रेणुका देवी मंदिर

चौंडाळा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर


नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर कमलमुखी रेणुका मातेचे मंदिर आहे. महाराष्ट्रासह देशभरात या देवीचे लाखो भक्त असून अनेक कुटुंबांची ती कुलदेवता आहे. चौंडाळा गावातील रेणुका देवी मंदिर हे माहूरच्या रेणुका देवीचे उपपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. माहूर येथील मंदिरात रेणुका देवी तांदळा स्वरूपात आहे. तांदळा ही अवयवहीन पाषाणमूर्ती असते. अशीच मूर्ती चौंडाळा येथील रेणुका मंदिरात विराजमान आहे. तिच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येत असतात.

चौंडाळा हे लहानसे गाव असून गावातील छोट्या रस्त्यावर रेणुका देवीचे मंदिर आहे. या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार प्राचीन वाड्याच्या प्रवेशद्वारासारखे आहे ते दगडात बांधलेले आहे. द्वारास वरच्या बाजूस बुरुजाच्या वर असतो तसा आकार देण्यात आलेला आहे. या द्वाराच्या दोन्ही बाजूंस रजपूत वास्तुशैलीशी साम्य असणाऱ्या खिडक्या आहेत. दरवाजावर व्याघ्रमूर्ती कोरण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूंस द्वारपालांची तसेच मधोमध द्वारकमानीखाली गणेशाचे चित्र रंगवण्यात आले आहे. दर्शनरांगेतून आत गेल्यानंतर मोठे दगडी मंदिर नजरेस पडते. त्यास अनेक दगडी खांब आहेत. गाभाऱ्यात उंचवट्यावर रेणुका देवीचा शेंदूरचर्चित तांदळा आहे. देवीला मोठे डोळे कपाळावर मोठे कुंकू आहे. रेणुका देवीच्या मूर्तीप्रमाणेच हे मंदिरही अत्यंत अनघड अशा स्वरूपाचे आहे. मंदिराच्या बाहेर ५० फूट उंचीची दगडी दीपमाळ आहे.

ग्रंथांमधील उल्लेखानुसार, रेणुका ही भूदेवी असून तिचे रेणुका हे नाव पृथ्वीवाचक आहे. रेणुका महात्म्यानुसार ही देवी अदितीचा अवतार आहे. अदिती ही पृथ्वी असल्याची वैदिक ऋषींची धारणा होती. पौराणिक कथांनुसार, परशुरामाने आपला पिता जमदग्नी यांच्या आज्ञेने रेणुकामातेचा शिरच्छेद केला. परशुरामाची आज्ञाधारकता पाहून जमदग्नी प्रसन्न झाले त्याने परशुरामास वर माग असे म्हटले. त्यावर परशुरामाने आपल्या मातेस जिवंत करा, असा वर मागितला. जमदग्नीने ते मान्य केले. रेणुकेचे शव होमाग्नीत टाक म्हणजे ती दिव्य देह धारण करून तुला भेट देईल, असे जमदग्नीने सांगितले. मात्र परशुरामाने मागे वळून पाहायाचे नाही, अशी अट होती. होमाग्नीत रेणुकेचे शव टाकल्यानंतर ती तेथून प्रकट होऊ लागली. परंतु परशुरामाने शंकाकुलतेने मागे वळून पाहिले. त्याबरोबर ती पूर्णतः प्रकट व्हायची थांबली. त्यामुळे ती तांदळा स्वरूपातच पूजली जाते. माहूर हे तिचे निवासस्थान चौंडाळा हे उपपीठ मानले जाते. त्यामुळेच येथील नवरात्रोत्सवास महत्त्व आहे. या उत्सवाकरीता राज्यभरातून भाविक येथे येत असतात. या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. ही देवी नवसाला पावते, अशी भक्तांची धारणा आहे. सकाळी ते रात्री वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते.

चौंडाळा ग्रामस्थांची देवीवर नितांत श्रद्धा आहे. येथे काही वेगळ्या प्रथा पाहावयास मिळतात. यामागेही देवीच्या संबंधित काही पौराणिक कथा असल्याचे सांगण्यात येते. याबाबत अशी आख्यायिका आहे की देवीच्या रुपावर भाळून एका दैत्याने तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. नकार दिल्यानंतरही तो मागे लागला वऱ्हाड घेऊन आला. तेव्हा देवीने त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला. त्याच्यासोबत आलेले वऱ्हाडी पाणी पाणी करीत येथे शिळा होऊन पडले. या गावाच्या परिसरात अशा अनेक शिळा दिसतात.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेणुका देवी अविवाहित राहिल्याने तिचा कोप होऊ नये म्हणून गावात विवाह समारंभ साजरा केला जात नाही. गावातील लग्नसोहळे हे शिवेपलीकडे, शेजारी हिवरे नावाचे एक गाव आहे तेथे आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे येथे रेणुकामातेच्या मंदिराहून उंच घर बांधले जात नाही. त्यामुळे गावात दुमजली घर नाही. याशिवाय घरांमध्ये खाट वा पलंगही वापरला जात नाही. गावातील लोक जमिनीवर किंवा सिमेंटचे ओटे बांधून त्यावर झोपतात. ऐतिहासिक संदर्भानुसार, चौंडाळा हे गाव होळकरांचे खासगी दिवाण चंद्रचूड यांच्याकडे होते. या गावातील दगडी कमान दगडातील आविष्कार मानली जाणारी बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली होती, असे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती:

  • पैठणपासून २८ किमी, छत्रपती संभाजीनगरपासून ७१ किमी अंतरावर
  • पैठण, छत्रपती संभाजीनगर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
Back To Home