रवळनाथ मंदिर

हरमल, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा

रवळनाथ हे गोव्यातील एक प्रमुख दैवत मानले जाते. त्याचे मूळ नाव ‘रवळू’ असे आहे. ते प्राचीन काळापासून चालत आलेले प्रेमाचे नाव आहे. गोव्यात नागपंथीयांचे आगमन झाल्यावर त्यांनी देवाचे नाव बदलून श्री देव रवळनाथ असे ठेवले. रवळनाथ हे दैवत श्री शंकराच्या गणांपैकी एक असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रातील गोवा राज्याच्या सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवळनाथाची ३०० हून अधिक तर गोव्यात ५० पेक्षा जास्त मंदिरे आहेत. त्यापैकी उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील हरमल येथील रवळनाथाचे मंदिर प्राचीन व प्रसिद्ध आहे.

शिवाचा अवतार असलेला रवळनाथ हा राखणदार किंवा रक्षक देवता म्हणून पुजला जातो. काही अभ्यासकांच्या मते रवळनाथ हा यक्ष असून त्याची सत्ता जंगल व सागरावर चालते. ‘भारतीय संस्कृती कोश’कार पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या मते, सर्पांचे विष उतरवणे हे रवळनाथाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. दक्षिणेतल्या कारवारपासून उत्तरेकडे कमी प्रमाणात श्री रवळनाथाची मंदिरे दिसतात. ती केदारलिंग देवता स्वरूपात दिसतात. श्री रवळनाथ यांची मंदिरे चंदगड, आजरा या भागात आहेत. त्यामुळे दक्षिणेकडून याचा प्रवेश कोकण व गोव्यात झाला, असे साहित्यिक-अभ्यासक पु. रा. बेहरे यांचे मत आहे.

हरमल येथील रवळनाथाचे हे मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. या हरमल गावाचा महाभारत काळाशी संबंध असल्याची अख्यायिका जनमानसात प्रचलीत आहे. ती अशी की पांडव अज्ञातवासाच्या काळात गोव्यातील या भागात राहिले व त्याच दरम्यान त्यांनी रक्षणकर्ता रवळनाथाची स्थापना या भूमीत केली होती. पांडवांनी अज्ञातवासात या ठिकाणी सतत हरी नामाचा जप केला म्हणून या गावास हरीमल नाव पडले व पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ते हरमल म्हणून प्रसिद्ध झाले.

गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिराच्या प्रांगणाभोवती असलेल्या आवारभिंतीत मोठे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ व त्यावर सज्जा आहे. या सज्जावर पाच मेघडंबरी आहेत. प्रत्येक मेघडंबरीच्या छतावर शिखर व कळस आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील प्रांगण प्रशस्त व पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे. प्रांगणात मंदिरासमोर चौथऱ्यावर पाच थरांची अष्टकोनी दीपमाळ आहे. दीपमाळेत प्रत्येक थरात आठ दीपकोष्टके आणि शीर्षभागी शिखर व कळस आहे. दीपमाळेशेजारी चौथऱ्यावर तुलसी वृंदावन आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मुखमंडप प्रांगणापेक्षा काहीसा उंचावर आहे. दुमजली सभामंडपाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात दोन्ही बाजूला प्रत्येकी सहा स्तंभ आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर वरील मजल्याचा सज्जा आहे. सभामंडपात मागील बाजूला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ आहे. सभामंडपात तरंग काठ्या व पालखी ठेवलेली आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूने वरील मजल्यावरील सज्जावर जाण्यासाठी जिने आहेत. सज्जावरील स्तंभांवर तुळई असून तुळईवर छत आहे. गोव्यातील अन्य प्राचीन मंदिरांप्रमाणे येथील छतावरही कावी शैलीतील चित्रे साकारली आहेत.

पुढे सभामंडपापेक्षा सुमारे तीन फूट उंच चौथरा आहे. चौथऱ्यावर उजव्या व डाव्या बाजूला गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपाच्या या भागातील वितानावर कावी शैलीतील चित्रे साकारली आहेत. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टकात प्रतिहारी द्वारपाल शिल्पे आहेत. अंतराळाच्या द्वारशाखांवर कावी शैलीतील पानाफुलांची चित्रे व ललाटबिंबावर कीर्तीमुख आहे.

अंतराळात लाकडी स्तंभिका असलेला कठडा लावून दर्शनरांगेचे व्यवस्थापन केले आहे. पुढे अंतराळापेक्षा काहीसे उंचावर गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. गर्भगृहात नक्षीदार लाकडी मखरात वज्रपीठावर रवळनाथाची चतुर्भुज उभी मूर्ती आहे. देवाच्या मागील दोन हातांत डमरू व त्रिशूल आणि पुढील एका हातात तलवार व दुसऱ्या हातात पानपात्र आहे. देवाच्या पायाकडे एका बाजूला कुंभ धारिणी शक्ती व दुसऱ्या बाजूला अश्वशिल्प आहे. मूर्तीच्या पाठशिळेवर वरील बाजूस कीर्तीमुख व दोन्ही बाजूला पानफुलांच्या नक्षी आहेत. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी असलेले स्तंभ आहेत. या स्तंभांवर मयूर तोरण व तोरणात वर कीर्तीमुख आहे. लाकडी मखरावर समोरील बाजूला खाली पानफुलांची नक्षी व वरील बाजुला लाकडी स्तंभिका आहेत. स्तंभिकांवरील तोरणावर मयूर शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.

सभामंडपाच्या छतावर समोरील बाजूला बाशिंगी कठडा आहे. बाशिंगावर मध्यभागी आमलक व कळस आहे. आमलकाच्या दोन्ही बाजूला गजराज शिल्पे असून त्यांच्या मागे पुन्हा आमलक व कळस आहेत. कठड्याच्या दोन्ही बाजूला दोन मेघडंबरी आहेत. गर्भगृहाच्या छतावर पंचरथ प्रकारचे चौकोनी शिखर आहे. या मंदिराच्या शेजारी गिरोबा मंदिर आहे. येथील गर्भगृहात गिरोबा देवाची काळ्या पाषाणातील अश्वारुढ द्विभुज मूर्ती आहे. प्रांगणात सातेरी देवी व भूमिका देवी यांचीही मंदिरे आहेत. याशिवाय प्रांगणात चौथऱ्यावर इतर स्थानिक देवतांची पाषाणे आहेत.

माघ शुद्ध अष्टमी हा रवळनाथाचा व पौष पौर्णिमा हा गिरोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत देवाची पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. या प्रसंगी परिसरातील शेकडो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. यावेळी देवांचे तरंग काढले जातात. माघ कृष्ण पंचमी हा मंदिराचा वर्धापन दिन येथे उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय मंदिरात गुढी पाडवा, रामनवमी, दिवाळी, दसरा, तुलसी विवाह, महाशिवरात्री, होळी, श्रावण मास, शारदीय नवरात्रौत्सव आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • पेडणे येथून १३ किमी आणि पणजी येथून ४४ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पेडणे येथे येण्यासाठी बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home