रामनाथ मंदिर

रामनाथी, बांदिवडे, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

प्रभू श्रीरामाचे आराध्य दैवत असलेल्या रामनाथाचे भव्य मंदिर बांदिवडे येथे स्थित आहे. वत्स व कौंडिण्य गोत्रीय ब्राह्मण समाजाने मूलतः लोटली येथे स्थापन केलेले रामनाथ मंदिर पोर्तुगीज अत्याचारांमुळे सोळाव्या शतकात येथे स्थलांतरित झाले. रामनाथ हे हरि (विष्णू) आणि हर (शिव) यांच्या एकतेचे दैवी प्रतीक मानले जाते. गोमंतकातील गौड सारस्वत ब्राह्मण आणि दैवज्ञ ब्राह्मणांचे कुलदैवत असलेल्या रामनाथाच्या या मंदिरात सांतेरी, कामाक्षी, लक्ष्मीनारायण, तसेच सिद्धनाथ गणपतीचेही स्थान आहे.

रामनाथ हे शंकराचे एक नाव आहे. रामेश्वर हे त्याचे प्रतिनाम आहे. याबाबतची पौराणिक कथा अशी की श्रीरामाने रावणाचा वध केला. पण रावण हा ब्राह्मण होता. त्यामुळे श्रीरामास ब्रह्महत्येचे पाप लागले. त्याचे क्षालन करण्यासाठी श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी, असे ऋषींनी सांगितले. तेव्हा सीतेने समुद्रतीरी वालुकालिंग तयार केले. तेच शिवलिंग रामेश्वरम् म्हणून ओळखले जाऊ लागले. ऋषींनी श्रीरामाला रामेश्वर या नावाचा अर्थ विषद करून सांगण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीरामाने सांगितले होते की ‘रामस्य ईश्वरः सः यः रामेश्वरः’ म्हणजे जो रामाचा ईश्वर आहे, तो रामेश्वर आहे. शिवशंकर हा माझा ईश्वर आहे. तेव्हा रामेश्वर किंवा रामनाथ म्हणजे शंकर. मात्र येथे रामनाथ हा हरि आणि हर या स्वरूपात विराजमान आहे.

या मंदिराचा इतिहास असा की मुळात रामनाथाचे हे मंदिर सासष्टी तालुक्यात जुवारी नदीच्या काठावरील लोटली या गावात होते. १५६७ साली कॅप्टन दियोगु रुद्रिगीस (रॉड्रिग्ज) हा लोटली या गावापासून काही अंतरावर असलेल्या रायतूर किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने एके दिवशी लोटलीतील प्रमुख ग्रामस्थांना रायतूरच्या किल्ल्यावर हजर राहण्याचा आदेश दिला. परंतु त्यांनी तो आदेश पाळला नाही. तेव्हा शिक्षा म्हणून या लोकांची घरे जाळून टाकण्यात यावीत, असा सल्ला त्याला काही अधिकाऱ्यांनी दिला. तेव्हा घरांऐवजी त्यांचे मुख्य देवालय जाळून टाकावे, अशी आज्ञा रुद्रिगीस याने दिली. त्यानुसार येथील रामनाथाचे देवालय जाळून टाकण्यात आले. यानंतर लोटलीच्या ग्रामस्थांनी गोवा बेटातील पोर्तुगीज न्यायालयात धाव घेतली व त्या अधिकाऱ्याविरुद्ध खटला भरला. विशेष म्हणजे त्यावेळी पोर्तुगीज न्यायालयाने त्या पोर्तुगीज अधिकाऱ्यास दोषी ठरवले. एवढेच नव्हे, तर त्याने स्वखर्चाने हिंदुंचे ते देवालय पूर्ववत बांधून द्यावे, असा आदेश दिला. त्याविरोधात कॅप्टन दियोगु रुद्रिगीस याने वरिष्ठ न्यायालयात अपिल केले. त्याचवेळी या अधिकाऱ्याने आर्चबिशप आणि एका धर्माधिकाऱ्याच्या मार्फत गोव्याच्या व्हिसेरेईला, मंदिर जाळणे हे महत्त्वाचे धर्मकृत्य होते, असे पटवून दिले. तेव्हा व्हिसेरेईने त्या कॅप्टनला बोलावून घेत सासष्टीतील सापडतील ती सर्व देवालये जाळून टाकावीत, असा आदेश दिला. त्यावेळी त्याने एका रात्रीत २८० देवालयांच्या वास्तू जाळून टाकल्या. अशा प्रकारे या कॅप्टनने लोटलीतील रामनाथाचे मंदिर जाळून टाकले. परंतु देवभूमी गोमंतक पुस्तकाचे लेखक विनायक नारायण शेणवी धुमे यांच्या अभ्यासपूर्ण मतानुसार, १५६७ मध्ये मंदिर जाळण्याची घटना घडण्याच्या आधीच लोटलीतील ग्रामस्थांनी या मंदिरातील मूर्तीचे स्थलांतर केले होते. ही घटना १ मे १५६० ते १५६७ या काळात घडली असावी, असा त्यांचा कयास आहे.

