रामेश्वर मंदिर

आकेरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

आपल्या देवाचे मंदिर पाषाणातील असल्यामुळे घराच्या बांधकामात कोणीही दगडाचा वापर करायचा नाही, असा नियम पिढ्यान् पिढ्या पाळणारे कोकणातील आकेरी हे एक गाव. टेंब्ये स्वामींचे माणगाव आणि सावंतवाडी यांना जोडणाऱ्या रस्त्यावर या गावाचे ग्रामदैवत रामेश्वर आहे. त्याचे काळ्या पाषाणात आणि लाकडात बांधलेले प्राचीन देवालय हे या गावाचे आकर्षणस्थान आहे. हे मंदिर पंधराव्या शतकातील असावे, असा जाणकारांचा कयास आहे. या मंदिरातील दगडातील नक्षी, कोरीव मूर्तीकाम या प्रमाणेच येथील एकाश्म शयनमंचक (दगडी पलंग) हाही भाविकांप्रमाणे वास्तुशिल्प अभ्यासकांच्या आकर्षणाचा भाग आहे.

रामेश्वर हे शंकराचे एक नाव आहे. या नावाबद्दलची पौराणिक कथा अशी की रावण हा ब्राह्मण असल्याने श्रीरामास ब्रह्महत्येचे पाप लागले. त्या पापाचे क्षालन करण्यासाठी श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी, असे ऋषींनी सांगितले. तेव्हा सीतेने समुद्रतीरी वालुकालिंग तयार केले. श्रीरामाने त्याची स्थापना केली. तेच शिवलिंग रामेश्वरम् म्हणून ओळखले जाऊ लागले. ऋषींनी श्रीरामाला रामेश्वर या नावाचा अर्थ विषद करून सांगण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीरामाने सांगितले कीरामस्य ईश्वरः सः यः रामेश्वरःम्हणजे जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. शिवशंकर हा माझा ईश्वर आहे. त्यावेळी शंकराने सांगितले की रामेश्वर या शब्दाचा अर्थ असा नाही, तर तोरामः ईश्वरो यस्य सः रामेश्वरःअसा आहे. म्हणजे राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. हरि आणि हर हे एकच आहेत असे या कथेतून सांगण्यात आले आहे. आकेरीतील हे मंदिर शैव संप्रदायातील असले तरी येथील वैष्णव प्रतिमांमुळे या कथेची प्रचिती येते

गावाबाहेर काही अंतरावर, डोंगराच्या कुशीत, प्रशस्त अशा माळरानावर हे प्राचीन मंदिर आहे. वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. मुख्य आणि उपसभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोर अलीकडच्या काळात उभारलेला, रंग दिलेला पाच स्तरीय दीपस्तंभ आहे. मंदिराचे दोन्ही सभामंडप प्रशस्त आहेत. मुख्य सभामंडप खुल्या स्वरूपाचा, दुमजली उतरत्या कौलारू छपराचा आहे. येथील स्तंभ साधे, ताशीव चौकोनी आहेत. या सभामंडपात फारशी कलाकुसर कोरीवकाम नाही. यावरून मंदिरास या सभामंडपाची जोड कालांतराने देण्यात आलेली असावी, असे जाणवते

मुख्य सभामंडपास जोडून अर्धखुल्या प्रकारचा आणि प्राचीन बांधकाम असलेला उपसभामंडप आहे. या मंडपास डाव्या उजव्या बाजूस दगडी कक्षासने आहेत. त्यांतच मंडपाचे स्तंभ आहेत. गोल पाषाणाच्या या स्तंभांच्या शीर्षस्थानी नागप्रतिमा कोरलेल्या आहेत त्यावर लाकडी तरंगहस्त आहेत. या मंदिरातील तरंगहस्त हे काष्ठशिल्पांचा उत्तम नमुना आहेत. या मंडपातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तेथील पाषाणाचा शयनमंचक. हा दगडी पलंग अखंड पाषाणातून कोरून तयार केलेला आहे. गुळगुळीत; परंतु साधा आणि बसका असा हा शयनमंचक मंदिरात क्वचितच पाहावयास मिळतो. कर्नाटकातील सिरसीपासून जवळच असलेल्या बनवासी येथील मधुकेश्वर या प्राचीन शिवमंदिरातही अशाच प्रकारचा मंचक आहे. मंदिराच्या आवारात बाह्य भिंतीजवळच्या एका खोलीत हा पाषाण मंचक ठेवलेला आहे. तो ६०० वर्षे जुना आहे त्याच्या चारी कडांना सुंदर नक्षीकाम केलेले खांब आहेत. कर्नाटकातील सोंदे घराण्याचा राजा रघू नाईक याने तो मंदिरास भेट दिल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात मात्र असा मंचक दुर्मीळ आहे.

