रामवरदायिनी देवी मंदिर

चोरवणे, ता. खेड, जि. रत्नागिरी

खेड तालुक्यातील वशिष्ठी नदीच्या उगमाजवळ असलेली चोरवणे येथील रामवरदायिनी देवी जिल्ह्यातील जागृत दैवतांपैकी एक मानली जाते. आदिशक्ती पार्वतीने श्रीरामांना वरदान दिले म्हणून या देवीला रामवरदायिनी असे म्हटले जाते. शिंदे घराण्याचे कुलदैवत असलेली ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवकालीन वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या देवीच्या मंदिरात चैत्र शुद्ध पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेत लाट (बगाड) नाचविणे, हे येथील मुख्य आकर्षण असते.

मंदिराबाबतची अख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम व्याकुळ होऊन तिचा सर्वत्र शोध घेत होते. त्यावेळी माता पार्वतीने श्रीरामांची परीक्षा घेण्याचे ठरविले ती येथील वशिष्ठी नदीच्या उगमाजवळ सीतेचे रूप घेऊन ठाण मांडून बसली. त्यानंतर श्रीराम सीतेचा शोध घेत या ठिकाणी आले. येथे येऊन पाहिले असता सीतेच्या रूपात प्रत्यक्ष माता पार्वती आल्याचे त्यांनी ओळखले. जगत्‌जननी आई भेटल्याच्या आनंदात श्रीरामांनी तिचे पाय धरले. पार्वतीला श्रीरामांच्या अगाध शक्तीची प्रचिती आली. श्रीरामांनी पार्वतीला विनंती केली की माते तू आता आली आहेस, तर भक्तांच्या उद्धारासाठी येथेच वास्तव्य करावे. श्रीरामांचा हा आग्रह माता पार्वतीने मान्य करून तुझ्या कार्यात यश येईल, असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून ही देवी येथे वास्तव्याला आहे.

१९२९ पूर्वी सुमारे पाच दशके हे मंदिर चोरवणे गावठाणालगतच्या घनदाट अरण्यात होते. तेव्हा हे मंदिर अगदी लहान साध्या पद्धतीचे होते. तत्कालीन आक्रमक मुघल, ब्रिटिश स्थानिक चोरट्या जमातींपासून देवीचे आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने देवीची संपत्ती, रूपे, टाके एका गुहेत सुरक्षित ठेवली जात असत. १९३५ मध्ये ढगफुटीमुळे या परिसरात पूर आला संपूर्ण चोरवणे गाव हे खाली नदीकाठी शिंदेवाडीत स्थलांतरित झाले. त्यानंतर देवीचे स्थानही खाली गावात आणण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. असे सांगितले जाते की त्यावेळी येथे असलेल्या श्रीनवशेरीदेवी, श्रीमानारादेवी आणि श्रीझोलाईदेव यापैकी झोलाईदेवीने आपले स्थान श्रीरामवरदायिनीला दिल्यानंतर आता जेथे मंदिर आहे त्या स्थानावर देवीची स्थापना करण्यात आली.

काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी या देवीसाठी नव्याने मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देवीकडून कौल घेऊन पाषाणी पद्धतीने मंदिर उभारण्याचे ठरले. त्यानुसार गावातील काही मंडळींनी अनेक ऐतिहासिक मंदिरांना भेटी दिल्या. अखेर कोल्हापूरचे शिल्पकार श्री. पाथरूड यांनी मंदिराच्या कामासाठी सहमती दिल्यानंतर त्यांच्या कल्पनेतून मंदिराची पायाभरणी झाली. त्यामुळेच कोकणातील बहुतेक मंदिरे कौलारू, तसेच जांभ्या दगडाची असली तरी हे मंदिर संपूर्ण काळ्या पाषाणातील आहे. २००७ ला भूमिपूजन झाल्यानंतर २०१७ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले. हेमाडपंती बांधकाम असलेल्या या मंदिरासाठी लागणारा दगड कोल्हापूर आणि कर्नाटकातील निपाणी येथील खाणींतून आणण्यात आला होता. मंदिराच्या बांधकामासाठी कोल्हापूरवरून कारागीर आणण्यात आले. हे मंदिर पूर्वी दगडी होते, त्या मूळ जोत्याला धक्का लावता जोत्याच्या बाहेरून नव्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.

