रत्नेश्वर महादेव मंदिर

टोकवाडी, ता. परळी, जि. बीड

मराठवाड्याची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे व जागृत देवस्थान आहे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र शिवभक्ती रुजलेली आहे. अशी मान्यता आहे की वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य या भागात होते. त्यांनी आपल्या नित्यपूजेसाठी या परिसरात अनेक ठिकाणी शिवपिंडींची स्थापना केली. त्यापैकी परळीनजीक, टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. शतकानुशतके मातीखाली लपलेले हे स्थान दीडशे वर्षांपूर्वी पुन्हा प्रकाशात आले आणि आज भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे.

मंदिराबाबत आख्यायिका अशी की श्रीराम, सीता व लक्ष्मण वनवासात असताना या डोंगरात राहिले होते. त्यावेळी रामाने आपल्या नित्य पूजेसाठी येथे शिवपिंडीची स्थापना केली. शिवपिंडीची पूजा करीत असताना सीतेच्या कर्णकुंडलातील रत्न शिवपिंडीवर पडले म्हणून देवास ‘रत्नेश्वर’ नावाने संबोधले जाऊ लागले आणि या डोंगरास रत्नेश्वर डोंगर म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे काळाच्या ओघात ही शिवपिंडी मातीखाली गाडली गेली. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी गावातील महिला सरपण आणण्यासाठी जंगलात गेल्या असताना त्यांना मातीतून किंचित वर आलेली शिवपिंडी दिसली. कुतूहलापोटी त्यांनी जमीन खोदून पाहिली असता ती स्वयंभू शिवपिंडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही गोष्ट त्यांनी गावकऱ्यांना सांगितली व सर्वांनी मिळून या ठिकाणी मंदिर बांधून पूजा सुरू केली. सन २००६ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, ज्यामुळे मंदिरास आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

डोंगरमाथ्यावर वसलेल्या या मंदिरापर्यंत पक्की सडक आहे. हा डोंगर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनविभागाने मंदिरासमोर बालोद्यान विकसित केले आहे. उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी झोके, घसरगुंडी आदी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच विविध प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रतिकृती त्यात ठेवण्यात आल्या आहेत. उद्यानात डोंगराच्या कडेला सुरक्षा कठडे असलेली निरीक्षण माची तयार करण्यात आली आहे व त्यात बसण्यासाठी आसने आहेत. येथून खाली पाहिले असता हिरवेगार विहंगम दृश्य नजरेस पडते. मंदिरासमोर मंगल कार्यालयाची मोठी वास्तू आहे. येथे विवाह सोहळे आयोजित केले जातात. मंदिराच्या प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष आहेत.

सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे वर चढण्यासाठी चार अर्धचंद्राकार पायऱ्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूंनी बाशिंगी कठडा आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ कठड्यात आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. येथील छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत, तर वितानावर चक्राकार नक्षी आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपातून पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहात डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या मागील बाजूस मंदिराच्या छतावर जाण्यासाठी जिना आहे.

गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर महादेवाच्या विविध रूपातील मूर्ती आहेत. मध्यभागी चार थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात बारा देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत, ज्यावर कळस व ध्वजपताका आहे.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यानिमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. चैत्रपाडवा, दसरा, दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नागपंचमी आदी सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. सोमवार, पौर्णिमा, अमावास्या आदी दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती:

  • परळी येथून ७ किमी अंतरावर
  • बीड येथून ८९ किमी अंतरावर
  • परळी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

त्नेश्वर महादेव मंदिर

टोकवाडी, ताल. परली, जिला. बीड

Back To Home