नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक असलेल्या राजा भर्तृहरीनाथांचे प्राचीन समाधी मंदिर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात हरंगुळ येथे आहे. उज्जैनचे राजा विक्रमादित्यांचे सावत्र भाऊ असलेले राजा भर्तृहरीनाथांनी गुरु गोरक्षनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली होती. हरंगुळ येथील हे स्थान राजा भर्तृहरीनाथांचे भस्मस्वरूपातील वस्त्रसमाधी स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी नागपंचमीला येथे जत्रा भरते. या जत्रेदरम्यान येथील समाधीस्थानावर वारूळ तयार होते. या दिवशी नागराज वारुळातून सर्परूपाने बाहेर येऊन गर्भगृहात ठेवलेल्या भांड्यातील दूध प्राशन करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराला आणि गावाला ऐतिहासिक व सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे. नाथ संप्रदाय हा भारताच्या इतिहासाच्या मध्यकाळातील एक महत्त्वाचा शैव संप्रदाय मानला जातो. रक्षण करणारा स्वामी म्हणजे ‘नाथ’ आणि या स्वामींचा संप्रदाय म्हणजे ‘नाथ संप्रदाय’ अशी या पंथाची व्याख्या केली जाते. या संप्रदायाचा उदय साधारणपणे दहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान झाल्याचे मानण्यात येते.
या संप्रदायाची उत्पत्ती, त्याचे मूळ स्थान, नामकरण आणि प्रवर्तक यांविषयी इतिहासकारांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. काहींच्या मते आदिनाथ परमेश्वर शिवापासून या संप्रदायाचा उगम झाला. दुसऱ्या एका मतानुसार, पूर्वीच्या पाशुपत, कापालिक, कालामुख, योगिनी कौल मार्ग आणि चौऱ्याऐंशी सिद्धांच्या परंपरेतून या पंथाचा उदय झाला असावा. संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ‘कौलज्ञाननिर्णय’, ‘मत्स्येंद्रसंहिता’, ‘सिद्धसिद्धांतपद्धती’, ‘गोरक्षशतक’, ‘अमरौघशासन’, ‘महार्थमंजिरी’ आणि ‘गोरक्षसंहिता’ हे ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. योगमार्गाने सिद्धावस्था किंवा अवधूतावस्था प्राप्त करणे हे या पंथाच्या अनुयायांचे मुख्य ध्येय असते. गुरु-शिष्य परंपरा असलेल्या या संप्रदायाचे अनुयायी जेव्हा परस्परांना भेटतात, तेव्हा ते आदराने “आदेश” असा शब्द उच्चारतात.
नाथ संप्रदायामध्ये मत्स्येंद्रनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटीनाथ, नागनाथ, रेवानाथ (रेवणनाथ), भर्तृहरीनाथ व गोपीचंद्रनाथ या नवनाथांना विशेष महत्त्व दिलेले आहे. ‘नवनाथभक्तिसार’ या सांप्रदायिक मराठी ग्रंथात हे नवनाथ म्हणजे नवनारायणांचेच अवतार मानले गेले आहेत.
या धार्मिक परंपरेनुसार मत्स्येंद्रनाथांना कविनारायण, गोरक्षनाथांना हरिनारायण, जालंधरनाथांना अंतरिक्षनारायण, कानिफनाथांना प्रबुद्धनारायण, चर्पटीनाथांना पिप्पलायन, नागनाथांना आविर्होत्र, भर्तृहरींना द्रुमिलनारायण, रेवणनाथांना चमसनारायण व गहिनीनाथांना करभाजननारायण यांचे अवतार मानण्यात आले आहे. या नवनाथांपैकी एक असलेल्या राजा भर्तृहरीनाथांच्या जन्माबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका कथेनुसार ते सूर्यपुत्र असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ते उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांचे सावत्र भाऊ होते. अत्यंत विद्वान आणि ज्ञानी राजा म्हणून त्यांची ओळख होती. राजा भर्तृहरीनाथांना दोन पत्नी होत्या. ते पिंगला नावाच्या राजकन्येवर मोहित झाले आणि त्यांनी तिला आपली तिसरी पत्नी बनवली. मात्र, राणी पिंगला हिने दिलेल्या धोक्यानंतर त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला आणि आपले संपूर्ण राज्य विक्रमादित्याकडे सोपवले. यानंतर गोरक्षनाथांनी त्यांना नवनाथ संप्रदायाची दीक्षा दिली. दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी कठोर तप केले. ते योग आणि तंत्रविद्येव्यतिरिक्त संगीत आणि साहित्याचेही विद्वान होते. त्यांना अनेक धार्मिक व तात्विक ग्रंथांचे लेखक मानले जाते. ‘शृंगारशतक’, ‘नीतिशतक’ आणि ‘वैराग्यशतक’ या प्रसिद्ध शतकत्रयीचे रचनाकार असलेल्या भर्तृहरीनाथांनी ‘वाक्यपदीय’ नावाचा व्याकरणावरील संस्कृत ग्रंथही लिहिल्याचे सांगितले जाते.
