसतात.
मंदिर परिसरात आल्यावर समोर उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या मागच्या बाजूला काळ्या पाषाणात कोरलेल्या लेण्या दिसतात. या लेण्यांवरून समोरील तीर्थकुंडात पडणारा धबधबा हे दृश्य विलोभनीय असे आहे. तीर्थकुंडापासून १५ ते २० पावलांवर असलेल्या एका चिंचोळ्या गुहेतून आत आल्यावर काळ्या पाषाणात कोरलेल्या लेण्यांजवळ येता येते. या लेण्यांमध्ये ६० फूट लांब, सुमारे २० फूट रुंद व १२ फूट उंचीचा सभामंडप आहे. मध्यभागी कातळात कोरलेल्या महिरपीत पाच फूट उंचीची व पाच फूट रुंदीची शेंदूरचर्चित गणेशमूर्ती आहे. डाव्या सोंडेच्या या गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धी–सिद्धी आहेत. अंगारकी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक भाविक या गणेशाच्या दर्शनासाठी येतात. गणेश मूर्तीच्या उजवीकडे एका खांबावर नृसिंह, तर डावीकडील खांबावर तीन फूट उंचीचे नटराजाचे शिल्प आहे. असे सांगितले जाते की या गणेश मूर्तीच्या मागे असलेले भुयार अजिंठा लेण्यांपर्यंत जाते. गणेशमूर्तीच्या उजव्या बाजूला एका मोठ्या व उंच दगडी चौथऱ्यावर अखंड काळ्या पाषाणात घडविलेली नंदीची मूर्ती आहे. या नंदीवर असणाऱ्या दागिन्यांची कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंदीसमोरील शिवलिंग शिळेवर कोरलेले असून ते घृष्णेश्वराचे उपलिंग असल्याची मान्यता आहे.
येथील भिंतीलगत काही पुरातन मूर्तींचे अवशेष दिसतात. येथील कमानी आणि खांबांवर काहीसे पुसट झालेले नक्षीकामही दिसते. लेण्यांमध्ये पुरेसा प्रकाश नसल्यामुळे येथील कोरीव काम स्पष्ट दिसत नाही.
श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी असते. त्यावेळी या लेण्यांच्या मार्गावर बेल, फुले व प्रसादाची दुकाने लागतात. महाशिवरात्रीलाही हजारो भाविकांमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. जळगाव, धुळे, नंदूरबार, जालना, नाशिक, नगर जिल्ह्यांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या लेण्यांपासून काही अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. अजिंठा डोंगररांगेतील सर्वात उंच ठिकाणावर असलेल्या या किल्ल्याला २० फूट उंचीचे दोन भव्य दरवाजे आहेत. या दरवाजांच्या खांबांवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. किल्ल्याच्या आतील भागात एक घुमटाकार इमारत आहे. याव्यतिरिक्त किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरूज, धान्यसाठ्याच्या खोल्या, तेल व तुपाचे टाके, नामजगीर मशीद, सुमारे सात फूट लांबीची तोफ हे अवशेष आजही सुस्थितीत आहेत. याशिवाय किल्ल्यावर पाण्याचा मोठा तलाव आहे. किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर कमानींनी वेढलेला एक हवामहल आहे. या हवामहलातून पायथ्याशी असलेल्या गावांचे विहंगम दर्शन होते.