चहूबाजूंनी डोंगरांनी कुशीत घेतलेले रत्नागिरी जिल्ह्यातील जांभरूण हे गाव येथील कातळशिल्पांबरोबरच सुमारे ४५० वर्षांचा इतिहास असलेल्या मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. पाट–पाखाड्यांचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गसंपन्न जांभरूणमधील ही मंदिरे कोकणातील जुन्या स्थापत्यशैलीची उत्तम उदाहरणे आहेत. येथे असलेले कुलस्वामी स्वयंभू रत्नेश्वराचे मंदिर हे जागृत स्थान समजले जाते. रत्नेश्वर येथील देवरुखे ब्राह्मणांचा कुलदैवत आहे. असे सांगितले जाते की देशभरात रत्नेश्वराची केवळ तीन मंदिरे दक्षिणाभिमुख आहेत. त्यापैकी जांभरूणमधील हे एक मंदिर आहे.
मुंबई–गोवा महामार्गावर, रत्नागिरीनजीकच्या हातखंबाजवळील निवळी–गणपतीपुळे रस्त्याला कोतवडे फाटा लागतो. तेथून डावीकडे वळल्यावर जांभरूणकडे येता येते. गावातून बारमाही वाहणारी नदी, जिवंत झरे, डोंगरउतारावरील भाताची खाचरे, लाल मातीच्या वाटा, कोकणी पद्धतीची टुमदार कौलारू घरे मन प्रसन्न करतात. आंबा–फणस, नारळी–पोफळींच्या बागांची हिरवाई कवेत घेतलेल्या या गावात तब्बल पाच प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी ग्रामदेवता रवळनाथाचे मंदिर वगळल्यास रत्नेश्वर, लक्ष्मीत्रिविक्रम, राधाकृष्ण तसेच तामेश्वर–विश्वेश्वर ही चार मंदिरे गावातील शितूत कुटुंबाच्या मालकीची आहेत. शितूत कुटुंबातील अंताजी शितूत आणि त्यांच्या बंधूंनी ही मंदिरे उभारली आहेत. पेशवाईच्या काळात गावचा सारा वसूल होत नसे. तेव्हा अंताजी यांनी तो वसूल केल्याने पेशव्यांनी हे गाव त्यांना आंदण दिले व स्वतःचे नाणे पाडायचीही परवानगी दिली. ते नाणे अंतूशाही रुपया या नावाने ओळखले जात असे.
या शितूत कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या रत्नेश्वराचे मंदिर येथील डोंगर उतारावर आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी जांभ्या दगडांची पाखाडी आहे. उतारावर पक्का बांध घालून बांधलेल्या या मंदिराला जांभ्या दगडांची तटबंदी आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या तटबंदीचे चिरे (जांभा दगड) हे दीड ते तीन फूट रुंदीचे असून त्यातच लहान लहान देवळ्या कोरलेल्या आहेत. मंदिराला विस्तीर्ण प्रांगण आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे स्वरूप असलेले हे कौलारू मंदिर सुमारे तीन फूट उंचीच्या जोत्यावर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन प्राचीन दीपमाळा आहेत. तेथून मंदिराच्या सभामंडपापर्यंत भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आलेली आहे. मंदिराचा सभामंडप हा अर्धमंडप प्रकारातील असून सभामंडपाच्या तिन्ही बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने (दगडी आसने) आहेत. अंतराळात गर्भगृहासमोर एका चौथऱ्यावर नंदीची सुबक मूर्ती व त्यापुढे एक लहानशी शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीला लागून डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती व उजव्या बाजूला एका खांबाजवळ पितळी नागमूर्ती आहे. गर्भगृहात अखंड पाषाणातील स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामागे एका भिंतीच्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनीची प्राचीन मूर्ती आहे.
येथील लक्ष्मीत्रिविक्रमाचे मंदिरही सुमारे ४५० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. १६११ मध्ये ढापे आडनावाच्या महिलेने येथे पाण्याची व्यवस्था केल्याची नोंद आहे. त्यावरून हे मंदिर त्यापूर्वीचे असल्याचे समजते. ३० वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. नारळी–पोफळींच्या बागांच्या परिसरात वसलेल्या या मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात गरुडाची मूर्ती आणि बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. रत्नेश्वर मंदिराप्रमाणेच या मंदिराचीही रचना आहे. येथील सभामंडपातही भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळात सभागृहाला लागून डाव्या बाजूला असलेल्या देवळीत शिवलिंग, तर उजवीकडील देवळीत गणेशमूर्ती आहे.
