रामेश्वर मंदिर / कालिका देवी मंदिर

काळबादेवी, ता. जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य काळबादेवी गावात खाडीकिनारी वसलेले स्वयंभू रामेश्वराचे मंदिर कोकणातील पुरातन मंदिरांपैकी एक आहे. रामेश्वर तसेच या मंदिरालगतच असलेले कालिका देवीचे देवस्थान येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अशी आख्यायिका आहे की कालिका देवी गोव्याहून समुद्रातून पाषाणावरून तरंगत येथे आली. रामेश्वर मंदिरात सुमारे पाचशे किलो वजनाची भव्य घंटा आणि आवारातील दीडशे किलो वजनाचा सागरगोटा, ही येथील विशेष आकर्षणे आहेत. महाशिवरात्रीला होणारा पालखी सोहळा हा येथील मोठा उत्सव असतो.

रामेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी गावातील एका व्यक्तीची गाय आता मंदिर असलेल्या ठिकाणी पान्हा सोडत असे. घरी गेल्यावर दूध देत नसल्याने एके दिवशी त्या व्यक्तीने काही ग्रामस्थांच्या मदतीने तिच्यावर पाळत ठेवली. तेव्हा ती विशिष्ट ठिकाणी पान्हा सोडत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ती जागा कुदळीने खोदण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना तेथे शिवपिंडी आढळली. कुदळीचा घाव लागल्याने पिंडीतून रक्त वाहू लागले. त्यानंतर ग्रामस्थांनी देवाची क्षमा मागून तेथे मंदिर उभारले. नेवरे येथील मुकादम महादेव वासुदेव बरवे यांनी १८८९ मध्ये या मंदिराची दुरुस्ती केली, असे नमूद केलेला कोरीव लेख मंदिराच्या आवारात आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले.

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी या गावाचे नाव पूर्वी पुसाळे असे होते. मात्र येथे कालिका देवीच्या वास्तव्यामुळे त्याला काळबादेवी असे नाव पडले. रत्नागिरीहून मिऱ्या बंदरापासून काही अंतरावरील साखरतर रस्त्याने येथे येता येते. गावातील मंदिराच्या कमानीतून आत आल्यावर आजूबाजूला गर्द हिरवाई असलेला रस्ता थेट मंदिरापर्यंत जातो. खाडीच्या किनाऱ्याला लागून असलेल्या या कौलारू मंदिराभोवती चिऱ्यांची तटबंदी असून प्रांगणात चिऱ्याच्या दगडांचीच फरसबंदी करण्यात आलेली आहे. मंदिरासमोर दोन मोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिराच्या आवारात १५० किलो वजनाचा सागरगोटीच्या आकाराचा दगड आहे. असे सांगितले जाते की आजवर कोणाही एका व्यक्तीला तो उचलता आलेला नाही.

जमिनीपासून चार फूट उंच जोत्यावर असलेल्या रामेश्वर मंदिराचे स्वरूप सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे आहे. खालून आठ पायऱ्या चढल्यावर सभामंडपात प्रवेश होतोकाळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिराच्या सभामंडपात लाकडी खांब असून त्यावरील कमानींवर नक्षीकाम आहे. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून भाविकांना बसण्यासाठी बाहेरील भिंतींमध्ये दोन फूट उंचीची कक्षासने (दगडी बाके) आहेत. सभामंडपात ५०० किलो वजनाची पोर्तुगीजकालीन पितळी घंटा आहे. या घंटेवर १७३७ हे साल कोरलेले आहे. सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी विसाजीपंत लेले यांच्यामार्फत उंटावरून ही घंटा पाठवल्याची नोंद आहे. तिचा आवाज दूरपर्यंत ऐकू जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी उजव्या बाजूला नंदी, त्यासमोर गणेशाची मूर्ती आणि या मूर्तीच्या बाजूला वाघावर आरुढ असलेल्या देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम आहे. गर्भगृहात अखंड पाषाणातील मोठे स्वयंभू शिवलिंग आहे. वरच्या बाजूला असलेल्या गलंतिकेतून या शिवलिंगावर सतत अभिषेक होत असतो.

रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री त्रिपुरारी पौर्णिमेला मोठे उत्सव होतात. श्रावणातील पहिल्या सोमवारी येथे रामेश्वर सप्ताहाला सुरुवात होते. दुसऱ्या सोमवारी श्री देव रामेश्वर पालखी प्रदक्षिणा सोहळ्याने सप्ताहाची समाप्ती होते. पालखी प्रदक्षिणेदरम्यान देवाला पालखीत विराजमान करून पूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली जाते. पालखी मंदिरातून थेट गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वस्तीत जाते. तेथून मुख्य सोहळ्याला सुरुवात होते. या दरम्यान गावातील सर्व १२ वाड्यांमध्ये पालखी जाते. तिच्या स्वागतासाठी प्रत्येक वाडीत सजावट केली जाते. वाटेत भक्त पालखीचे दर्शन घेतात. शेवटच्या टप्प्यात महिलांनी पूजा केल्यानंतर देवाला गाऱ्हाणे घातले जाते. नंतर पालखी मंदिरात येते. येथे दोन्ही मंदिरांना पाच प्रदक्षिणा घातल्यावर या सोहळ्याची सांगता होते. गावात भंडारी समाजाची मोठी वस्ती आहे. भात मासे हा त्यांचा मुख्य आहार असला तरी या सप्ताहात गावात कोणीही मांसाहार करत नाही.

रामेश्वराच्या मंदिरालगत कालिका देवीचे मंदिर आहे. या देवीबाबतची आख्यायिका अशी की ही देवी गोव्याहून समुद्रमार्गे एका पाषाणावरून तरंगत गावात आली. त्यानंतर तिने गावातील एका व्यक्तीला दृष्टांत देऊन माझी योग्य ठिकाणी प्रतिष्ठापना कर, असे सांगितले. ब्रिटिश राजवटीदरम्यान गावातील एक व्यक्ती दारूचा व्यवसाय करत असे. त्याचा दारूचा माल गलबतातून गावात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. तो जप्त करण्यासाठी पोलीसांनी गावात झडती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने देवीचा धावा केला असता, पोलीसांना दारूच्या जागी कणी दिसली. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी येथील मूळ मूर्तीच्या जागी देवीच्या नव्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली. जुनी मूर्ती प्रवेशद्वाराशेजारी उजव्या हाताला असलेल्या एका छोट्या देवळीत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिरात देवीच्या दोन मूर्ती आढळतात.

कालिका मातेच्या मंदिराला उंच पांढरे शिखर आहे. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती आहे. नवसाला पावणारी, ज्या स्त्रियांचे माहेर या गावात आहे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून असलेली, अशी या देवीची ख्याती आहे. नवरात्रोत्सवात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवी ज्या पाषाणावरून तरंगत गावात आली, त्या पाषाणाचे मंदिरही गावात बांधण्यात आले आहे. कालिका देवीच्या मंदिरापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर असलेले हे मंदिर गावातील बळवंत रामचंद्र मयेकर यांनी बांधले. त्यात एका काचेच्या पेटीत हा पाषाण ठेवण्यात आला आहे.

ठळक वैशिष्टे

  • रत्नागिरीपासून १३ किमी अंतरावर रत्नागिरी येथून एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home