असे सांगण्यात येते की लोटलीतील ग्रामस्थांनी गुपचूप ही मूर्ती घेऊन झुवारी नदी ओलांडली. तेथून ते प्रथम दुर्भाट येथे गेले व नंतर आडपई मार्गे ते बांदोड्यात गेले. त्यावेळी बांदोडा ज्या अंत्रुज महालात (फोंडा तालुका) होते, तो प्रदेश आदिलशाही राजवटीच्या अंमलाखाली होता. त्या मुस्लिम राजवटीने तेव्हा हिंदू देवालये स्थापन करण्यास परवानगी दिलेली होती. त्यामुळे बांदोड्यातील आजच्या रामनाथी या भागात मूळ लोटलीतील रामनाथाच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. कालांतराने, शके १८२६, क्रोधी नामसंवत्सर फाल्गुन शुक्ल दशमी, गुरूवार, ता. १६ मार्च १९०५ रोजी येथे नवीन मंदिराचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यात रामनाथ, लक्ष्मीनारायण, सांतेरी आणि कामाक्षी या दैवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

येथील भव्य महाद्वारातून मोठ्या प्रशस्त आवारात प्रवेश करताच समोरच रामनाथ मंदिराची टोलेजंग वास्तू दिसते. मंदिरासमोर सहा स्तरांचा उंच व भव्य असा दीपस्तंभ आहे. दीपस्तंभाच्या खालच्या स्तरातील देवळ्यांत संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, स्वामी विवेकांनंद, रामकृष्ण परमहंस आदी संत महात्म्यांची उठावशिल्पे आहेत. नजीकच तुळशीनाग वृंदावन आहे. मुखमंडप, सभामंडप, अर्धमंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या मुखमंडपास समोरून सपाट भिंत आहे. त्यात चौकोनाकार प्रवेशद्वार आहे. येथे छताकडील भागात दोन्ही बाजूंना दोन छोट्या छत्र्या आहेत. मंदिराचा सभामंडप आणि महामंडपाची इमारत दुमजली आहे. त्यावर कौलारू छप्पर आहे. महामंडपाच्या दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वाराचा मंडप असून त्यावर घुमटाकार कलश आहे.

सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. त्याच्या खालच्या बाजूस मोठे महिरपी कमानदार दरवाजे, तसेच खिडक्या आहेत. वरच्या भागात सिमेंटच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. आत कक्षासने आहेत. समोरच्या ओट्यावर उजव्या बाजूस मखरोत्सवात वापरण्यात येणारा मोठा सुशोभित मखर आहे. याच्या वरच्या बाजूला पायऱ्या पायऱ्यांचा आकार असलेला छज्जा आहे. येथून अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपास चौकोनाकार प्रवेशद्वार आहे व त्यास सोनेरी नक्षीदार पत्र्याचे आवरण आहे. महामंडपाच्या भिंतीचे प्रवेशद्वार कमानाकार आहे. त्यावर चंदेरी पत्रा मढवलेला आहे. येथे द्वारस्तंभांच्या खालच्या भागांत गजशिल्पे आहेत. त्याच्यांवर गरुड व हनुमंताचे शिल्प कोरलेले आहे. स्तंभदंडावर देवीची शिल्पे कोरलेली आहेत. तर वरच्या कमानीच्या भागावर नागशिल्पे आहेत. या प्रवेशद्वाराच्या बाजूस वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या लांबलचक महामंडपाचे कमानदार प्रवेशद्वार व त्याच्या बाजूस असलेल्या दोन रुंद खिडक्यांनी दोन भाग करण्यात आले आहेत. येथील गोलाकार स्तंभ पितळेचे असल्यासारखे सुशोभित करण्यात आले आहेत. हे स्तंभ मोठ्या कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिराच्या छतावर हंड्या आणि मोठे झुंबर टांगलेले आहे. महामंडपात मध्यभागी पितळेची सुंदर समई आहे. अंतराळाचे प्रवेशद्वार व त्याबाजूची भिंत पूर्णतः चांदीच्या पत्र्याने मढवलेली आहे. त्यावर विविध देवीदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत व ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. उत्तरांगावर श्रीराम-लक्ष्मण-सीता व हनुमान शिवलिंगाची पूजा करीत असल्याचा व त्यांना शिव-पार्वती आशीर्वाद देत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे. विशेष म्हणजे त्याच्या वरच्या भागात अनंतशायी विष्णू व लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे. अंतराळाच्या भिंतीवर दोन्ही बाजूंनी मखरामध्ये द्वारपालांच्या मूर्ती आहेत. या मखरांच्या वरच्या बाजूंस कमळात विराजमान लक्ष्मी व सरस्वतीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वारही चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवलेले आहे. द्वारस्तंभांवर मध्यभागी गरुड आणि हनुमंताच्या कोरीव मूर्ती आहेत. आत रामनाथ महादेवाचे शिवलिंग आहे. त्यावर चांदीचे अभिषेकपात्र आहे. एरवी शिवालयाच्या गर्भगृहाबाहेर असलेला नंदी येथे गर्भगृहात आहे. उपलब्ध माहितीनुसार, रामनाथाच्या मंदिराच्या जुन्या वास्तूमध्ये पाषाणी नंदी होता. जीर्णोद्धाराच्या वेळी तो हलवण्यात आला व त्या मूळ पाषाणी नंदीच्या ऐवजी येथे दुसरा त्यामानाने लहान असा पाषाणी नंदी गर्भगृहात रामनाथाच्या पिंडीजवळ ठेवण्यात आला. या शिवपिंडीच्या मागच्या भागात उंच अधिष्ठानावर चांदीच्या आसनावर काळ्या पाषाणात घडवलेली रामनाथाची भरजरी वस्त्रालंकारांनी व पुष्पमालांनी शृंगारलेली मूर्ती विराजमान आहे.

काही अभ्यासकांच्या मते, वैष्णव संप्रदायातील द्वैत-वेदान्त मताचे प्रवर्तक मध्वाचार्य यांच्या विचारांचा प्रसार कर्नाटकात बाराव्या-तेराव्या शतकात मोठ्या प्रमाणावर झाला. त्याच काळात रामनाथी देवस्थान हे वैष्णव संप्रदायात समाविष्ट झाले. यामुळे रामनाथ हा विष्णूचा अवतार मानण्यात येऊ लागला, तर सांतेरी आणि कामाक्षी देवी या लक्ष्मीचा अवतार गणल्या जाऊ लागल्या. अंतराळावरील अनंतशायी नारायणाचे शिल्प, मंदिरातील वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती, तसेच बाहेरील तुलसी वृंदावन यांचे स्पष्टिकरण यातून मिळते. या देवालयात सांतेरी देवी, कामाक्षी देवी, लक्ष्मीनारायण, तसेच गणपती यांच्याही मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या वर अष्टकोनाकार मनोरा व त्यावर घुमट, आमलक आणि कलश अशी रचना असलेले भव्य शिखर आहे. देवालयाच्या प्रांगणात वेताळ आणि कालभैरवाचे मंदिर आहे. रामनाथ मंदिराच्या डाव्या बाजूस एका तीन मजली इमारतीच्या तळभागात काचेच्या मोठ्या दालनात ‘सिद्धनाथ रथगृह’ आहे. त्यात अश्वरथ, हत्तीची अंबारी, तसेच शिबिका ठेवण्यात आली आहे. याशिवाय येथे मोठी अग्रशाळा आहे.

येथे दर सोमवारी रात्री साडेआठ वाजता रामनाथ देवाची पालखी काढण्यात येते. येथे वार्षिक महापर्वणी महाशिवरात्र महोत्सव माघ कृष्ण द्वादशीस सुरू होऊन फाल्गुन शुद्ध द्वितीयेपर्यंत चालतो. या महोत्सवात पालखीतून देवाची मिरवणूक काढली जाते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे व सायंकाळी रामनाथ देवाचा रथोत्सव होतो. या शिवाय मंदिरात विविध सण व उत्सव विधिवत धार्मिक पद्धतीने व उत्साहाने साजरे करण्यात येतात. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ५ किमी आणि पणजी येथून ३० किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • फोंडा येथून राज्य परिवहन सेवेच्या बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८९५६०६५५८५,
  • दूरध्वनी : (०८३२) २३३५२८१
Back To Home