गर्भगृहात लक्ष्मीत्रिविक्रमाची शुभ्र संगमरवरात घडवलेली मूर्ती आहे. गरुडावर आरूढ असलेल्या विष्णूच्या हातांत पद्म, शंख, गदा व चक्र ही आयुधे आहेत. त्याच्या डाव्या बगलेत लक्ष्मी बसली असून या मूर्तीखाली शेषनाग आहे. असे सांगितले जाते की तीन होन मोहरा देऊन ही मूर्ती राजस्थानमधून आणली होती. कार्तिक शुद्ध दशमी ते द्वादशी असे तीन दिवस या मंदिरात उत्सव होतो. उत्सवादरम्यान महापूजा, आरती, भजन होते. यावेळी ग्रामस्थांकडून भोवत्या हे पारंपरिक नृत्य येथे सादर केले जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो.
गावातील तामेश्वर–विश्वेश्वराच्या मंदिरालाही जांभ्या दगडाची तटबंदी आहे. तामेश्वर मंदिराचे तसेच आतील मुख्य खांबांचे बांधकाम दगडी आहे. या मंदिराचा घुमट मशिदीसारखा आहे. मंदिरात अखंड दगडात घडवलेली नंदीची मूर्ती आहे. तामेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महादेवाची पिंड व त्यामागे शिवमुख आहे. या मंदिराला लागून असलेल्या छोट्या दरवाजातून विश्वेश्वराच्या मंदिरात जाता येते. जांभ्या दगडातील या मंदिरातही शिवलिंग व नागफणा असलेले शिवमुख आहे. मंदिराबाहेर गणेशाची सुबक मूर्तीही आहे.
ग्रामदेवता रवळनाथाचे येथील मंदिरही ४०० वर्षे जुने आहे. जांभ्याची तटबंदी असलेल्या या कौलारू मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा व तुळशी वृंदावन आहे. सभामंडपाच्या बांधकामात लाकडांचा वापर अधिक केलेला असून येथील खांबांवर सुबक कलाकुसर करण्यात आली आहे. एका चौथऱ्यावर मध्यभागी रवळनाथ, त्याबाजूला त्रिमुखी वाघजाई, चंडिका व आदिष्टी देवींच्या मूर्ती आहेत. येथे नारळी पौर्णिमा, होळी, देवदिवाळी हे सण साजरे होतात. उत्सवांदरम्यान पालखीतून देवांची मिरवणूक काढली जाते.
जांभरूण या गावची ओळख पाट–पाखाड्यांचे गाव अशी आहे. येथील पाखाड्या (जांभ्या दगडांपासून बनविलेली पायरी वाट) गाव वसले तेव्हापासूनच असल्याचे बोलले जाते. अनेक वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी डोंगरातील झऱ्याचे पाणी खेळवत गावात आणले. या जिवंत झऱ्यातून २१ पाट तयार केले. या पाटांचे पाणी गावातील अनेक घरांच्या बाजूने तसेच काही घरांच्या खालूनही जाते. ते पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी वापरले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश असलेल्या या गावातील कातळशिल्पांना ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे २५ मीटर x २५ मीटर क्षेत्रफळाच्या कातळावर सुमारे ५० आकृत्या कोरल्या आहेत. त्यापैकी आठ ठिकाणी मानवी आकृत्या, तर इतर जलचर आणि चतुष्पाद प्राण्यांचे आकार आहेत. येथे एकाच ठिकाणी नऊ मनुष्याकृती आहेत. त्यापैकी एक आठ फुटांची, तर इतर पाच फुटांच्या आहेत. येथे कोरलेले काही प्राणी व पक्षी कोकणात आता आढळत नाहीत. त्यांच्या डोक्यावर वेगळे गोलाकार आकार आहेत. कातळशिल्पे असलेल्या परिसरात आठ विहिरी आहेत. त्यामुळे तेथे पूर्वी मनुष्यवस्ती असावी, असा अंदाज लावता येतो.