रेणुका माता मंदिर

रिधोरा (देवी), ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील रिधोरा येथील देवी ही माहुरगडावरील रेणुका मातेचे प्रतिरूप असल्याची मान्यता आहे. नवसाला पावणारी असा लौकिक असलेली ही देवी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र पौर्णिमेपासून अक्षय तृतीयेपर्यंत चालणारी देवीची येथील यात्रा ही मसाल्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या यात्रेत येणारे भाविक वर्षभर पुरेल इतक्या मसाल्याची येथे खरेदी करतात.

रिधोरा हे गाव भोकरदन, फुलंब्री बदनापूर या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात. निजामकालीन असलेल्या या मंदिराचे बांधकाम विटा आणि चुन्याने करण्यात आलेले आहे. १९२२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. मंदिरावरील सहा स्तरांच्या शिखराचे काम १९४७ नंतर करण्यात आले. मंदिराजवळ पुरातन वटवृक्ष असून येथून जवळच एका संगमरवरी उभ्या शिळेवर देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या तसेच कारावास भोगलेल्या परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांची नावे आहेत. वडाच्या झाडाजवळ सिंहाची दगडी मूर्ती असून त्या शेजारीच दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या खाली एक छोटे मंदिर असून बाजूला काही देवदेवतांचे स्थान आहे. दीपमाळेसमोर यज्ञकुंडही आहे.

जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्वरूप सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. सभामंडपात मध्यभागी देवीचे वाहन असलेल्या सिंहाची पितळी मूर्ती आहे. सभामंडपातून मंदिराबाहेर पडण्यासाठी दोन मार्ग आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पादुका आहेत. याच ठिकाणी महिलांकडून देवीची ओटी भरली जाते. गर्भगृहात रेणुका मातेची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. नाकात नथ घातलेल्या या देवीच्या कपाळावर मोठे कुंकू आहे. उत्सवकाळात देवीला चांदीचा मुकुट चढवला जातो. मुख्य मंदिराच्या बाह्य भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोठ्या प्रतिमा आहेत. या मंदिराचे शिखर तुलनेने खूप उंच असून त्यावर कोरीवकाम कलाकुसर केलेली दिसते.

देवीसमोर नवस करण्यासाठी येथे अनेक भाविक येतात. नवस पूर्ण झालेले भाविक मंदिरात नारळाचे तोरण बांधतात. नवस बोलणाऱ्या भाविकांच्या अंगावर मंदिरातील भोपे (पुजारी) मंदिराच्या दरवाजाबाहेर उभे राहून चाबकाचे फटके मारतात. फटके मारण्यापूर्वी तेओम जगदंबा माते कीअसा गजर करतात. असे सांगितले जाते की चांगल्या भावनेने नवस केलेल्या भाविकांना या चाबकाचे फटके लागत नाहीत. नवस वाईट हेतूने केला असल्यास अंगावर वळ उठतात.

येथे चैत्री तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. चैत्र पौर्णिमेपासून अक्षय तृतीया या काळात देवीची मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला परंपरेनुसार बारा गाड्या ओढून, दीपमाळ उजळवून देवीची आरती केल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. भोकरदन, राजूर, फुलंब्री, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, बदनापूर, करमाड, रत्नपूर, पद्मावती सय्यदपूर आदी भागांतील हजारो भाविक यात्रेसाठी येतातनोकरी व्यवसायानिमित्त विविध भागांत स्थायिक झालेले येथील ग्रामस्थ आवर्जून या यात्रेसाठी गावात येतात. देवीची खणानारळाने ओटी भरण्यासाठी या गावातून लग्न करून गेलेल्या महिला यात्रेसाठी माहेरी येतात. यात्रेदरम्यान देवीला नवस केले तसेच फेडले जातात. यात्रा काळात देवीला कोंबडे बकऱ्यांचा मान दिला जातो.

घरगुती मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी मसाल्यांची शेकडो दुकाने असतात. ही यात्रा भांड्यांसाठीही प्रसिद्ध आहे. लग्नासाठी लागणाऱ्या भांड्यांची खरेदीही येथे केली जाते. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यानही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. पहिल्या दिवशीआई राजा उदो, उदोरेणुका माता की जयच्या जयघोषात, वेदमंत्रोच्चारात पहाटे पाचच्या सुमारास घटस्थापना करण्यात येते. त्यानंतर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या उत्सवादरम्यान रोज सकाळी संध्याकाळी देवीची महाआरती करण्यात येते. या काळात येथे अखंड हरिनाम सप्ताहही होतो.

उपयुक्त माहिती:

  • फुलंब्री येथून २५ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ५४ किमी अंतरावर
  • फुलंब्री येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : गणेश जाधव, पुजारी, मो. ७७७६८२२७९०
Back To Home