मात्र, त्याबाबत विद्वानांमध्ये मतमतांतरे आहेत. ‘वाक्यपदीय’ हा ग्रंथ लिहिणारा व्याकरणकार भर्तृहरी आणि शतकत्रयी लिहिणारा कवी भर्तृहरी हे एकाच नावाचे दोन ग्रंथकर्ते होऊन गेले, असे अनेकांचे मत आहे. आपले राज्य सोडून भ्रमण करत असताना ते हरंगुळ या भागात आले. हा परिसर प्राचीन काळी वनाच्छादित भाग होता. याच ठिकाणी त्यांची वस्त्रसमाधी स्थापन झाली.
हरंगुळ गावाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या कमानीपासून काही अंतरावर हे समाधी मंदिर आहे. या मंदिराच्या महाद्वारातून आत आल्यावर एक छोटे प्रांगण लागते. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंनी मंडपासारखे बांधकाम केलेले आहे. प्रांगणातून पुढे आल्यावर प्रथम एका देवळीसारखे छोटे मंदिर लागते. त्यासमोर काही पावलांवर एका उंच चौथऱ्यावर शिवलिंग स्थापन केलेले आहे. या शिवलिंगाच्या समोरच एक यज्ञकुंड आहे. या कुंडातील भस्म आपल्या शेतात किंवा घरात शिंपडल्यास तेथे साप येत नाहीत, अशी स्थानिक भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मंदिर परिसरामध्ये एका ठिकाणी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती विराजमान आहेत.
मंदिराच्या सभामंडपातील भिंतींवर राजा भर्तृहरीनाथांच्या तसेच काही देवदेवतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. दगडी बांधकाम असलेल्या गर्भगृहामध्ये राजा भर्तृहरीनाथांची भस्मस्वरूपातील वस्त्रसमाधी आहे. त्यासमोर त्यांचा मुखवटा ठेवलेला आहे. या मुखवट्यावर एका नागाने आपले छत्र धरलेले आहे. गर्भगृहावर एक घुमटाकार शिखर आहे. असे सांगितले जाते की या मंदिर परिसरामध्ये असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडाची पाने गोड लागतात. येथे एक दगडी बारवही बांधलेली आहे, तिला ‘कल्लोळतीर्थ’ असे म्हणतात. मंदिर परिसरातील उजवीकडील मंडपामध्ये दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या राहण्यासाठी सुविधा केलेली आहे. भाविकांना येथे स्वतः स्वयंपाकही करता येतो. त्यासाठी लागणारे पाणी आणि भांड्यांची संपूर्ण व्यवस्था संस्थानातर्फे केली जाते. या मुख्य मंदिरापासून काही अंतरावर राजा भर्तृहरीनाथांचे मूळ समाधी स्थान आहे. येथील पुजाऱ्याला नित्यनेमाने पूजेसाठी रोज त्या मूळ स्थानी जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे राजा भर्तृहरीनाथ स्वतः सध्याच्या मंदिराच्या ठिकाणी आले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
या मंदिरात दर्शनासाठी दररोज अनेक भाविक येतात. मंदिरात रोज सकाळी ६ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता आरती केली जाते. प्रत्येक गुरुवारी दुपारी १२ वाजता विशेष आरती होते. त्यानंतर भाविकांना अन्नदान केले जाते. दर शुक्रवारी समाधीस्थानावर शेणाने सारवण करून लेपन करण्याची जुनी परंपरा आहे. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा या मंदिरातील सर्वात मोठा वार्षिक जत्रोत्सव होय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध भागांतून अनेक भाविक या उत्सवकाळात येथे दर्शनाला येतात. उत्सवकाळात येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. संपूर्ण मंदिरामध्ये आकर्षक सजावट केली जाते.
या उत्सवाशी एक आगळी आख्यायिका जोडलेली आहे. श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गर्भगृहामध्ये एका भांड्यामध्ये दूध ठेवून गर्भगृहाचे दार बंद केले जाते. या दिवशी गर्भगृहातील समाधीवर आपोआप एक वारूळ तयार होते. नागपंचमीच्या मध्यरात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत राजा भर्तृहरीनाथ सर्परूपाने समाधीस्थानावरील वारूळातून बाहेर येतात. ते भांड्यातील दूध प्राशन करून गर्भगृहात फेरी मारतात आणि पुन्हा वारूळात जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या सकाळी काही अंतरावरील मुख्य मंदिरातून राजा भर्तृहरीनाथांच्या मुखवट्याची पालखी निघते. ही पालखी प्रथम मूळ समाधी स्थानी नेण्यात येते. त्यानंतर संपूर्ण गावामधून तिची प्रदक्षिणा होते. ग्रामप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी पुन्हा मुख्य मंदिरात येते आणि गर्भगृहाचे दार उघडले जाते. त्या वेळी भांड्यातील दूध पूर्णपणे संपलेले आढळते. नागपंचमीच्या दिवशी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.