सुमारे ३५ गुंठे जागेत असलेल्या या मंदिराभोवती चार फूट उंचीची तटबंदी आहे. पाषाणापासून बनवलेले मंदिराचे प्रवेशद्वार म्हैसूरच्या महलाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आहे आणि ते येथील स्थानिक कारागिरांनी बनविले आहे. मंदिराच्या प्रांगणात सुंदर उद्यान विकसित करण्यात आले असून प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी त्यातून फरसबंदीची छोटी वाट केलेली आहे. मुख्य मंदिरासमोर वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळेचेही बांधकाम येथील स्थानिकांनीच केलेले आहे.

सभामंडप तीन गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम असून त्यात गणेशमूर्ती कोरलेली आहे. प्रशस्त सभामंडपाच्या डावीकडील गर्भगृहात झोलाईदेवीची मूर्ती आहे, तर उजवीकडील गर्भगृहात मानाईवाघजाई विराजमान आहेत. मुख्य गर्भगृहाबाहेर उजवीकडे शिंदे घराण्याची राजमुद्रा कोरलेली आहे. या शिवाय सभामंडपात १५ व्या शतकापासूनची विविध चलनी नाणी त्यांची माहिती येथे लावण्यात आलेली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी पाडलेले शिवराई हे नाणेही आहे. मुख्य गर्भगृहात चांदीच्या मखरात, विविध वस्त्र अलंकार ल्यालेली अश्वारूढ रामवरदायिनी देवीची मूर्ती असून तिच्या एका हातात नाग आहे. तिच्या डावीकडे गणेशाची मूर्ती, तर उजवीकडे शिवलिंग आहे. या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस आहे.

चैत्र शुद्ध पौर्णिमेला रामवरदायिनी देवीची जत्रा भरते. जत्रेच्या दिवशी पहाटे गावातील सुतार बगाड बनविण्यासाठी निवडलेले झाड तोडून त्यापासून बगाडाची लाट बनवितात. सनईताशाच्या गजरात ग्रामस्थ ही लाट आणून देवीसमोरील जागेवर ठेवतात. त्यानंतर लाटेचे पूजन झाल्यावर यात्रेसाठी आलेले भाविक गाऱ्हाणे घालतात आणिदेवीच्या नावाचे चांगभलंचा गजर करत ही लाट नाचवत पटांगणातून मुख्य सभामंडपामागील एका खांबाजवळ आणतात. त्यानंतर लाटेला ३० फूट उंचीच्या लाकडी गोफेवर ठेवले जाते. या विधीनंतर गावातील सुतारमंडळी आपल्या पाठीला विशिष्ट प्रकारचा गळ अडकवून या बगाडाला लटकतात पाच फेऱ्या मारतात. याशिवाय मंदिरात महाशिवरात्र, शिमगोत्सव, हनुमान जयंती, नवरात्रोत्सव, देवदिवाळी आदी उत्सव साजरे होतात. पूर्वकल्पना दिल्यास भाविकांना या मंदिरात देवीला कौल लावता येतो. (संपर्क : पुजारी, मो. ८२७५०५८०८५

सकाळी ते रात्री वाजेपर्यंत भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. दररोज दुपारी १२.३० ते या वेळेत आलेल्या भाविकांना येथे मोफत महाप्रसाद देण्यात येतो. याशिवाय भाविकांच्या सोयीसाठी येथे अत्याधुनिक भक्त निवासही उभारण्यात आलेला आहे.

उपयुक्त माहिती:

  • खेडपासून ५२ किमी, तर रत्नागिरीपासून १२० किमी अंतरावर
  • खेड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जातात
  • मंदिरात दुपारी महाप्रसाद भक्त निवासाची सुविधा आहे
Back To Home