रासई देवी मंदिर

केसापुरी तांडा, दौलताबाद, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर

देवगिरी किल्ल्याच्या (आताचे नाव दौलताबाद) पायथ्याशी एका गुहेत असलेले रासई देवीचे प्राचीन मंदिर भाविक पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या देवीने अजिंक्य अवाढव्य असलेला दौलताबाद किल्ला आपल्या करंगळीवर उचलून धरलेला आहे, अशी आख्यायिका आहे. हिरेमाणकांची रास असलेला यादव राजांचा खजिना सांभाळणारी देवता म्हणून तिचे नावरासईअसे पडले. या किल्ल्यातील खंदकाच्या एका कपारीत असलेली ही स्वयंभू देवी जागृत नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला हा मराठवाड्यातील नव्हे तर देशातील एक अद्‌भुत किल्ला मानला जातो. समुद्रसपाटीपासून ९०१ मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्याचे यादवकालीन नाव देवगिरी असे होते. नंतर कुतुबाबाद, कुवत अल उस्लाम, दौलताबाद अशी त्याची नामांतरे झाली. महमद तुघलकाने काही काळासाठी आपली अखिल भारतीय राजधानी या किल्ल्यावर हलविली होती. त्यामुळे संपूर्ण देशाची राजकीय राजधानी बनण्याचा मान हा महाराष्ट्रातील केवळ छत्रपती संभाजीनगर या शहरालाच मिळालेला आहे. या किल्ल्यात हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्माची अनेक प्राचीन प्रार्थनास्थळे असली तरी रासई देवीचे मंदिर हे किल्ल्यात नसून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून साधारणतः तीन किमी अंतरावर केसरपुरी तांडा गावाजवळ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरातील गुहेत आहे.

या किल्ल्याला कांद्याच्या पापुद्र्यांप्रमाणे एकामागोमाग एक अशा तीन तटबंदी आहेत. त्यात सर्वात बाहेरची तटबंदी अंबरकोट, त्यानंतर महाकोट शेवटी काळा कोट. रासई देवी मंदिरात येण्यासाठी दौलताबादमधून गवळीवाडा रस्त्याने आल्यावर अंबरकोट तटबंदीतील प्रवेशद्वार ओलांडून केसापूर तांडा येथे यावे लागते. या प्रवेशद्वारापासून जवळच दौलताबादचा डोंगर दिसतो. या डोंगराच्या पायथ्याला हे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावर वाहने उभी करून पायवाटेने मंदिरापर्यंत यावे लागते. या डोंगराळ पायवाटेतून जाताना येथे अनेक सीताफळाची झाडे दृष्टीस पडतात. (खुलताबाद तालुका हा चांगल्या प्रतीच्या सीताफळांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.) या वाटेवरून जाताना किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेषही दिसतात. किल्ल्याच्या पायथ्याजवळ मंदिराच्या समोरील भागात दगडी दीपमाळ आहे. पायथ्याच्या वरच्या बाजूस पूर्वी मंदिराचा नगारखाना होता. उत्सवकाळात येथे नगारे वाजत असत. आता मात्र तो काहीसा ढासळला आहे.

दीपमाळेपासून काही पावलांवर आठदहा दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. त्या चढून फांजीवर पोचल्यावर तटबंदीतून जाणारा दगडी भुयारी मार्ग दिसतो. येथून ९० अंश कोनातून आत वळल्यावर एकसंध दगडी बांधणीचा पूल दिसतो. या पुलाच्या दोन्ही बाजूंना खोल खंदक आहेत. सुमारे ४० फूट रुंदी आणि ४० फूट खोली असलेल्या या जलखंदकात पूर्वी मगरी, सुसरी तसेच जलसर्प असत. शत्रू या खंदकातून पोहून किल्ल्यात येऊ नये, यासाठी ही व्यवस्था होती. दगडी पुलावर येताच समोर डोंगराचा सुमारे १६५ फूट उंचीचा ताशीव कडा दिसतो. हा कडा, जलखंदक तसेच दगडी पूल हा एका अखंड पाषाणाचाच भाग आहे.

दगडी पूल ओलांडून मंदिर परिसरात आल्यावर देवीचे शस्त्र असलेले त्रिशूळ आणि यज्ञकुंड नजरेस पडते. येथून काही पावलांवर मंदिराचे छोटे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराची उंची कमी असल्याने नतमस्तक होऊन मंदिरात यावे लागते. या गुहामंदिरात येण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या उतराव्या लागतात. रंगरंगोटी करण्यात आलेल्या सुमारे सात फूट उंचीच्या या गुहेत एका चौथऱ्यावर देवीचा शेंदूरर्चित तांदळा आहे. या सुहास्यवदनी देवीच्या नाकात नथ असून कपाळावर मोठा गोल टिळा आहे. यादव राजांच्या वंशजांचे कुलदैवत असलेली ही स्वयंभू देवी जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. ही देवी शाकाहारी असल्याने तिला सोवळ्यातला नैवेद्य लागतो. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या देवीची मोठी यात्रा भरते, त्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्याअहिंसाया चित्रपटाचे काही चित्रीकरण या परिसरात करण्यात आले होते.

उपयुक्त माहिती:

  • खुलताबादपासून १२ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून १८ किमी अंतरावर
  • छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने केसापुरी तांडा येथे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home