रामेश्वर मंदिराच्या उपसभामंडपातून काहीशा उंचावर असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाचे प्रवेशद्वार त्रिशाखीय आहे. आतील दोन द्वारशाखा एकाच अखंड पाषाणातून कोरलेल्या आहेत. या शाखांच्या तळाशी गरूड हनुमंतांची शिल्पे आहेत, तर चौकटीच्या वरील भागात ललाटबिंबस्थानी गणेशाची कोरीव प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या दोन्ही बाजूंस रिद्धीसिद्धीच्या प्रतिमा आहेत. मंदिराचे अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे. आत रुंद गोलाकार स्तंभ आहेत. बसक्या गोलाकार चौथऱ्यावर उभारलेल्या या स्तंभांचा वरचा भाग घटपल्लवाकारांनी सुशोभित आहे. या स्तंभशीर्षावर लाकडाचे कोरीव काम केलेले तरंगहस्त आहेत. अंतराळात पुढच्या भागात नंदीची पाषाणाची मूर्ती आहे

अंतराळात प्रवेश करताच तेथील स्तंभांप्रमाणेच लक्ष वेधून घेतात त्या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील द्वारपालांच्या भव्य मूर्ती. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना या उंच मूर्ती कोरलेल्या आहेत. विशेष म्हणजे हे वैष्णव द्वारपाल आहेत. त्यांच्या हातात शंख आणि गदा आहे. गर्भगृहाचे द्वार द्विशाखीय आहे या शाखांवर सुंदर नक्षीकाम आहे. ललाटबिंबस्थानी शेषशायी भगवान विष्णूचे शिल्प आहे. हातात गदा, शंख, पद्म चक्र धारण केलेल्या या विष्णूमूर्तीच्या बेंबीतून बाहेर आलेल्या कमळावर ब्रह्मदेव आहे. तेथेच विष्णूचे पाय चेपणारी लक्ष्मी, डाव्या बाजूस हनुमान, उजवीकडे विष्णूच्या मस्तकाजवळ नमस्कारमुद्रेतील गरूड शेषनाग अशी ही लक्षणीय मूर्ती आहे. या दर्शनीभिंतीवर वरच्या बाजूला अष्टदिक्पाल आहेत. त्यांत गजारूढ इंद्र, मेंढ्यावर आरूढ असलेला अग्नी, महिषारूढ यम, नरारूढ कुबेर, मकरारूढ वरूण, मृगारूढ वायू, गर्दभारूढ निऋती, वृषभारूढ ईशान यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी कीर्तिमुख आहे. मंदिरातील ही शिल्पे पाहण्यासाठी अनेक अभ्यासक येथे आवर्जून येत असतात. मंदिराच्या गर्भगृहामध्ये उंच गोलाकार शिवपिंडी आहे. पाषाणाच्या या शिवपिंडीच्या मागच्या बाजूस, गर्भगृहाच्या भिंतीमधील कोनाड्यांत, गणेशादी देवतांच्या प्रतिमा विराजमान आहेत.

या मंदिरात श्रावणातील दर सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची रीघ असते. येथे त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्र दसरा सण जल्लोषात साजरे केले जातात. नवरात्रीनंतर दशमीस येथे शिवविवाहाचा मोठा सोहळा होतो. त्याच प्रमाणे येथे महाशिवरात्रीस मोठा उत्सव आयोजित केला जातो. या दोन दिवसीय उत्सवात रामेश्वराची रथयात्रा काढण्यात येते. या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात. रात्री येथे दशावतारी नाटक सादर केले जाते. रथोत्सवासाठीचा रथ सावंतवाडी संस्थानच्या राजांनी देवस्थानला अर्पण केला होता. हा रथ चार स्तरीय आहे तोही काष्ठशिल्पाचा उत्तम नमुना आहे. लाकडात कोरलेले अश्व, नागप्रतिमा, विविध देवता आणि प्रतिहारींच्या प्रतिमा यांनी हा रंगीत रथ सुशोभमान झालेला आहे. हा रथ एरवी येथील एका मंडपात झाकून ठेवलेला असतो. मंदिराच्या मागील बाजूस एका पडवीमध्ये देवाची पालखी आहे. या पालखीवर खास महाराष्ट्रीय शैलीत रंगविलेल्या देवदेवतांच्या प्रतिमा आहेत

रामेश्वर मंदिराच्या परिसरात रवळनाथाचेही मंदिर आहे. येथे प्राचीन दगडी तुलसीवृंदावन आहे. रामेश्वर मंदिराबाहेर काही वीरगळ आणि सतीशिळा आहेत. यातील एक वीरगळ वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वीराचा आहे. त्याच्या खालच्या भागात तसे चित्र कोरलेले आहे, तर वरच्या भागात चंद्र आणि सूर्य प्रतिमा आहेत. येथेच पाषाणात बांधलेले, कठडा पायऱ्या असलेले एक तळेही आहे

आकेरी हे अत्यंत निसर्गसंपन्न आणि गूढरम्य गावरात्रीस खेळ चालेया दूरचित्रवाणी मालिकेच्या चित्रिकरणानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले. येथे सरकारी इमारती वगळता दगडी बांधकाम केलेली घरे अभावानेच आढळतात. याबाबत अशी कथा सांगतात की देवापेक्षा कोणीही मोठे असू नये आणि देवाचे मंदिर दगडात असेल तर कोणीही दगडात घर बांधू नये, या भावनेने या मंदिराच्या बांधकामाच्या वेळी गावच्या मानकऱ्यांनी देवासमोर शब्द दिला होता. तो आजतागायत पाळण्यात येतो.

उपयुक्त माहिती

  • कुडाळपासून १६ किमी, तर ओरोसपासून २८ किमी अंतरावर
  • कुडाळ येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध नाही
Back To Home